Nashik Crime Diary | मोबाईलवरुन बोलता बोलता खाली पडला आणि जीव गमावला

नाशिक गुन्हे वृत्त
Nashik Crime News
नाशिक गुन्हे वृत्तFile Photo
Published on
Updated on

रॅम्पवरून पडून कारागिराचा मृत्यू

नाशिक : मोबाइलवरून संवाद साधताना रॅम्पवरून पडल्याने परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना जेल रोड येथे घडली. फुलचंद यादव (45, रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. गजानन एम्पायर) असे मृताचे नाव आहे. फुलचंद हे शनिवारी (दि. 21) रात्री नऊच्या सुमारास उंचावरून पडल्याने मृत्यू झाला.

प्रवाशाचे किमती दागिने लंपास

नाशिक : बस प्रवासात चोरट्याने महिलेकडील सोन्याचे दागिने चोरल्याची घटना छत्रपती संभाजीनगर ते नाशिकदरम्यान घडली. याप्रकरणी प्रियंका राहुल कोठुळे (रा. छ. संभाजीनगर) यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात फिर्याद केली आहे. त्या गुरुवारी (दि. 19) बसने नाशिकला आल्या होत्या. त्यावेळी चोरट्याने बॅगेतील पाकिटात ठेवलेले 33 ग्रॅम वजनाचे एक लाख 70 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

इंटरनेट बँकिंगद्वारे लाखोंना गंडा

नाशिक : सायबर भामट्याने शहरातील एकास सात लाख रुपयांचा गंडा घातला आहे. भामट्याने 20 ते 24 जुलै 2023 या कालावधीत गंडा घातला. नागरिकाच्या इंटरनेट बँकिंगचा वापर करून मुदतठेवींवर ओव्हरड्राफ्ट सुविधा वापरून पैसे काढत गंडा घातला. या प्रकरणाचा सायबर पोलिस तपास करत आहे.

मखमलाबाद येथे घरफोडी

नाशिक : मखमलाबाद येथे चोरट्याने दरवाजाची जाळी तोडून कुलूप तोडून घरफोडी करीत 24 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला. स्वाती चंद्रकांत वाळके यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने शुक्रवारी (दि. 20) दुपारी 3 ते सायंकाळी सातदरम्यान घरफोडी करून घरातील टीव्ही, चांदीचे दागिने, रोकड असा ऐवज लंपास केला. म्हसरूळ पोलिस तपास करत आहेत.

वाद सोडवणार्‍यास मारहाण

नाशिक : आई व मुलाचा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करणार्‍यास मुलाने मारहाण केल्याची घटना भारतनगर परिसरात घडली. क्रिश रमेश देवढे (18, रा. वडाळागाव) याच्या फिर्यादीनुसार, त्याची मामेआजी वाळाबाई व त्यांचा मुलगा रवींद्र शंकर जाधव यांच्यात मंगळवारी (दि. 17) वाद सुरू होते. त्यामुळे क्रिशने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता संशयित रवींद्र याने हातोडीने मारहाण करीत दुखापत केली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सातपूरला घरफोडी

नाशिक : सातपूर येथील संदीपनगर परिसरात चोरट्याने घरफोडी करून एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. नितीन कन्हय्यालाल जैसवाल (54, रा. सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने 14 ते 21 डिसेंबरदरम्यान, घरफोडी करून घरातील 20 हजारांची रोकड, 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 20 हजार रुपयांचे चांदीचे पैंजण असा ऐवज पळविला. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अपघातात युवक ठार

नाशिक : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात अझहर फारुख सय्यद (32, रा. देवळाली गाव) यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.20) सकाळी 9.30 वाजता नाशिक रोड येथील यशवंत मंडई पार्कजवळ हा अपघात झाला होता.

समतानगरला पित्यासह मुलांना मारहाण

नाशिक : चौघांनी मिळून पित्यासह त्यांच्या दोन मुलांना मारहाण केल्याची घटना समतानगर येथे घडली. आदर्श वामन अहिरे (22, रा. समतानगर) याच्या फिर्यादीनुसार, संशयित संतोष आवारे, कृष्णा शिरसाठ, रोशन भवर, सोनू भवर यांनी शिवीगाळ करीत आदर्श यास मारहाण केली. तसेच संशयितांनी आदर्शचे वडील वामन अहिरे व भाऊ अनिकेत अहिरे यास कोयत्याने वार करून दुखापत केली. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आनंदनगरला युवकाने जीवनयात्रा संपवली

नाशिक रोड :आनंदनगर परिसरात ललित प्रताप गोहेर (27) या युवकाने शनिवारी (दि. 21) दुपारी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

पिता-पुत्रावर वडाळा गावात प्राणघातक हल्ला

नाशिक : वाहनाचा कट लागल्याची जुनी कुरापत काढून चौघांनी मिळून पिता-पुत्रावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना वडाळा गाव येथील तैबानगर परिसरात घडली. कोयत्याचे वार लागल्याने जैद मुक्तार शेख (23) व मुक्तार शेख हे गंभीर जखमी झाले आहेत. हल्लेखोर सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जैद शेख याच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दि. 21) परिसरातील एका मुलाचे निधन झाले. त्याच्या अंत्यसंस्कारानंतर मध्यरात्री ते घराबाहेर शेजारच्यांसोबत चर्चा करीत होते. त्यावेळी कार (एमएच 15 एचयू 7792)मधून संशयित बंटी ऊर्फ अकील पीर मोहमंद शेख (रा. खंडोबा चौक, वडाळागाव), रामेश्वर गर्दे व इतर दोघे आले. त्यांनी वाहनास कट मारल्याची कुरापत काढून शिवीगाळ केली. तसेच बंटी याने जैदच्या डोक्यात कोयत्याचा वार केला. तर गर्दे याने हल्ला केल्यानंतर जैदने बचाव केल्याने बोटास आणि पाठीस गंभीर दुखापत झाली. जैदच्या वडिलांनी बचावासाठी प्रयत्न केला असता त्यांच्यावरही हल्ला झाला. आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिक जागे झाल्याने संशयित कारमधून पसार झाले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी तपास करीत संशयित बंटी आणि रामेश्वर यांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

गुन्हेगार सराईत

संशयित बंटी हा सराईत गुन्हेगार असून, तो हद्दपार होता. नोव्हेंबर महिन्यात हद्दपार असतानाही शहरात वास्तव्य केल्याप्रकरणी त्यास पकडले होते. त्याने जैदवर हल्ला करताना ‘जैसे गोल्डी का मर्डर किया, वैसे तेरा मर्डर करुंगा’ असे धमकावले होते. इतर संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news