नागरिकांनो सावधान! सायबर चोरटे पाठवत आहेत ‘अटकेची नोटीस’, धमकी आल्यास पोलिसांशी संपर्क साधा

Cyber Crime : मुंबई पोलिसांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
Mumbai Police Commissioner Cyber Crime
pudhari1
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : Mumbai Police Commissioner : मुंबईसह महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सायबर चोरटे फसवणुकीसाठी विविध प्रकारच्या क्लृप्त्या वापरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. असाच एक नवीन प्रकार समोर आला आहे. मुंबईत अनेक नागरिकांना पोलिस आयुक्तांच्या नावाने सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप, ई-मेल, तसेच मेसेज व फोन करून कायदेशीर कारवाईचा धाक दाखवला जात असून अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. पण असे कॉल आल्यास अथवा मेसेजे आल्यास न घाबरता थेट पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केले आहे.

मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी शनिवारी लोकांना ईमेल, फोन कॉल किंवा मेसेजिंग ॲप्सद्वारे खोटी ‘अटक सूचना’ मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. ‘मुंबई पोलिस आयुक्तांकडून अटकेची नोटीस मिळाल्यास पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावे. मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या वतीने ई-मेल, व्हॉट्सॲप, एसएमएस किंवा फोन कॉलवर आलेल्या कोणत्याही बनावट अटकेच्या सूचनेवर विश्वास ठेवू नका. अशा प्रकाराला प्रतिसाद देऊ नका, असे त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

फेक नोटीसमध्ये काय आहे?

सोशल मिडिया वापरकर्त्यांना अज्ञात व्यक्तीकडून पाठवण्यात आलेली फेक नोटीस इंग्रजी भाषेत आहे. या नोटीसीत प्राप्तकर्त्याला पोलीस आयुक्त कार्यालयात येण्यास सांगितले आहे. त्यामध्ये असाही दावा करण्यात आलाय की, तुम्ही पोर्नोग्राफीशी संबंधित प्रकरणात गुंतलेले आहात. विशेष बाब म्हणजे या नोटीसमध्ये सीबीआयचा देखील उल्लेख आहे. अशा प्रकारची नोटीस पाठवून अज्ञात व्यक्तीकडून तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे वेळीच सतर्क व्हा, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.

फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?

सायबर गुन्हेगारांनी फोन करून गुन्ह्यांत अडकण्याची भीती दाखवल्यास घाबरून जाऊ नये. कारवाईची धमकी दिल्यास थेट फोन बंद करावा. याबाबत घरच्यांना माहिती द्यावी. सायबर चोरट्यांनी पैशाची मागणी केली तर ते पैसे त्यांना न देता तातडीने पोलीसांना संपर्क साधून त्यांना याची माहिती द्यावी.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news