Thane News: पूर्णेकर हत्येनंतर ठाण्यात राजकीय रणशिंग! ‘भयमुक्त ठाणे’साठी ९ ऑक्टोबरला महामोर्चा

वाढत्या दहशतीमुळे विरोधी पक्षाचे कार्यकर्ते, नेते, सामाजिक कार्यकर्त्यांसह नागरिकांमध्ये दहशत
Thane News
Thane NewsPudhari
Published on: 
Updated on: 

ठाणे: अंमली पदार्थ, क्लस्टर, अनधिकृत बांधकामे, विकास कामांमधील भ्रष्ट्राचारविरोधात आवाज बुलंद करणारे शिवसेना उबाठा गटाचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची निर्घृण हत्या झाल्याने ठाण्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्येपूर्वी गेल्या नऊ महिन्यात ५६ खून तर १०० पेक्षा अधिक खुन करण्याचे प्रयन्त झालेले आहेत.

वाढत्या दहशतीमुळे विरोधी पक्षाचे कार्यकर्ते, नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह नागरिकांमध्ये दहशत पसरली असल्याने सर्व राजकीय पक्षांतर्फे ९ ऑक्टोबररोजी पोलीस आयुक्त कार्यालयावर निषेध आणि भयमुक्त ठाण्यासाठी महामोर्चा धडकणार असल्याची माहिती सर्व पक्षीय नेत्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

Thane News
Samruddhi Expressway: कोकणचा चेहरामोहरा बदलणार! समृद्धी महामार्ग थेट वाढवण बंदराशी जोडणार; ११ हजार कोटींचा प्रकल्प

या मोर्चात सामाजिक संस्था, इतर पक्षांसह ठाणेकरांनी सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. शिवसेना उबाठा गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची त्यांच्या कार्यालयात नियोजनबद्ध कट रचून गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

या हत्येतील आरोपी हे सराईत गुन्हेगारांसह काही आरोपी हे मानपाडा परिसरातील आहेत. महिनाभर रेकी आणि पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण घेऊन ही हत्या झाली आहे. कारण पूर्णेकर यांनी ड्रग्ज, क्लस्टर, अनधिकृत बांधकाम या विरोधात आवाज बुलंद करीत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले होते. अखेर व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या पूर्णेकर यांची हत्या करण्यात आली.

याप्रकरणी माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर पूर्णेकर यांच्या मुलाने संशय व्यक्त केला आहे. त्यातून वातावरण अधिकच तापले असून विरोधकांनी कायदा व सुव्यस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करीत पोलिसांना आरोपीच्या कोठडीत उभे केले आहे.

याचा निषेध आणि भयभीत झालेल्या ठाण्याला भयमुक्त करण्यासाठी विरोधी पक्षांनी ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता महामोर्चाचे आयोजन केले आहे. याची माहिती माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड, माजी खासदार राजन विचारे, मनसेचे नेते अविनाश जाधव, एनसीपी (एसपी) शहर अध्यक्ष मनोज प्रधान, काँग्रेसचे शहर अध्यक्ष राहुल पिंगळे, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे, आरपीआरचे संदीप खांबे, आम आदमी पक्ष यांच्यासह नेत्यांनी दिली.

Thane News
Mira Road Car Attack: मैत्रिणीला भेटायला गेलेल्या तरुणावर कार घालण्याचा प्रयत्न; मिरा रोडमध्ये थरार

ठाण्याचीच नाही तर महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था कोसळली असून जनताच भयभीत असेल तर मायबाप सरकार काय करत आहे? असा प्रश्न उपस्थित करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी प्रदीप पूर्णेकर हत्येची पोलिसांनी निःपक्षपाती चौकशी करावी, राजकीय दबाव असता कामा नये, अशी मागणी केली.

गरीब हॉटेलधारकांची लवकर हॉटेल बंद केली जातात तर मानपाडा येथील कोठारी कंपाऊंडमधील हॉटेलमधून रात्री दोन वाजताही सगळे व्यवस्थित सुरु असते. तिथे ड्रग्ज ही मिळत असून ड्रग्जमुळे पिढी बरबाद होत असून पोलीस काही भूमिका घेत नसल्याचा आरोपही आव्हाड यांनी करून सुरक्षित ठाणे, शांत ठाणे आणि भयमुक्त ठाण्यासाठी मोर्चात सामान्य जनतेने सहभागी होण्याचे आवाहन केले.

ठाण्यातील वाढती गुन्हेगारी, पोलीस अधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची होणारी हत्या, पोलिसांची भीती न उरणे, गुंडांची वाढती दहशतीमुळे ठाण्यात राहायला यावे की नाही, याबाबत लोक विचार करत आहेत. ठाण्याचे बिहार झाले असताना शेजारच्या जिल्ह्यातील पालकमंत्री गणेश नाईक पूर्णेकरच्या कुटुंबियांना धीर देतात मात्र ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे कुठे आहेत?

पूर्णेकरच्या अंत्यविधीच्या वेळी आरोपी स्मशानभूमीत येऊन गेले पोलीस काय करतात? असा प्रश्न उपस्थित करीत शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी आरोपींनी आठ दिवस पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण घेतले तेव्हा पोलीस काय करीत होते याचा जाब पोलिसांना विचारला आहे. आता बस झाले, यापुढे कुणाचे खून पडल्यास त्याला पालकमंत्री जबाबदार असतील असा इशाराही विचारे यांनी दिला.

विरोधात भूमिका घेतली म्हणून प्रदीप पूर्णेकर यांची हत्या

विरोधात भूमिका घेतली म्हणून जमील शेखनंतर आता प्रदीप पूर्णेकर याची हत्या झाली आहे. माजिवडा नाक्यावर रात्री उशिरापर्यंत ३०० ते ४०० जण पोलिसांच्या समक्ष ड्रिंक करतात, धिंगाणा घालतात आणि पोलीस बघत बसतात.

ठाण्याचे गॅंग ऑफ वासेपूर झाले असून आरोपींना वाचविणारे बीड प्रमाणे ठाण्याचा आका कोण? असा प्रश्नही मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी उपस्थित करून भयमुक्त ठाणे, ड्रग्जमुक्त ठाण्यासाठी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. तर धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी पडता पंजाब प्रमाणे उडता ठाणे झाल्याची वस्तुस्थिती मांडली. यावेळी एनसीपीचे मनोज प्रधान, राहुल पिंगळे, केदार दिघे, संदीप खांबे आदींनी भूमिका मांडून मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news