

डोंबिवली (ठाणे) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवलीतील रिजन्सी इस्टेटमध्ये ई प्रभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या फेरीवाला हटाव पथकातील आठ-दहा कर्मचारी बुधवारी (दि.2) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कार्यालयीन वेळेत पत्ते कुटताना आढळून आले. तेथील एका शेडमध्ये टेबल-खुर्च्या टाकून हे कर्मचारी जुगार खेळतानाचा व्हिडियो एका जागरूक नागरिकाने समाज माध्यमांवर व्हायरल केला आहे. या व्हिडियोची तात्काळ दखल घेऊन सहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे यांनी त्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.
१०/ई प्रभागातल्या फेरीवाला हटाव पथकातील आठ-दहा कर्मचारी दुपारचे जेवण झाल्यानंतर त्यांच्या शेडमध्ये पत्त्यांच्या माध्यमातून जुगार खेळत होते. बदली होऊनही याच प्रभागात ठाण मांडून बसलेल्यांसह आठ ते दहा कर्मचारी पैसे लावून जुगार खेळत होते. कर्मचारी जुगार खेळत असल्याची कुणकुण लागताच एका जागरूक नागरिकाने घटनास्थळी जाऊन तेथील परिस्थितीचा व्हिडियो मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. जुगार खेळण्याच्या टेबलावर मोबाईल, पैसे (नोटांची बंडले) पत्त्यांची पाने दिसत होती. हे कर्मचारी दररोज दुपारी कार्यालयीन वेळेत जुगार खेळत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.
वरिष्ठांनी अशा कर्मचाऱ्यांच्या बेशिस्तपणाची गंभीर दखल घेण्याचे धाडस कधी केल्याचे ऐकिवात नाही. २७ गावांत ग्रामपंचायती होत्या. ही गावे केडीएमसीत समाविष्ट करण्यात आली. त्याच बरोबर ग्रामपंचायतींमधील कर्मचारी देखिल केडीएमसीत समाविष्ट करण्यात आले. मात्र कर्मचारी केडीएमसीच्या ९/आय आणि १०/ई या दोन्ही प्रभागांमध्ये वर्षानुवर्षे चिटकून बसलेले आहेत. एकीकडे त्यांच्या या दोन्ही प्रभागांतून अन्य प्रभागांमध्ये बदल्या करण्यात प्रशासन अनुत्सुक आहे. तर दुसरीकडे ग्रामपंचायतींच्या या कर्मचाऱ्यांना केडीएमसीच्या वरिष्ठांची भीती आहे की नाही ? प्रशासनावर अर्थात अशा कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांचा वचक राहिला आहे की नाही ? असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
या व्हिडियोची ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त तुषार सोनावणे यांनी गंभीर दखल घेऊन जुगार खेळणाऱ्या त्या आठ-दहा कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या. समाधानकारक उत्तर न दिल्यास कठोर कारवाईचा इशारा नोटिसीत देण्यात आला आहे. काही प्रभागांमधील फेरीवाला हटाव पथकातील कामगार कार्यालयीन हजेरी लावून आपली घरगुती कामे करणे, बाजारात फेरी मारून दुकानदार, फेरीवाल्यांच्या भेटी-गाठी घेणे असे प्रकार करत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
१०/ई प्रभाग हद्दीतील डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील कावेरी चौक, पेंढरकर महाविद्यालय परिसरातील रस्ते, २७ गावे, सांगाव, नांदिवली, देसलेपाडा, स्वामी समर्थ मठ परिसर, भोपर, कल्याण-शिळ महामार्गाच्या दुतर्फा असलेले फेरीवाले रस्ते अडवून व्यवसाय करत आहेत. त्यांच्यावर हे पथक कारवाई करत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणे आणि खेळवणे फौजदारी कारवाईस पात्र ठरते. त्यामुळे अशा जुगारी कर्मचाऱ्यांवर मानपाडा पोलिसांनीही फौजदारी कारवाईची झोड घ्यावी, अशीही अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.