

कोल्हापूर : Kolhapur Crime News | शादी डॉट कॉम या ऑनलाईन वेबसाईटवरील ओळखीतून ३२ वर्षीय घटस्फोटित महिलेवर अत्याचार करून तिच्याकडून १० लाख ९४ हजार रुपये उकळल्याप्रकरणी पुणे येथील संशयिताविरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यांमध्ये शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे. फिरोज निजाम शेख, असे संशयिताचे नाव आहे.
पीडित महिला घटस्फोटित असून तिला एक अपत्य आहे. पुन्हा लग्न करण्यासाठी तिने स्वतःची माहिती एका वेबसाईटवर टाकली होती. नोव्हेंबर महिन्यात संशयित शेख याने तिच्याशी संपर्क साधून लग्नाची इच्छा व्यक्त केली. पीडितेला भेटण्यासाठी संशयित कोल्हापुरात आला. स्वतः व्यावसायिक असल्याचे सांगितले.
महिलेच्या घरच्या लोकांशी त्याने बोलणी केली. तिचा विश्वास संपादन करून शहरातील एका लॉजवर बोलावून घेतले. तिच्याशी शारीरिक संबंधही ठेवले. या संबंधाबाबत कोणाला माहिती दिल्यास अथवा वाच्यता केल्यास बदनामी करण्याची त्याने धमकीही दिली होती.
व्यवसायाच्या निमित्ताने संशयिताने महिलेकडून २५ हजार रुपये घेतले. डिसेंबर महिन्यात आयकर खात्याचा छापा पडल्याचे सांगून त्याने स्वतःला वाचविण्यासाठी महिलेकडे पैशाची मागणी केली. महिलेने स्वतः जवळील ११ तोळे दागिने व एक लाख ६९ हजार रुपये त्याला दिले. दागिने व पैसे मिळाल्यानंतर संशयिताने महिलेशी संपर्क टाळण्याचा प्रयत्न सुरू केला.
महिलेने वारंवार संपर्काचा प्रयत्न करूनही त्याने दाद दिली नाही. सतत उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच महिलेने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन संशयिताविरुद्ध फिर्याद दाखल केली. संशयिताला लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले.