

Kalyan Dombivli Ring Route Project
सापाड : योगेश गोडे
कल्याण-डोंबिवली महापालिकेचा बहुचर्चित आणि महत्वाकांक्षी रिंगरूट प्रकल्प सध्या वादाच्या भोवर्यात अडकलेला आहे. प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यातील काम सुरू असताना सापाड, वाडेघर, कोळीवली, उंबर्डे आदी गावांच्या मुख्य रस्त्यांना थेट छेद देणार्या रस्त्यामुळे रिंगरुटच्या मार्गात उड्डाणपुलाभावी क्रॉसिंग धोकादायक ठरणार असल्याने ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
परिणामी पालिका प्रशासनाच्या जोर-जबरदस्तीचा निषेध करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले असून रिंगरूट मार्गातील क्रॉसिंगमुळे ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत रिंगरूट मार्गाचे काम चालू देणार नसल्याचा इशारा सापाड ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला. त्यामुळे महापालिका आणि एम.एम.आर.डी.ए. ग्रामस्थांच्या आक्रोशाला कसे शांत करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रिंगरूट मार्गावरील क्रॉसिंगवर उड्डाणपुल हवा असल्याची मागणी जोर धरू लागली आहे. सध्या या रस्त्याच्या मार्गामध्ये कुठेही उड्डाणपुलाचीव्यवस्था नसल्याने गावकरी, शालेय विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिक यांना रस्ता ओलांडताना मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रकल्प सुरू झाल्यावर भविष्यात मोठ्या प्रमाणात अपघात घडू शकतात, असा इशारा ग्रामस्थांकडून दिला जात आहे. ग्रामस्थांनी एमएमआरडीएच्या अधिकार्यांकडून उड्डाणपुलाच्या मागणीवर ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा चौथ्या टप्प्यातील रिंगरूटचे काम थांबवले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. एमएमआरडीएचे आश्वासन, पण पालिकेच्या मंजुरीशिवाय अडथळा एमएमआरडीएच्या अधिकार्यांनी ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करण्याचे आश्वासन दिले असले तरी त्यासाठी केडीएमसीचा हिरवा कंदील आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सापाड ग्रामस्थांनी स्पष्ट केले की, जर प्रशासनाने वेळेत निर्णय घेतला नाही, तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. आंदोलन उग्र रूप धारण केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
रिंगरूटच्या मार्गातील अपघाताला जबाबदार कोण? असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे. उड्डाणपुलाला डावलून रिंगरूट मार्ग तयार केला तर ग्रामस्थांमध्ये आक्रोश उफाळून येईल. उड्डाणपुलाच्या मागणीसाठी लोकशाही पद्धतीने आंदोलन केले जातील. तरीही प्रशासनाला जाग आली नाही तर आंदोलन उग्र रूप धारण करेल. मग उद्भवणार्या परिणामांना पालिका प्रशासन जबाबदार राहणार आहे. जोपर्यंत ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत रिंग रोड रस्त्याचे काम होऊ देणार नाही.
दिनेश गणेश मढवी, ग्रामस्थ सापाडगाव
कल्याण शहराची वाहतूककोंडी सोडवण्यासाठी प्रशासन अपयशी ठरल्याने वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासाठी राज्य शासनाकडून विशेष उपाययोजना कार्यान्वित करण्यात आली आहे. डोंबिवली-कल्याण, शहाड आंबिवली मार्गे थेट टिटवाळा शहरांना जोडणार्या 30 किलोमीटर रिंगरुट मार्गाला राज्यशासनाकडून 2012 साली मान्यता देण्यात आली. डोंबिवली ते टिटवाळा 30 किलोमीटर लांबी आणि 45 मीटर रुंदीच्या मार्गासाठी पालिकेकडून युद्धपातळीवर भूसंपादन सुरू करण्यात आले. 30 किलोमीटर रस्त्यासाठी 1200 कोटींचा खर्च लागणार आहे. निधीची तरतुट करण्यासाठी या 30 किलोमीटर रस्त्याचे सात टप्प्यात कामाचे विभाजन करण्यात आले आहे.