कोल्हापुरातील अनंत हा एक हुशार आयटी इंजिनिअर. सायंकाळी ऑफिसमधून परतल्यावर तो आपल्या घरी सोफ्यावर मोबाईलवर रिल्स पाहत बसलेला होता. अचानक त्याच्या व्हॉटस्ॲपवर अननोन नंबरवरून एक मेसेज आला. भाऊ, हा फोटो बघा. तुम्ही यांना ओळखता का?
अनंतने स्क्रीनवर नजर टाकली - फोटो दिसत होता, कोणीतरी युवक, थोडंफार चेहरा परिचयाचा वाटणारा. कुणी असेल ऑफिसमधून कोणी हा फोटो पाठवला असेल का, असे मनातल्या मनात बोलत फोटो डाऊनलोड करू की, नको असा तो विचार करत होता. तितक्यात त्याला एक कॉल आला फोनवरील व्यक्ती म्हणाला, अनंत जी, मी तुम्हाला एक फोटो पाठवलेला आहे तो जरा डाऊनलोड करून पहा, तुम्ही त्यांना ओळखता का? मला वाटतं तुम्ही त्यांना ओळखता, एकदा जरा पाहा ना... असे म्हणताच अनंतने फोन कट केला, व्हॉटस्ॲप उघडले आणि तो फोटो डाऊनलोड केला.
फोटो डाऊनलोड करताच त्याच्या फोनच्या स्क्रीनवर थोडं काळं झाले बघता बघता अचानक मोबाईलच्या स्क्रीनवर विचित्र ॲप्स दिसू लागली -क्विक ओटीपी रीडर, मनी ट्रान्सफर हे सारे थांबवण्यासाठी अनंत फोनची बटन दाबू लागला पण तोपर्यंत खेळ संपला होता. त्याच्या खात्यातून ४५ हजार रुपये गायब झाले होते. सध्या सायबर चोरट्यांकडून लोकांना गंडा घालण्यासाठी स्टेगानोग्राफई या नव्या पद्धतीचा अवलंब केला जात आहे. याच सापळ्याची माहिती देण्यासाठी या पात्राचा आधार घेतला आहे.
सायबर चोरटे आज-काल गंडा घालण्यासाठी नवनव्या पद्धतींचा अवलंब करत आहे. डोळ्याच्या पापणीची उघडझाप होण्याआधीच आपल्या आपले खाते रिकामे करण्यासाठी ही चोरटी टपून बसलेली आहेत. ऑनलाईन लुटमार करण्यासाठी या छोट्यांकडून आता 'स्टेगानोग्राफी' या पद्धतीचा वापर केला जात आहे. आता ही स्टेगानोग्राफी म्हणजे काय? तर हे माहिती लपवण्याचे एक तंत्र आहे. थोडक्यात फोटो किंवा व्हिडीओमध्ये मालवेअर लपवलेले असते. जो कोणी मालवेअर असलेला फोटो उघडतो, तेव्हा ते मालवेअर ॲक्टिव्हेट होते व फोन हॅक होतो फोनचे संपूर्ण नियंत्रण आपल्या हातातून जाते मग काय खेळ खल्लास. अशाप्रकारे दिल्ली, उत्तर प्रदेश आणि चेन्नईमध्ये अनेकांना लाखोंचा गंडा घातला आहे. स्टेगानोग्राफी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी अनोळखी नंबरवरून आलेले फोटो, व्हिडीओ, फाईल्स डाऊनलोड करू नका. कोणीही फाईल पाठवली आणि जर ती व्यक्ती ओळखीची नसेल तर ताबडतोब डिलीट करा.
* एखादा साधा फोटो फाईल जर २-३ एमबी पेक्षा जास्त असेल आणि विशेष कारण नसेल, तर सावध व्हा. त्यामध्ये मालवेअर लपवल्याची शक्यता असू शकते.
* व्हॉटस्ॲप किंवा इतर ॲप्समध्ये 'ऑटो डाऊनलोड' सेटिंग बंद ठेवा. म्हणजे कोणतीही फाईल तुमच्या परवानगीशिवाय डाऊनलोड होणार नाही.
* अशाप्रकारे कोणता मेसेज आला तर लगेच सायबर हेल्पलाईन १९३० वर संपर्क करा.