

नैतिक अधःपतनाच्या भयावह घटना समाजात सातत्याने घडत आहेत. नात्यांचे बंध, प्रेम, विश्वास या सगळ्यावर काळोख पसरविला जात आहे. प्रेमाची जागा लोभाने घेतली आहे. नात्यांची ही विकृती आणि पैशासाठीचं अंधत्व समाजाला हादरवून टाकणारं आहे. अशीच एक घटना सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात घडली. विम्याच्या रकमेसाठी पत्नीनेच पतीचा खून करून अपघाताचा बनाव रचला. पण, पोलिसांच्या चौकस तपासामुळे या कटाची आणि क्रौर्याची साखळीच उघडकीस आली.
कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण गाव... बाबुराव दत्तात्रय पाटील हे व्यसनाच्या आहारी गेल्याने कर्जबाजारी झाले होते. काही लोकांच्याकडून त्यांनी हात उसने पैसे घेतले होते. त्यातच देणेकरांचा तगादाही सुरू होता. अनेकदा देणेकरी घरात येऊन बसत. घरबांधणीसाठीही त्यांनी कर्ज काढले होते. पत्नी वनिता, मुलगा तेजस या दोघांनाही कर्जाची चिंता होती. अशातच बाबुराव यांनी आपल्या नावावर एक कोटीचा विमा उतरवला होता. बाबुराव यांच्या मृत्यूनंतर ती विम्याची रक्कम पत्नी वनिता हिला मिळणार होती. या रकमेचा लोभ वनिताच्या मनात बर्याच दिवसांपासून घोळत होता. बाबुराव यांचा मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम मिळेल आणि कर्जातून मुक्त होऊ, असा विचार तिच्या मनात घोळत होते. अखेर तिने पती बाबुरावचा काटा काढण्याचा निर्धार केला. या कटात मुलगा तेजस व त्याचा मित्र भीमराव हुलवान या दोघांनाही सामील करून घेतले. बाबुराव यांचा अपघाती मृत्यू दाखवण्याचा कट शिजला.
10 फेब्रुवारी रोजी रात्री बाबुराव यांना शिरढोणपासून थोड्याच अंतरावर हॉटेल आर्या समोर नेले. तिथे दुभाजकावर त्यांचे डोके आपटण्यात आले. डोक्यातून अतिरक्तस्राव झाल्याने बाबुराव यांचा जागीच मृत्यू झाला. वनिता, तेजस आणि भीमराव या तिघांनी बाबुराव यांना महामार्गावरच सोडून दिले. एखादे वाहन त्यांच्या अंगावरून जाईल आणि त्यांचा अपघात झाला आहे, असे भासवण्याचा या तिघांचा प्रयत्न होता; पण एकही वाहन बाबुराव यांना धडकले नाही. महामार्ग पोलिसांनी त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून कवठेमहांकाळ पोलिसांना माहिती दिली. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक ज्योतीराम पाटील, सहायक निरीक्षक शरद शिवशरण हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. बाबुराव यांना कवठेमहांकाळ आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनाही आधी हा अपघातच असल्याचा अंदाज होता. पण, तपासाची चक्रे फिरली आणि अपघाताचा बनाव उघडकीस आला.
खुनाच्या घटनेआधी काही दिवस विम्याच्या रकमेसाठी वनिता तिने कंपनीच्या प्रतिनिधीला फोन केला होता. खुनानंतर दुसर्याच दिवशी पुन्हा तिने विमा कंपनीशी संपर्क केला. पोलिसांनी वनिता व मुलगा तेजस या दोघांचे जबाब नोंदवले. या दोघांच्या जबाबात विसंगती आढळून आली. घटनेच्या दिवशी दोघेही कराड येथे असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दोघांचेही मोबाईल लोकेशन तपासले, तेव्हा ते घटनास्थळी आढळून आले. आता मात्र पोलिसांना वेगळीच शंका येऊ लागली. निरीक्षक पाटील व सहायक निरीक्षक शिवशरण यांनी दोघांचीही चौकशी केली. शिवाय परिसरातील सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्हीमध्ये वनिता, तेजस व त्यांच्यासोबत एक अनोळखी व्यक्ती दिसत होता. पोलिसांनी वनिता व तेजसला ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनीही बाबुराव यांचे दुभाजकावर डोके आपटून खून करून अपघाताचा बनाव केल्याची कबुली दिली. एक कोटी रुपयांच्या विम्यासाठी व कर्जबाजारीपणातून मुक्त होण्यासाठी तेजसच्या मित्राला सोबत घेत, खुनाचा कट रचल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले. पोलिसांनी तिघांनाही अटक केली. सध्या हे तिघेही कारागृहात आहेत. पैशासाठी माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो, याचं हे उदाहरण. प्रेमाची जागा लोभाने घेतली. पत्नीने पतीच्या खुनाचा कट रचला, खुनात मुलगा सामील झाला, अशा घटना समाजाला कुठे नेणार?