

अशोक मोराळे
तुमच्या बँक खात्यातून मनीलॉन्ड्रिंग झाले आहे. तुमचा मानवी तस्करी आणि ड्रगमध्ये सहभाग आहे. तुम्ही ड्रग घेता. शरीरात लपवून त्याची तस्करी करता. तुम्हाला अटक होऊ शकते. खात्रीसाठी आम्हाला तुमची थर्मल इमेजिंग करावी लागेल, अशी भीती दाखवून तुमच्याशी जर कोणी स्काईप अॅपवर व्हिडीओद्वारे संपर्क साधत असेल, तर वेळीच सावध व्हा... कारण, तो सायबर चोरट्यांनी तुमच्यासाठी लावलेला सापळा आहे.
मागील काही दिवसांत शहरात असे दोन प्रकार घडले आहेत की, ते तुम्हाला वेळीच विचार करण्यास भाग पाडतात. कारवाईची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी दोन तरुणींना स्काईपद्वारे संपर्क करून तपासणीच्या नावाखाली विवस्त्र होण्यास भाग पाडले. वेळीच खबरदारी नाही घेतली तर तुम्हीदेखील सायबर चोरट्यांच्या या टोळीची शिकार होऊ शकता. सायबर चोरटे नागरिकांना विविध प्रलोभनाबरोबरच भीती दाखवून दररोज लाखोंचा गंडा घालत आहेत. मात्र आता या चोरट्यांची मजल आर्थिक फसवणुकीबरोबरच तपासणीच्या नावाखाली महिलांना विवस्त्र होण्यास भाग पाडून विनयभंग करण्यापर्यंत गेली आहे. प्रसंगी ते व्हिडीओ संपर्काचे स्क्रिन रेकॉर्डिंग करून ब्लॅकमेल करू शकतात. आधी पार्सलमध्ये ड्रग सापडल्याचे सांगून धमकावत होते. मात्र, आता तपासणीसाठी थर्मल इमेजिंग करायचे असल्याचे सांगून तरुणींना विवस्त्र होण्यास भाग पाडत आहेत. याबाबत स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
.
सदाशिव पेठेत राहणार्या 30 वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, तरुणी शहरातील एका आयटी कंपनीत नोकरी करते. सायबर चोरट्याने तिच्यासोबत संपर्क साधला. तुमच्या नावाने मलेशिया येथे एक पार्सल पाठविण्यात येत असून, त्यात बनावट 12 एटीएम, पासपोर्ट आणि 140 ग्रॅम एमडी (अमली पदार्थ) मिळून आले आहे. तरुणीने त्या पार्सलशी आपला काही संबंध नाही असे सांगितले. मात्र, तरीदेखील सायबर चोरट्यांनी त्यांना भीती दाखवत पोलिसांचे ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल, असे सांगितले. पुढे तरुणीला दिल्लीतील वसंत कुंज पोलिस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगून सायबर चोरट्याने तपासणीसाठी बँकेत पैसे पाठवायला लावले. यानंतर तरुणीने सायबर चोरट्यांनी दिलेल्या वेगवगेळ्या यूपीआय आयडीवर 2 लाख 22 हजार पाठवले. सायबर चोरट्यांनी तरुणीला फोन करून तुम्ही ड्रग घेता, शरीरात लपवता का, असे विचारून थर्मल इमेजिंग करायचे असल्याचे सांगितले. सायबर चोरट्यांनी व्हिडीओ कॉल करून तरुणीला विवस्त्र होण्यास भाग पाडले.
दुसर्या घटनेतदेखील अशाचप्रकारे एका पार्सल फ—ॉडच्या घटनेत तरुणीला चक्क ऑन कॅमेरा तपासणीच्या नावाखाली अंगावरील तीळ दाखवण्यास भाग पाडले. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात आयटी अभियंता असलेल्या एका तरुणीने फिर्याद दिली. या तरुणीलादेखील ब्लॅकमेल करत पाच महिन्यांत तब्बल 14 लाखांचा गंडा घालण्यात आला. फिर्यादी 28 वर्षीय तरुणी लोहगाव परिसरात राहाते. तिला नोव्हेंबर 2023 मध्ये फेडेक्स कंपनी, मुंबई आणि नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) अधिकारी असल्याचे भासवण्यात आले. तिला सांगण्यात आले की तिच्या नावाने तैवानला पार्सल चालले आहे. यात पाच पासपोर्ट, आयसीआय बँकेचे सहा क्रेडिट कार्ड आणि 950 ग्रॅम ड्रग्ज सापडले आहे. हे पार्सल नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो मुंबईने पकडले आहे. तसेच तुमचे बँक खाते दहशतवाद्यांशी संबंधित असल्याची भीती घातली. त्यानंतर 13 लाख 94 हजार रुपये चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यात वर्ग करून घेतले. तसेच आमची लेडी ऑफिसर बोलत असून, शरीरावरील तीळ स्काईप आयडीवरून दाखविण्यास भाग पाडले
तुम्ही स्काईप ओपन करता. तसे तुम्हाला समोरील व्यक्ती क्राइम ब—ँचचा अधिकारी असल्याचे ओळखपत्र दाखवतो. तुम्ही त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवता.
प्रलोभनापासून दूर राहा
सायबर ठग तुम्हाला घाबरवतात, त्यासाठी आलेल्या कॉलची न भीता खात्री करा, काही
संशयास्पद वाटले तर पोलिसांशी संपर्क करा.
सर्व प्रथम तुम्ही पार्सल पाठवले आहे की नाही, याची पडताळणी करा. एखाद्याने तुमच्या नावे
पार्सल पाठवले असेल आणि समोरील व्यक्ती त्यामध्ये अमलीपदार्थ आहेत, असे सांगत
असेल, तर घाबरू नका.
स्काईपद्वारे सध्यातरी पोलिस किंवा नार्कोटीक्स ब्युरो अचानक फोन करून तुमची चौकशी करत नाहीत. तुम्ही जर असा मोठा गुन्हा केला तर ते थेट तुम्हाला घरी येऊन चौकशीसाठी ताब्यात घेतील. त्यामुळे स्काईप चौकशीवर विश्वास ठेवू नका.
मनीलॉन्ड्रिंगच्या गुन्ह्याची भीती दाखवली तरी तुम्ही तुमच्या बँक खात्याची माहिती देऊ नका. ऑनलाइन पैसे ट्रान्स्फर करण्याचे टाळा. तसेच अशी कोणतीही तपास यंत्रणा तुमची स्काईपद्वारे थर्मल स्क्रिनिंग करतील.
थोडी खबरदारी अन् प्रसंगावधान दाखवले तर तुम्ही फसवणूक
टाळू शकता.
सुरुवातीला तुम्हाला फेडेक्स कुरिअरमधून बोलतोय, असा फोन येतो.
तुमच्या नावाने तैवान, कुवेत, इराण, इराकमधून पार्सल आले आहे किंवा तुम्ही पाठवले आहे, असे सांगितले जाते.
पुढे तुमच्या पार्सलमध्ये तीन- चार पासपोर्ट, अमलीपदार्थ, कपडे आढळून आले आहेत.
त्यानंतर तुम्हाला लगेच मुंबई नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोमधून बोलतोय. तुमच्या पार्सलमध्ये अमलीपदार्थ आढळून आल्यामुळे तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येतोय, असा दम भरला जातो.
तुम्ही घाबरून जाता, कारण सायबर ठगाने अगोदरच तुमची काही माहिती मिळवलेली असते, तो जे सांगतो त्यामुळे तुमचा विश्वास बसतो.
मुंबई क्राइम ब—ँचच्या अधिकार्याचे नाव वापरून सायबर ठगाचा दुसरा साथीदार तुमच्याशी बोलतो. जर तुम्ही असे काही केले नसेल, तर तुमची चौकशी आम्हाला करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला आम्ही एक ऑनलाइन स्काईपची लिंक पाठवतो ती तुम्ही जॉइन करा आणि तेथेच तुम्ही जाळ्यात अडकता.
अगोदरच तुम्ही घाबरलेले असता, शिवाय त्यांच्याकडून हा तपास फार गोपनीय आहे. कोणाला याबाबत वाच्यता करू नका नाहीतर तेदेखील अडचणीत येतील,