

प्रमोद अडसुळे, छ. संभाजीनगर
कन्नड तालुक्यातील सिरसगावचे माजी सरपंच राजाराम ऊर्फ राजू भावसिंग चुंगडे (वय 47) यांची भरदिवसा निर्घृण हत्या करणार्या आनंद अमर राजपूत (25), समीर समद कुरेशी (20) आणि इरफान शकील शहा (20, तिघेही रा. सिरसगाव) या तिघांना पोलिसांनी 24 तासांत बेड्या ठोकल्या. जुना वाद, सूडभावना, कब्रस्तानच्या जागेचा वाद आणि अनैतिक संबंध या कारणांमुळे ही हत्या घडल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. शनिवारी (दि. 12 जुलै) सकाळी साडेअकराच्या सुमारास राजाराम चुंगडे हे आपल्या शेतातील घरासमोर मोबाईल बघत बसले होते. तेवढ्यात पल्सरवर तिघेजण आले आणि अचानक कोयत्याने जबर हल्ला चढवला. त्यांनी डोक्यात व शरीरावर आठ ते दहा वार केले. डोक्यातील घाव इतके भीषण होते की, मेंदू पूर्णपणे चिरडला गेला. बचाव करताना हाताची बोटेही तुटून पडली आणि चुंगडे जागीच ठार झाले होते.
या हत्येच्या मागे सूक्ष्म नियोजन होते. आरोपी समीर कुरेशीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी महिलेचा वेश घेतला होता. त्यासाठी त्याने कन्नडमध्ये 200 रुपयांचा सलवार टॉप खरेदी केला होता. समीर व इरफान हे श्रीरामपूरहून दुचाकीवर आले होते. त्यानंतर आनंद राजपूतला सोबत घेऊन हल्ला केला. हत्या केल्यानंतर कोयता कन्नडच्या घाटात फेकण्यात आला. तिघांनी मोबाईल बंद ठेवले होते, सिमकार्ड काढून हॉटस्पॉट वापरून पाळत टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपास करून त्यांच्या हालचालींचा माग काढला.
आरोपी समीर कुरेशीवर कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीसह गंभीर गुन्हा दाखल होता. त्या प्रकरणात मदत न केल्याने त्याने चुंगडेंवर राग धरला होता, तर इरफान शहासोबत कब्रस्तानच्या जागेवरून वाद होता. आरोपी आनंद राजपूत याला एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून चुंगडेंनी मारहाण केली होती. त्यामुळे तोही सुडाने पेटला होता.
हत्या झाल्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्यासह पथकाने तातडीने तपास सुरू केला. गावकर्यांच्या माहितीवरून पोलिसांनी जुना वाद असलेल्या आनंद राजपूतला आधी ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच तो पोपटासारखा बोलू लागला. समीर आणि इरफानसोबत मिळून हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी श्रीरामपूरवरून इतर दोघांना अटक केली.