

डोंबिवली (ठाणे) : छुप्या मार्गाने देश-विदेशातून आणलेल्या एमडी अर्थात मेफेड्रॉन नावाचा मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या अंमली पदार्थाचे कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात चोरी-छुपे वितरण करणाऱ्या तिघा तस्करांना कल्याण परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या खास पथकाने जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.
बदलापूर-पाईपलाईन क्रॉस तळोजा एमआयडीसी रोडला असलेल्या खोणी-पलावातील एका फ्लॅटवर धाड टाकून करण्यात आली. तब्बल २ कोटी १२ लाख रूपयांचा एमडीचा साठा हस्तगत करण्यात आला असून अटक आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
२६ जून रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या पार्श्वूमीवर जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, अपर पोलिस आयुक्त संजय जाधव, परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण-डोंबिवलीत गुरूवारी जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवाय अंमली पदार्थ विरोधी सप्ताहात शाळा-कॉलेजमधील विद्यार्थांना समुपदेशनाचे कार्यक्रम देखिल आयोजित करण्यात आले असतानाच पोलिसांनी ड्रग्स विरोधी केलेली कारवाई या पार्श्वभूमीवर अधोरेखित झाली आहे.
बदलापूर-पाईपलाईन क्रॉस तळोजा एमआयडीसी रोडला असलेल्या खोणी-पलाव्याच्या डाऊन टाऊनमधील एका फ्लॅटमध्ये संशयास्पद हालचाली सुरू असल्याची, तसेच सदर फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांकडे अंमली पदार्थांचा साठा असल्याची खबर खासगी गुप्तहेरांकडून मिळाली होती. वेळ न दवडता डीसीपी अतुल झेंडे यांनी कोणत्याही परिस्थितीत या तस्करांना जेरबंद करण्याची योजना आखली. त्याप्रमाणे डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदिपान शिंदे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक राम चोपडे, सपोनि कलगोंडा पाटील, सपोनि संपत फडोळ, पोशि गणेश बडे, पोशि किशोर दिघे या पथकाने डाऊन टाऊन परिसरात जाळे पसरले होते. तेथील एका इमारतीतील घुसून फ्लॅटवर धाड टाकली असता पोलिसांच्या हाती मेफेड्रॉनचे मोठे घबाड हाती लागले. या फ्लॅटमध्ये २० वर्षाचा तरूण हाती लागला. चौकशी दरम्यान त्याने अन्य दोघांची माहिती दिली. पोलिसांनी रातोरात शोध मोहीम राबवून अन्य दोघांना देखिल ताब्यात घेतले. कारवाई दरम्यान पथकाने २० आणि २६ वर्षांच्या दोघा पुरूषांसह २१ वर्षीय तरूणीच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमा अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या त्रिकुटाकडून १.९३ किलो वजनाचा मेफेड्रॉन (एमडी) साठा हस्तगत करण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले. यात अन्य काही जणांची नावे निष्पन्न झाली असून तेही लवकरच गजाआड असतील. यातील दोघे आरोपी अटक केलेल्या महिलेच्या मदतीने एमडी पावडर विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हा साठा कुणाकडून aank कुठून आणला ? तो कुठे वितरीत अर्थात विक्री करण्यात येणार होता ? यामागे किती गुन्हेगार आहेत ? याचा शोध घेण्यात येत आहे. अंमली पदार्थांच्या वितरण/विक्रीबाबत कुणाला काही माहीती असल्यास कल्याणच्या अंमली पदार्थ विरोधी कक्ष, तसेच मानपाडा पोलिस ठाण्याशी दुरध्वनी क्रमांक ०२५१-२४७०१०४ यावर संपर्क साधावा. माहीती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते, असेही आवाहन पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना केले.