

डोंबिवली (ठाणे) : कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या निळजे परिसरातून परदेशी ड्रस तस्कराला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या तस्कराकडून दीड किलो वजनाचे २ कोटी १२ लाख रूपये किंमतीचे एमडी ड्रग्स हस्तगत करण्यात आले आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करीतील बदमाशांची पाळेमुळे खणून काढताना तस्करीचे जाळे थेट दक्षिण आफ्रिकेपर्यंत भिडल्याचे अधोरेखित झाले आहे.
इसा बकायोका (३७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून हा तस्कर मूळचा IVORY COST देशातील रहिवासी असल्याचे चौकशी दरम्यान समोर आले आहे. मात्र सद्या तो निळजे गाव परिसरात राहणारा असल्याचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले.
निळजे परिसरातील हायप्रोफाईल सोसायटीमध्ये कारवाई करण्यात आली आहे. सोसायटीच्या परिसरात एक परदेशी तस्कर एमडी ड्रग्सचा साठा घेऊन येणार असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदिपान शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक (प्रशासन) दत्तात्रय गुंड, सपोनि सागर चव्हाण, सपोनि अजय कुंभार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी रात्री परिसरात जाळे पसरले होते. गावातील तलावाजवळ एका रोडवर एक परदेशी इसम संशयास्पदरित्या घुटमळताना आढळून आला. खासगी गुप्तहेराने केलेला वर्णनाचा इसम तोच असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्या परदेशी नागरिकाला बेड्या ठोकल्या. कारवाईदरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून दीड किलो वजनाचे २ कोटी १२ लाख रूपये किंमतीचे एमडी ड्रग्स हस्तगत केले. अटक करण्यात आलेला आरोपी इसा बकायोका हा मूळचा IVORY COST देशातील रहिवासी असल्याचे चौकशी दरम्यान समोर आले आहे. मात्र सद्या तो निळजे गाव परिसरात राहणारा असल्याचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले. आरोपीच्या विरोधात गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २१ (क) २२ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आठवडाभर पूर्वीच मानपाडा पोलिसांनी खोणी/पलावा येथील एका हायप्रोफाईल सोसायटीत असलेल्या फ्लॅटवर धाड टाकून दोन कोटींचे एमडी ड्रग्स जप्त केले होते. या प्रकरणी असिल जावर सुर्वे (२६), मोहम्मद इसा मोहम्मद हनीस कुरेशी (२७) या दोघांसह मेहेर फातिमा रिजवान देवजानी (२२) यांच्यासह ड्रग्ज तस्करांचा म्होरक्या मोहम्मद रहिम सलीम शेख उर्फ फरहान (३२, रा. मुंब्रा) याला जेरबंद करण्यात आले. कुख्यात तस्कर मोहम्मद उर्फ फरहान याला बहरीन देशात पळून जाण्याआधीच हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे. या कारवाई पाठोपाठ पुन्हा निळजेतील हाय प्रोफाईल परिसरात परदेशी ड्रग्स तस्कराला बेड्या ठोकण्यात आल्याने यापूर्वी अटक केलेल्या ड्रग्स तस्करांशी त्याचा संबंध आहे का ? याचा चौकस तपास पोलिस करत आहेत.
पोलिसांनी अटक केलेला ईसा बकायोका हा मूळचा दक्षिण आफ्रिका येथील राहणारा असल्याची माहिती समोर आली आहे. तो सध्या डोंबिवली निळजे गाव परिसरात राहत होता. इसा याने ड्रग्सचा साठा कुठून आणला? हे ड्रग्स तो कुणाला विकणार होता ? याचा तपास मानपाडा पोलिस करत आहेत. आठवडाभरात दुसरी डोंबिवलीत ड्रग्स तस्करीचे इंटरनॅशनल कनेक्शन पुन्हा एकदा समोर आले आहे. ड्रग्स तस्करीचे इंटरनॅशनल कनेक्शन सिद्ध झाले असून यात अनेक बदमाशांचा सहभाग असण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांनी तपासचक्रांना वेग दिला आहे.