

आजकाल नायजेरियन आणि बांगला देशी टोळ्यांकडून भारतात ड्रग्जचे मोठ्या प्रमाणात वितरण होत आहे. याबाबत अनेक धाडसत्रांमधून त्यांचे कारनामे उघड झाले; पण त्यावर ठोस उपाययोजना होत नसल्यामुळे हे प्रकार खुलेआम सुरू आहेत. या टोळ्यांना भारतातून हद्दपार करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यातील काही बेकायदेशीर घुसखोर आहेत, तर काही पर्यटन व्हिसावर आले आहेत. याबाबत भूमिका घेण्यासाठी एखादा दया नायक, एखादा प्रदीप शर्मा निर्माण होण्याची गरज आहे.
सुरेश साळवे, ठाणे
मीरा-भाईंदर, वसई, विरार या आयुक्तालयाच्या विभागात सर्वाधिक ड्रग्ज तस्करीचे गुन्हे नोंद झाले आहेत. तरुण पिढीला ड्रग्जच्या विळख्यात ओढून भारताच्या युवा पिढीला बरबादीकडे नेण्याचा हा आंतरराष्ट्रीय कट असल्याचे सांगितले जात आहे. ठाण्यात गुन्हे शाखेने 28 जुलैला 4 कोटींचे ड्रग्ज जप्त केले आणि दोन आरोपींना अटक केली. त्यांचेही कनेक्शन बांगला देशींशी होते. पनवेलमध्ये ज्या कारवाया झाल्या त्यामध्येही हीच स्थिती होती.
नायजेरियन आणि बांगला देशी यांची प्रमुख केंद्रे नालासोपारा, पनवेल, भिवंडी, मीरा-भाईंदर अशा भागात पाहायला मिळत आहेत. 20 ते 30 टोळ्या आणि 500 ते 600 लोकांचा सहभाग असल्याचा रिपोर्टही तपासातून पुढे आला होता. मात्र, या तपास यंत्रणांची आणि प्रशासकीय यंत्रणांची ठोस भूमिका पाहायला मिळत नसल्याने हे लोण मोठ्या प्रमाणात पसरताना दिसत आहे. हजारो कोटींचे ड्रग्ज या टोळ्यांकडून हस्तगत करण्यात आले; पण टोळ्यांचा नायनाट काही झालेला नाही.
सद्यस्थितीत मुंबईच्या रेल्वेस्थानकांवर वा शेजारील परसरात नजर टाकली, तर अमली पदार्थांच्या नशेत बसलेली वा तेथेच झोपलेले अनेक तरुण दिसून येतात. त्याचबरोबर मुंबईतील महाविद्यालयांच्या आसपास अमली पदार्थ विकणारे बांगला देशी आणि नायजेरियन वावरत असतात. अमली पदार्थ सेवन करणार्या समूहांवर पोलिसांनी छापे टाकले, त्यावेळी त्यात अनेकदा तरुण-तरुणी निष्पन्न झाले आहेत. एकूणच तरुण पिढी यातून बरबाद होत असल्याचे दिसून येत आहे. त्यास आळा घालणे अत्यावश्यक झाले आहे.
बांगला देशी नागरिकांना पकडून कोलकाताजवळ बांगला देशाच्या सीमेपलीकडे नेऊन सोडण्याचे काम पोलिसांनी अनेकदा केले आहे. मात्र, पोलिस आपल्या मुख्यालयात पोहोचण्यापूर्वीच ते बांगला देशी नागरिक पुन्हा भारतात पोहोचलेले असतात, अशी वस्तुस्थिती एका निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनीच सांगितली. याचा विचार करता बेकायदा घुसखोरी केलेले बांगला देशी आणि नायजेरियन यांच्यावर कठोर कारवाई होत नाही हे समोर आले आहे. परिणामी, या बेकायदा बांगला देशी आणि नायजेरियन नागरिकांना सद्यस्थितीत येथील पोलिसांचे भय वाटत नसल्याने ते राजरोस भारतात वावरत असतात. यावर केंद्रीय आणि राज्याच्या गृह विभागाच्या माध्यमातून सक्त कारवाईची कार्यपद्धती निश्चित करणे अत्यावश्यक आहे.
मुंबई, ठाणे, पुणे आदी शहरांसह राज्यात ड्रग्जची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने अनेक माफिया राज्यातच ड्रग्ज फॅक्टरी उभारण्याचा डाव आखत आहेत. ठाणे पोलिसांनी वेळोवेळी पकडलेल्या ड्रग्ज तस्करांच्या चौकशीतून कोकणात ड्रग्ज फॅक्टरी उभारण्याचा डाव अनेकवेळा उघड झाला आहे. त्यावरून माफियांची ड्रग्जनिर्मितीसाठी कोकणावर नजर असल्याचे समोर येत आहे.
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या एका रिपोर्टनुसार भारतात 2019 साली भारतात ड्रग्ज सेवन करणार्यांची संख्या 18 दशलक्ष होती. 2023 वर्षाच्या शेवटपर्यंत ही संख्या 34 दशलक्षपर्यंत पोहोचली आहे. या आकडेवारीवरून आपल्या देशात ड्रग्जचा राक्षस किती झपाट्याने फोफावतोय हे स्पष्ट होत आहे. भारतात कधीकाळी नशा करण्यासाठी वापरले जाणारे गांजा, भांग, चरस आदी अमली पदार्थांची जागा आता कोकेन, एमडी, एलएसडी असे आधुनिक ड्रग्ज घेऊ लागले आहेत. त्यामुळे या ड्रग्जची मागणी प्रचंड वाढली आहे. क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात देशात 20 हजार कोटी, तर महाराष्ट्र राज्यात 5 हजार कोटींहून अधिकचे अमली पदार्थ विविध यंत्रणांमार्फत कारवाई करून पकडले गेले आहेत. एकट्या मुंबईत 2024 या वर्षभरात 4 हजार 240 कोटींचे ड्रग्ज पकडण्यात आले आहे. तर, ठाण्यात वर्षभरात 17 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले असून, चार हजार गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
मुंबई-ठाण्यातील दोनशेहून अधिक बडे हॉटेल्स आणि क्लब रेव्ह पार्ट्यांचे आयोजन अत्यंत गुप्तपणे करतात. ज्यात सर्रास ड्रग्जचा बाजार मांडला जातो. नवनव्या ड्रग्जच्या प्रकारांच्या जाहिरातीसाठीदेखील या रेव्ह पार्ट्या कुप्रसिद्ध आहेत. एखाद्या ड्रग्ज माफियाने नवा ड्रग्जचा प्रकार मार्केटमध्ये आणला की, त्याचा नमुना अशा पार्ट्यांमध्ये फुकट वाटला जातो. हे ड्रग्ज अत्यंत घातक व शरीरावर खोलवर परिणाम करणारे असतात. नवा ड्रग्जचा प्रकार नमुना म्हणून तरुणांना दिला की, त्याची जाहिरात होते व मागणी वाढू लागते. त्या ड्रग्जला कोड लँग्वेजमध्ये काय म्हणायचे, ते कुठे उपलब्ध होईल व त्याची किंमत काय असणार, या सगळ्या बाबी अशा पार्ट्यांमध्ये प्रसिद्ध केल्या जातात. एकप्रकारे रेव्ह पार्टी म्हणजे ड्रग्ज विक्रीचा सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्मच आहे. पेपरबॉम्ब म्हणजेच एलएसडी पेपर, एमडी, एफेड्रीन, बाटला, क्रिस्टल, एमडीएम, अस्प्रिन, क्रॅक, हॅश, हुक्का पेन, बच्चू टॅबलेट, कोकेन आदी नवनव्या ड्रग्जची येथे सर्रास विक्री केली जातेय. इतकेच नव्हे, तर पोलिसांना गुंगारा देण्यासाठी कफ सिरफ, व्हाईटनर, डोकेदुखीत वापरण्यात येणारे बाम, पॉवरफुल्ल पेन किलर आदी औषधांचादेखील नशेसाठी सरार्स वापर करण्यात येतो. हे सारे ड्रग्ज इतके पावरफुल्ल असतात की, ते सेवन केल्यावर आपण सुपरहीरो असल्याचा भास होऊ लागतो व तरुण मुले ते सेवन करून सलग आठ-आठ तास डीजेवर नाचतात. या ड्रग्जला म्याव म्याव, पावडर, माल, गोली, पेपरबॉम्ब, अशी वेगवेगळी कोड भाषेतली नावे असतात.
ड्रग्ज प्रकरणात डार्कवेबचे कनेक्शन समोर आले आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळूर या बड्या शहरांसह अनेक ठिकाणी पोहोचवण्यात येणारे घातक ड्रग्ज डार्कवेबच्या माध्यमातून विदेशातून भारतात मागवले जातात. त्यानंतर या ड्रग्ज कन्साईन्मेंटला समुद्रमार्गे विविध शहरांत पोहोचवले जाते, अशी बाब तपास यंत्रणांच्या चौकशीतून पुढे आली आहे. डार्कवेब म्हणजे इंटरनेटवरील तस्करी जगताचे स्वतःचे छुपे ब्राऊझर आहे. येथे घातक हत्यार, लोकांचे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड डिटेल्स, ई-मेल, लोकांचे फोन नंबर, ड्रग्ज, नकली करन्सी, इतर वस्तू सहज मिळतात. या सर्व गोष्टी येथे खूप कमी दरात मिळतात. इंटरनेटची ही दुनिया अद़ृश्य आहे. येथे यूजर्सची ओळख गुप्त राखली जाते.
सागरी मार्गाने भारतात होणारी अमली पदार्थाची सर्वाधिक तस्करी पाकिस्तानमधून होत असल्याचे वेळोवेळी तपास यंत्रणांनी उघड केले आहे. गुजरात पोलिसांनी ड्रग्ज माफियांविरोधात अनेक मोठ्या कारवाया केल्या आहेत. यादरम्यान एका अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात कराचीतील सर्वात मोठ्या ड्रग्ज माफियाच्या मुलाला भारतीय तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीतून पाकिस्तान भारतात सागरीमार्गे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ तस्करी करीत असल्याचे उघड झाले आहे. तालिबान आणि अफगाणिस्तानचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत अफूची शेती आहे. जगातील अफूच्या उत्पादनात अफगाणिस्तानचा वाटा 80 टक्के आहे. अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात अफूपासून तयार होणार्या हेरॉईन व इतर अमली पदार्थ पाकिस्तानमार्गे भारतात मोठ्या प्रमाणात तस्करी केली जातात.