

राज्यात रोहिंगे आणि बांगला देशी घुसखोरांची समस्या दिवसेंदिवस तीव्र स्वरूप धारण करीत आहे. मध्यंतरी राज्य शासनाने घुसखोरांच्या शोधासाठी व्यापक मोहीम हाती घेण्याचा निश्चय केला होता. मात्र, याबाबतची कार्यवाही पुढे गतिमान होऊ शकली नाही. परिणामी, रोहिंगे आणि बांगला देशी घुसखोरांची घुसखोरी खुलेआम दिसत आहे. काही घुसखोरांनी तर आता राज्यात आपल्या मालमत्ता करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ही समस्या उग्र रूप धारण करण्यापूर्वीच या घुसखोरांचा शोध घेऊन त्यांची हकालपट्टी करण्याची गरज आहे.
बहुतांशी घुसखोरांची पहिली पसंती ही महाराष्ट्रच असल्याची दिसते. कारण, महाराष्ट्रासारख्या रोजगाराच्या संधी अन्य कोणत्याही राज्यात उपलब्ध नाहीत. गेल्या काही वर्षांत या घुसखोरांनी स्थानिक नागरिकांची रोजी रोटी हिरावून घेतलेली दिसते. राज्यातील बांधकाम व्यवसाय, मोठमोठ्या कारखान्यातील मजुरीची कामे, बांधकाम व्यवसाय एव्हडेच नव्हे, तर आज काल शेतमजुरीमध्येही मोठ्या प्रमाणात घुसखोरांनी शिरकाव केलेला दिसतो आहे.
हे घुसखोर मजूर अत्यल्प मजुरीच्या मोबदल्यात राबत असल्याने त्यांना रोजगारही सहजासहजी उपलब्ध होताना दिसत आहे. एक घुसखोर येऊन येथे स्थिरस्थावर झाला की, आपल्या बिरादरीतील पाच-दहा घुसखोरांच्या घुसखोरीची आणि त्याच्या रोजीरोटीची व्यवस्था करताना दिसतो. स्थानिक नागरिकांमध्ये ही घुसखोर मंडळी मिळूनमिसळून राहात असल्यामुळे त्यांच्या घुसखोरीचा स्थानिकांना थांगपत्ता लागत नाही. बहुतांश घुसखोर हे आपण बिहार किंवा उत्तर प्रदेशचे रहिवाशी असल्याचे सांगतात. पण, खोलात जाऊन हे सत्य जाणून घेण्याचा कोणी प्रयत्न करीत नाही.
महाराष्ट्रात घुसखोरी करून येणारे बहुतांश घुसखोर हे पश्चिम बंगाल मार्गे येताना दिसतात. पश्चिम बंगालमध्ये घुसखोरांना घुसखोरीसाठी मदत करणारी एक यंत्रणाच गेल्या कित्येक वर्षांपासून येथे कार्यरत आहे. बांगला देशातून किंवा म्यानमारमधून भारतात घुसखोरी करणार्या बहुतांश घुसखोरांना पश्चिम बंगालमध्येच आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड अशी बहुतांश भारतीय बनावटीची कागदपत्र त्यांना इथे उपलब्ध करून दिली जातात.
एकदा का ही कागदपत्रे हातात पडली की, हे घुसखोर देशभरात कुठेही घुसखारी करायला मोकळे होतात.परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात अशा घुसखोरांची संख्या ही किमान 2 ते 3 कोटी इतकी आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश घुसखोर महाराष्ट्रात येऊन स्थिरस्थावर झालेले दिसतात. बहुतांश घुसखोर हे मिळेल ती मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवीत असले, तरी अनेक घुसखोरांचे उद्योग हे अवैध धंद्यांशी संबंधित आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर आदी शहरांमध्ये मोठ्याप्रमाणात अवैध धंद्यांशी संबंधित घुसखोर आढळून आले होते. त्यापैकी काही घुसखोरांच्या कारवाया तर थेट देश विघातक स्वरुपाच्या असल्याचेही समोर आले होते.