Lawrence Bishnoi Gang : बिष्णाेई गँगची दहशत!

राजकीय नेते बाबा सिद्दीकीची हत्या, अभिनेता सलमान खान, दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार अन्‌ आता अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार या साऱ्या घटनांनी बॉलीवूडमध्ये दहशतीचे सावट पसरले आहे.
Lawrence Bishnoi Gang
Lawrence Bishnoi pudhari photo
Published on: 
Updated on: 

नरेंद्र राठोड, सुरेश साळवे ठाणे

राजकीय नेते बाबा सिद्दीकीची हत्या, अभिनेता सलमान खान, दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार अन्‌ आता अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार या साऱ्या घटनांनी बॉलीवूडमध्ये दहशतीचे सावट पसरले आहे. या साऱ्या घटनांची जबाबदारी कुख्यात बिष्णोई गँगने घेतली आहे. आम्ही देशप्रेमी अन्‌ भगतसिंग यांच्या विचारांचे आहोत, असे सांगत आणि काळवीट शिकारीचे कारण पुढे करीत बिष्णोई टोळी सलमान खानच्या नावावरून वारंवार बॉलीवूड जगतात उपद्रव करीत आहे.

पण वास्तवात बिष्णोई टोळीचे हे सारे नाटक फक्त एक्स्टॉर्शन मनीचा गेम आहे. स्वतःला क्रांतिवीर भगतसिंग यांच्या विचारांचे अनुयायी म्हणून घेणारे कुणाही सभ्य माणसाला विनाकारण त्रास देऊ शकत नाहीत आणि बेईमानीने कुठल्याही व्यक्तीकडून खंडणीही उकळू शकत नाहीत. साहजिकच जगाला दाखवलेले देशप्रेमाचे खोटे मुखवटे जपण्यासाठी सलमानच्या काळवीट शिकारीचे कारण पुढे करून वारंवार बॉलीवूडमध्ये उपद्रव करायचा अन्‌ त्याआडून खंडणी उकळायची हाच सारा प्लॅन बिष्णोई गँगचा आहे.

बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफवर गेल्या आठवड्यात मुंबईच्या जुहू परिसरात तीन हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात टायगर सुदैवाने सुखरूप बचावला. या हल्ल्याची जबाबदारी कुख्यात गुन्हेगार टोळी म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख असलेल्या बिष्णोई गँगने घेतली आहे. अनिल पंडित अनमोल बिष्णोई या नावाने फेसबुकवर पोस्ट करून ही जबाबदारी घेण्यात आली आहे. अनिल पंडित आणि हरमन संधू हे दोघेही कुख्यात गुंड या हल्ल्यामागील सूत्रधार असल्याची माहिती समोर आली आहे.

Lawrence Bishnoi Gang
TMC Engineer Promotion : ठाणे महापालिकेतील आठ उपअभियंत्यांना पदोन्नतीचा मार्ग मोकळा

आम्ही या टायगरला फोनवरून समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण तो ऐकला नाही. म्हणून आज त्याला चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले आहे. जो कोणी आमचे म्हणणे ऐकणार नाही किंवा सलमान खानसोबत काम करेल, त्याचा पुढचा नंबर असेल... वेट अँड वॉच... अशा शब्दांत सोशल मीडियावर बिष्णोई गँगने अख्ख्या बॉलीवूडला धमकावले आहे. काळवीट शिकारीचे प्रकरण वारंवार पुढे करीत सलमानशी वैर असल्याचे भासवून बिष्णोई टोळी साऱ्या बॉलीवूडमध्ये दहशत पसरवण्याच्या प्रयत्नात आहे.

पण वास्तवात सलमान खान फक्त बहाणा असून बॉलीवूडमध्ये दहशत पसरवून खंडणी उकळण्याचा हा सारा बिष्णोई गँगचा छुपा मनसुबा आहे. बिष्णोई टोळीतले गुंड परदेशात बसून दररोज कुठल्या ना कुठल्या नेत्याला अथवा व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकावत असतात. आता या टोळीची नजर बॉलीवूडवर असून येथील खोऱ्याने होणाऱ्या कमाईतून त्यांना देखील हिस्सा हवाय. स्वतःला क्रांतिवीर भगतसिग यांच्या विचारांचे अनुयायी म्हणवून घेणारे सरळ सरळ तर कुणाही बॉलीवूड सेलिब्रिटीस खंडणीसाठी धमकावू शकत नाही, म्हणून मग सलमानचे नाव पुढे करून सोशल मीडियावरून हेरलेल्या नवख्या शूटरांचा वापर करून ही गँग बॉलीवूडमध्ये वारंवार असे भ्याड हल्ले करीत आहे हे आता सर्वश्रुत होत आहे.

काळवीट शिकार केली म्हणून सलमान खान आमचा वैरी आहे इतपत म्हणणे तर ठीक; पण सलमानसोबत जो काम करेल त्याला मारून टाकू ही भाषा करणारी बिष्णोई टोळी स्वतः पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रांशी संबंध ठेवून आहे. बिष्णोई गँगचे पाकिस्तानातील अनेक गुंड व माफिया टोळीशी संबंध आहेत. बिष्णोई गँगला शस्त्र व हत्याराचा पुरवठा पाकिस्तानातून होतो. तर ड्रग्ज तस्करीत देखील बिष्णोई टोळी पाकिस्तानमधील गुंडांची मदत घेत असल्याचे तपास यंत्रणांच्या चौकशीतून स्पष्ट झाले आहे. सलमानसोबत काम करणे बिष्णोई टोळीच्या नजरेत अक्षम्य गुन्हा असेल तर मग आपल्या देशात दहशतवाद पसरवणाऱ्या पाकिस्तानसोबत संबंध ठेवणे हा दहशतवादीपणा नाही का, याचे उत्तर बिष्णोई टोळीकडे कदाचित नसेल.

विचार, तत्त्व, देशप्रेमाची भाषा करणारी बिष्णोई टोळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून देशातील तरुणाईत सतत आम्ही जे करतोय ते देशप्रेम आहे हे भासवत असते. या टोळीच्या जाळ्यात अनेक तरुण अडकतात. त्यापैकी काही तरुणांना हेरून ही टोळी परदेशात स्थायिक करण्याचे व पैशाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले घडवून आणत असते. मुंबईत बिष्णोई टोळीने आतापर्यंत घडवून आणलेल्या सर्व हल्ल्यातील आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे.

Lawrence Bishnoi Gang
Thane Metro Project : कशेळी डेपोत पहिली मेट्रोगाडी दाखल

या सर्व पकडले गेलेल्या शूटरांना आपण किती मोठा गुन्हा करतोय याचे भानही नसते. तर त्यांच्या मनात ते काहीतरी मोठे व चांगले काम करीत आहेत असे सतत रुजवण्यात येते. एकीकडे हल्ला झाल्यानंतर विदेशात लपून बसलेले गँगस्टर मोठ्या अहंकारात आम्ही हे घडवून आणलेय याची जबाबदारी सोशल मीडियावर घेतात. तर दुसरीकडे हल्ल्यात वापरलेल्या शूटरांची ही टोळी नंतर साधी खबरही घेत नाही. सोशल मीडियावरून हेरलेल्या शूटरांचा ही टोळी फक्त ‘यूज अँड थ्रो’ असा वापर करते.

काही काळापूर्वी मुंबई-ठाण्यात रवी पुजारी व सुरेश पुजारी या टोळीने देखील अशाच प्रकारे उपद्रव सुरू केला होता. यूपी-बिहारमधून भाड्याने शूटर आणून ही टोळी एखाद्या बिल्डर व व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला करायचे. त्यानंतर या हल्ल्याचे उदाहरण पुढे करून इतर १०० जणांना विदेशात बसून हे पुजारी ब्रदर धमकावत असत. पुजारी गँग बिल्डर, व्यापारी यांना धमकावण्याइतपतच थांबली नव्हती तर राज्यातील अनेक आमदार, राजकीय नेत्यांना देखील ही पुजारी गँग खंडणीसाठी धमकी देत असे. पण नंतर हाच पुजारी गँगचा एक्स्टॉर्शन गेम अंडरवर्ल्डमध्ये चिंधीगिरी म्हणून ओळखला जाऊ लागला.

नंतरच्या काळात तर काही राजकीय नेते व बिल्डर आपल्या प्रतिस्पर्ध्याला धमकावण्यासाठी पुजारी टोळीचा वापर करीत असत अन्‌ प्रतिस्पर्ध्याला फक्त धमकावण्यासाठी पुजारी टोळीला चिरीमिरी दक्षिणा देत असत. त्यावेळी काही बॅड कॉप इमेज असलेले पोलिस अधिकारी देखील पुजारी गँगचा वापर आपल्या फायद्यासाठी करून घेत असत. पुजारी टोळीने एखाद्या बिल्डरला पाच कोटीच्या खंडणीसाठी धमकीचा फोन केला, की काही वेळेतच या पोलिस अधिकाऱ्यांची माणसे त्या बिल्डरकडे पोहोचत व पुजारीला पाच कोटी देण्यापेक्षा आम्हाला दोन कोटी दे, आम्ही तुझे पुजारी गँगपासून प्रोटेक्शन करू, असा सारा गेम त्यावेळी चालायचा. सध्या बिष्णोई टोळीचे कारनामे देखील अशाच चिंधीगिरीच्या वाटेवर आहेत हे त्यांच्या कारनाम्यांवरून दिसून येतेय.

लॉरेन्स बिष्णोई याला राजकीय पाठिंबा असल्यानेच तो अनेकवर्षे कारागृहात राहून शिक्षा संपल्यावर चार टोळक्याच्या जीवावर परराज्यातील तरुणांना हाताशी धरून आपली गँग चालवत आहे. थोडक्यात सदर बिष्णोई गँग म्हणजे पकडू इलेव्हन असल्याचे चित्र समोर आले आहे. सध्या मुंबईसोबत ठाण्यात बिष्णोई टोळी फोफावत आहे. अनेक तरुण अनेक कारणास्तव या टोळीत सामील होत आहेत. दोन ते तीन गुन्हे असलेले गुन्हेगार भाई बनण्यासाठी धडपड करून बिश्नोई गॅंगमध्ये सामील होत आहे. त्यानंतर बिश्नोई टोळी ही या तरुणांचा वापर करून त्यांच्या हिमतीवर ठाण्यात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे ठाण्यासारख्या शहरात बिष्णोई गॅंग जोर धरीत आहे. या टोळीचा सुरू असलेला बोलबाला हा येणाऱ्या काळात ठाणे पोलिसांना आव्हान ठरणार आहे.

अंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेला डॉन दाऊद इब्राहिम हे साम्राज्य राजकीय नेते आणि पोलिसांची देण आहे. आज दाऊद इब्राहिम याचे साम्राज्य जवळपास संपुष्टात आलेले आहे. काळ्या धंद्यातून मिळणारे अब्जो रुपयांचा उत्तराधिकारी आजच्या स्थितीला कुणीच नाही. याच सम्राज्यावर कब्जा करण्यासाठी रिल्स भाई बिष्णोई आता प्रस्थापित होतोय. त्यालाही दाऊद प्रमाणे विविध राज्याच्या पोलीस आणि सत्ताधारी राजकीय पक्ष हे खतपाणी घालीत आहेत. दाऊद सारखा बिष्णोई नावाचा भस्मासूर दिवसेंदिवस फोफावत चालला आहे. ही येणाऱ्या काळातील मोठी सामाजिक चिंता आहे.

पंजाब मधील सिंगर मुसेवाला हत्येनंतर प्रकाश झोतात आलेला लॉरेन्स बिष्णोई हा येणाऱ्या काळातील ‘हिंदू डॉन’ म्हणून ओळखला जाणार आहे. त्यामुळे मुंबईसह देशातील काळ्या साम्राज्यावर राज्य करणाऱ्या बिष्णोई याच्या गँगचा पसारा वाढत चालला आहे. याच्यामागे राजकीय नेत्यांचे मोठे षडयंत्र असल्याचे दिसत आहे. रिल्सच्या माध्यमातून आणि प्रसारमाध्यमाच्या आशीर्वादाने बिष्णोई हा गरम रक्ताच्या तरुणांचा आयकॉन झाला आहे. विविध राज्याच्या वाटचालीनंतर बिष्णोई गँगने मुसावाल्याची हत्या केल्यानंतर हिंदू डॉन म्हणून बिष्णोईला पोस्टरवर आणून गँगचा विस्तार हा राज्यातून शहरावर प्रस्थापित करण्याचा यशस्वी प्रयत्न सुरु झालेत. मुंबई अंडरवर्ल्ड मध्ये प्रथम उत्तरप्रदेश येथील सराईत गुन्हेगारांना हत्या आणि वसुलीसाठी मैदानात उतरवून खळबळ उडवून दिली. तसाच प्रकार मात्र आता बिष्णोई गँगमध्ये सुरु आहे.

विविध शहरातील तरुणांना आपल्या रिल्स आयकॉन डॉनच्या टोळीत ओढले जाऊ लागले आहेत. खरेतर ही मुहूर्तमेढ ही मुसावाला हत्येत दिसून आली. यात महाराष्ट्रातील पुण्याचा तरुण हा हत्येत सहभागी असल्याने बिष्णोई टोळीची महाराष्ट्रात मोठ्या शहरात जाधव या तरुणामुळे झाली. आज मुंबईत बिष्णोईची दहशत आणि गॅंगची दहशत असे मिळून बिष्णोई गँगने मुंबई बॉलिवूडवर कब्जा करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यासाठी बॉलिवूड अभिनेता यांना टार्गेट करीत बॉलिवूडमध्ये दहशत माजविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

यामध्ये सलमान खान याला ठार मारण्याची धमकी, बाबा सिद्धीकी, टायगर श्रॉफ यांना टार्गेट करून हत्या, हत्येचा प्रयत्न आणि प्रोटेक्शन मनी याचा गुपचूप सुरु असलेल्या बिदागीला आव्हान देत वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी गरीब घरातील अजाण तरुणांचा वापर करण्यात येतो. या शार्प शुटरांना आपला आका कोण आहे हे देखील माहीत नसते मात्र भाई बनण्याची प्रबळ इच्छा, यामुळे या गँगवारमध्ये सुशिक्षित तरुणांचाही समावेश पूर्वीही होता आणि आजही आहे.

बिष्णोई टोळीत अनाडी शार्पशूटर

बिष्णोई टोळीत सहभागी असलेले शार्पशुटर हे अनाडी असल्याचे चित्र आहे. म्हणूनच बिष्णोई टोळी हत्या सारख्या गुन्ह्यात परराज्यातील तरुणांचा वापर करीत असल्याचे समोर आले आहे. टायगर श्रॉफ गोळीबाराच्या घटनेत शार्प शुटरला बंदूक चालवण्याचे प्रशिक्षणच दिले नसल्याचे समोर येत आहे. केवळ पोकळ भरती करून पर राज्यातील तरुणांकडून हत्या करून घेत स्थानिक तरुणांना त्यात सामील करून पोलीस रेकॉर्डवर आणण्याचा डाव असल्याचे दिसत आहे. ठाण्यात अनेक तरुण हे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचं समोर येत असतानाच त्याची चर्चाही जोरदार सुरू आहे. या टोळीचा वापर राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी करून घेत असून बिश्नोई याला केवळ आपल्या गॅंगचे अस्तित्व काळ्या बाजारातील मालमत्तेवर कब्जा करण्याच्या खटाटोपात पुरतेच मर्यादित असल्याचेही दिसत आहे.

बिष्णोई गँगचे अस्तित्व नाही; पिलावळीचा सुळसुळाट

तसे पहिले तर बिष्णोई गँगचे स्थानिक पातळीला काहीच अस्तित्व नाही म्हणूनच बिष्णोई नव्या अनाडी तरुणांची भरती शार्प शुटर म्हणून करताना दिसत आहे. मुंबईच्या मिल बंद पडल्यानंतर बेकार सुशिक्षित तरुण हे मध्य मुंबईत विविध गँगवॉर मध्ये सामील झाले. त्यामुळेच मुंबईत गँगवारचा भडका उडाला. तो राज्यालाही महागात पडला. तीच परिस्थिती आज बिष्णोई गँगमध्ये मेगा भरती सुरु असली तरी तिला पूर्वीप्रमाणे आयुष्य राहिले नाही शिल्लक राहिली ती फसवणूक आणि जेल, कुटुंबाची वाताहत यामुळे बिष्णोई गँग सोशल मीडिया आणि रिल्सच्या माध्यमातून चर्चेतच राहील. अंडरवर्ल्ड मध्ये प्रत्येक डॉन प्रत्यक्षात मैदानात उतरले. गॅंगची कमान सांभाळली म्हणूनच अनेक गँग ही आजही मुंबईत आहेत. अन ते बिष्णोई गॅंगची दखलही घेत नसल्याचे चित्र आहे.

पोलिसांच्या डोक्याला ठरतोय ताप

मुंबईत भलेही बिष्णोई गँगचा बोलबाला आहे. तो सोशल मीडियावर आणि इन्स्टा फेसबुक आणि रिल्स मध्येच अस्तित्व आहे. शहरात मात्र त्यांच्या व्हाया व्हाया संपर्कात असलेल्या तरुणांची पिलावळ आहे. त्यातच ठाण्यातही पिलावळ फोफावत आहे. या गोष्टी आता समोर येत आहेत. दोन गुन्हे असलेला 31 वर्षीय गणेश लांडगे हा ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात राहतो. टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी 14 वा आरोपी पकडला. त्यात त्याच्याकडे दोन पिस्टल आणि 29 जिवंत कडून हस्तगत करण्यात आले. ठाण्यातील गरीब घरचा विवाहित तरुण अशा प्रकारे बिष्णोई गँगशी संबंधित असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तर त्याच्या कुटुंबियांचे मात्र आमचा मुलगा निर्दोष असल्याचे सांगत आहे. त्याचे दोन सहकारी पळून जाण्यात यशस्वी झाले आणि गणेश लांडगे पोलिसांच्या तवाडीत सापडला. तो मोबाईल वापरत नव्हता. टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी त्याचा संबंध आहे असे पोलीस सांगत आहेत. अशा प्रकारे अनेक तरुण हे बिष्णोई टोळीशी सलग्न आहेत. ही पिलावळ ठाण्यात मुंबईत पसरत चालली असून ठाणे पोलिसांच्या डोक्याला ताप ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.