

नाशिक : सतीश डोंगरे
This game between cyber thieves and the police has been going on for the last 10 years.
आतापर्यंतच्या सायबर गुन्ह्यांचा बारकाईने अभ्यास केल्यास, गुन्ह्यांची पद्धत पोलिस यंत्रणेला उमजण्याअगोदर दुसऱ्या नव्या पद्धतीने सायबर चोर लोकांना गंडवितात. कदाचित याच कारणांमुळे मागील 10 वर्षांपासून सायबर चोर आणि पोलिसांचा पाठशिवणीचा खेळ अजूनही सुरूच आहे.
२०१५ ते २०२४ या काळात राज्यात ५४ हजार ८०९ सायबर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील केवळ १५ हजार १४५ भामट्यांनाच बेड्या ठाेकण्यात पोलिसांना यश आले असून, तब्बल ३९ हजार ६६४ सायबर चाचे अजूनही मोकाटच आहेत.
सायबर चोरट्यांनी पोलिस यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण केले असून, त्यांच्यावर अंकुश ठेवण्यात सायबर पोलिस अपयशी ठरत आहेत. पोलिस विभागाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार राज्यात सर्वाधिक सायबर चोरीचे गुन्हे मुंबईत दाखल होतात. मागील वर्षी मुंबईत ४,८४९ इतके गुन्हे दाखल झाले होते. त्यातील केवळ ७५७ गुन्हेगाारांनाच बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले. ठाण्यात ६८० गुन्हे दाखल असून, १३ गुन्हेगारांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यात १,५०४ गुन्ह्यांपैकी ९, नाशिकमध्ये ९८९ पैकी ११, तर राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात २१२ पैकी केवळ पाचच सायबर चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यााचे हे प्रमाण अत्यल्प असून, सायबर पोलिसांचे अपयश दर्शविणारे आहे.
सायबर भामट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांकडे अद्ययावात तपास यंत्रणा उपलब्ध आहे. इंडियन काॅम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी), डाटा सिक्युरिटी काउन्सिल ऑफ इंडिया (डीएससीआय), सायबर फॉरेन्सिक प्रयोगशाळा आदींंची स्थापना करण्यात आली आहे. मुंबई आणि पुण्यातही या मोठमोठ्या प्रयोगशाळा अस्तित्वात आहेत. तसेच आता प्रत्येक शहरात स्वतंत्र्य सायबर पोलिस ठाणे आहेत. मात्र, तरीही गुन्हा निष्पन्न करून चोरट्यांना बेड्या ठोकण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
नवनवीन फंडे वापरून सायबर भामटे लोकांना गंडवित आहेत. डिजिटल अरेस्ट, ओटीपी- पासवर्ड, सेक्सटॉर्शन, शेअर ट्रेडिंग अशा माध्यमांतून सायबर भामट्याने २०२४ मध्ये राज्यात तब्बल सात हजार ६३४ लाख कोटीं लोकांकडून लुबाडले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात हा आकडा ६३ कोटी ८५ लाख इतका आहे. मुंबईत सर्वाधिक ८८८ कोटी २९ लाख, तर पाठोपाठ ठाणे शहरात १७४ कोटी ४ लाख रुपयांचा चुना सायबर भामट्यांनी लोकांना लावला आहे.
बहुतांश सायबर गुन्हेगारांचे नेटवर्क परदेशात असल्याने तपासाला मर्यादा येतात. याशिवाय देशांतर्गत गुन्ह्यांमध्ये आरोपी इतर राज्यांमधून गुन्हे करतात. त्यामुळे सायबर चोरट्यांची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी काही सुधारणा व्हायला हव्यात. त्यामध्ये 'एनआयए'च्या धर्तीवर सायबर गुन्ह्यांसाठी स्वतंत्र तपास संस्था स्थापन करायला हवी. जिचे कार्यक्षेत्र भारतभर असावे. बँकिंग प्रणालीत देखील काही बदल अपेक्षित आहेत. एका व्यक्तीच्या नावे एकच मोबाइल सीमकार्ड हा नियम हवा. याशिवाय लोकांनी सजग रहावे.
सुभाष ढवळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर.