

रिमोट ॲक्सेस फ्रॉड!
ऑनलाईन खरेदी केलेल्या पार्सलचा पत्ता चुकल्याने त्रस्त असलेल्या एका ग्राहकासाठी नेटवरील एक सर्च थेट आर्थिक विनाशाचे कारण ठरला. ई-कॉमर्स कंपनीशी तातडीने संपर्क साधण्यासाठी त्याने सर्च इंजिनवर 'कस्टमर केअर नंबर' शोधला आणि समोर दिसलेल्या पहिल्याच क्रमांकावर कॉल लावला. समोरून अत्यंत नम्र आणि अस्खलित कॉर्पोरेट भाषेत एका व्यक्तीने संवाद साधला.
कंपनीचा अधिकृत एक्झिक्युटिव्ह असल्याचे भासवत त्याने तक्रार सोडवण्याचे पूर्ण आश्वासन दिले आणि ग्राहकाचा विश्वास संपादन केला. तक्रार निवारणाच्या नावाखाली भामट्याने तांत्रिक अडचण असल्याचे सांगितले आणि तक्रार नोंदवण्यासाठी मोबाईलमध्ये एक छोटे ॲप इन्स्टॉल करण्यास सांगितले. त्या व्यतिरिक्त, व्हेरिफिकेशनसाठी केवळ ५ रुपये ट्रान्सफर करण्याची अट ठेवली.
अवघ्या पाच रुपयांचीच तर गोष्ट आहे असे समजून ग्राहकाने विचार न करता ते ॲप डाऊनलोड केले आणि ऑनलाईन पेमेंटसाठी बँकेचे तपशील भरले. मात्र, ग्राहकाला हे ठाऊक नव्हते की, त्याने डाऊनलोड केलेले ॲप हे 'स्क्रीन शेअरिंग आणि रिमोट ॲक्सेस ट्रोजन' होते, ज्याने त्याच्या मोबाईलचा संपूर्ण ताबा पडद्यामागून सायबर भामट्यांच्या हाती दिला होता. पाच रुपयांचे ट्रॅन्झॅक्शन होताच स्क्रीन काही सेकंदांसाठी ब्लँक झाला.
त्याच क्षणी हॅकर्सनी स्क्रीनवर उमटलेला गोपनीय पिन चोरला आणि अवघ्या पाच मिनिटांत एकापाठोपाठ मेसेज धडकू लागले. खात्यातील कष्टाची जमापुंजी, तब्बल १.८० लाख रुपये क्षणात लांबपास झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ग्राहकाने बँकेशी संपर्क साधला, पण तोपर्यंत उशीर झाला होता.
पोलिसांनी नुकताच या वाढत्या गुन्ह्यांचा पर्दाफाश केला असून, सायबर विश्वात या सापळ्याला 'फेक कस्टमर केअर अँड रिमोट ॲक्सेस फ्रॉड' म्हणून ओळखले जाते. या गुन्ह्यात सायबर भामटे सर्च इंजिनवर नामांकित कंपन्यांच्या नावाने स्वतःचे बनावट 'कस्टमर केअर' क्रमांक पोस्ट करतात. तक्रार निवारणासाठी नागरिक जेव्हा या क्रमांकांवर कॉल करतात, तेव्हा भामटे मदत करण्याच्या बहाण्याने मोबाईलमध्ये रिमोट ॲक्सेस ॲप डाऊनलोड करायला लावतात किंवा व्हेरिफिकेशनसाठी ५ ते १० रुपयांचे नाममात्र पेमेंट करायला सांगतात.
अशा ॲप्समुळे फोनचा ताबा थेट हॅकर्सच्या हातात जातो आणि स्क्रीनवरील 'पासवर्ड' व 'ओटीपी' चोरून ते काही मिनिटांत बँक खाते रिकामे करतात. यापासून वाचण्यासाठी सर्च इंजिनवरील क्रमांकांवर आंधळेपणाने विश्वास न ठेवता संपर्क क्रमांक केवळ कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळ किंवा ॲपवरूनच घ्या. अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून फोनमध्ये कोणतेही ॲप इन्स्टॉल करू नका, संवेदनशील माहिती शेअर करू नका आणि फसवणूक झाल्यास तत्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइनवर संपर्क साधा.
— आशिष शिंदे, कोल्हापूर