Fake Currency Racket | बनावट नोटांची ‌‘टांकसाळ‌’!

बनावट नोटा आणि पश्चिम महाराष्ट्र यांचे कनेक्शन तसे पहायला गेले तर जुने आहे.
Fake Currency Racket
Fake Currency Racket | बनावट नोटांची ‌‘टांकसाळ‌’!Pudhari File Photo
Published on
Updated on
Summary

बनावट नोटा आणि पश्चिम महाराष्ट्र यांचे कनेक्शन तसे पहायला गेले तर जुने आहे. जवळपास पंचवीस-तीस वर्षांपासून पश्चिम महाराष्ट्र आणि सीमाभागात बनावट नोटांची चलती आहे. पूर्वी बनावट नोटा छापणे आणि त्या चलनात आणणे सहजासहजी शक्य नव्हते; पण संगणक क्रांती झाली आणि या क्षेत्रातील गुन्हेगारांसाठी जणूकाही ‌‘अल्लाउद्दीनचा जादूचा दिवाच‌’ सापडला. बनावट नोटांची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आली, पण ‌‘बनावट नोटांची ही टांकसाळ‌’ काही बंद पडलेली नाही...

सुनील कदम

देशात आणि राज्यात संगणक युगाची सुरुवात झाल्यापासून मोठ्या प्रमाणात बनावट नोटा छपाईचा गोरखधंदा चांगलाच फोफावलेला दिसतो आहे. आता तर ‌‘एआय‌’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हुबेहूब बनावट नोटा छापणे या क्षेत्रातील ‌‘तज्ज्ञां‌’च्या डाव्या हातचा मळ झाला आहे. त्यामुळे तर दरवर्षी किमान एक-दोन तरी बनावट नोटांची प्रकरणे चव्हाट्यावर येतात.

घटना क्रमांक एक : जवळपास पंचवीस वर्षांपूर्वी मिरज येथे पहिल्यांदा बनावट नोटांचा साठा आढळून आला होता. पोलिसांच्या तपासात मिरज आणि कराड येथील काही गुन्हेगारांनी मिळून हा ‌‘धंदा‌’ सुरू केला होता. त्यावेळी या टोळीकडून जवळपास 3 लाख रुपयांचे बनावट चलन जप्त करण्यात आले होते.

घटना क्रमांक दोन : 2022 मध्ये इस्लामपूर येथील एका बँकेत बनावट नोटांचा भरणा करताना एकास अटक करण्यात आली होती. अधिक तपासात सांगली नजीकच्या वारणाली येथे बनावट नोटा छापणारी एक टोळी मिळून आली होती. त्याच्याकडूनही मोठ्या प्रमाणात बनावट चलन मिळून आले होते.

घटना क्रमांक तीन : 8 जानेवारी 2024 रोजी कागल तालुक्यातील एका फार्म हाऊसवर छापा टाकून 3 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करून महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यात फैलावलेल्या रॅकेटचा पर्दापाश करण्यात आला होता. इथेही संगणकाच्या मदतीने बनावट नोटांची छपाई सुरू होती.

घटना क्रमांक चार : 11 एप्रिल 2024 रोजी कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिसांनी सातजणांची एक टोळी गजाआड केली होती. या टोळीने लाखो रुपयांच्या बनावट नोटा छापून त्या चलनात आणल्या होत्या. संगणकातील ग्राफिक डिझाईनचा वापर त्यासाठी त्यांनी केला होता. या टोळीचे कनेक्शन राज्यभर पसरले होते.

घटना क्रमांक पाच : 20 फेब्रुवारी 2025 रोजी कळंबा येथील एका टोळीला अटक करून त्यांच्याकडून काही बनावट नोटा, नोटा छपाईची सामग्री आणि काही प्रमाणात बनावट चलन जप्त करण्यात आले होते. या टोळीचे रॅकेटही संपूर्ण राज्यभर कार्यरत असल्याची माहिती पुढे आली होती.

Fake Currency Racket
Nashik Crime Diary | चोरीच्या गुन्ह्यांत पोलिसांची दमछाक

कित्येक घटना!

गेल्या पंचवीस वर्षांत प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि सीमाभागातून अशा स्वरूपाच्या कित्येक घटना चव्हाट्यावर आलेल्या आहेत. सुरुवातीच्या काळात अशा टोळ्यांकडून काही हजारात बनावट नोटा आढळून येत होत्या; पण अलीकडे हाच बनावट नोटांचा आकडा काही लाखांत आणि कोटीच्या घरात गेल्याचे दिसते. नुकतेच कोल्हापूर येथे उघडकीस आलेल्या घटनेत संबंधित टोळीकडून एक कोटी रुपयांपेक्षा अधिक बनावट चलन आढळून आलेले आहे. अशा किती टोळ्या अजून या भागात कार्यरत आहेत आणि त्यांनी नेमक्या किती बनावट नोटा चलनात आणलेल्या आहेत, त्याचा सहजासहजी थांगपत्ता लागणे जवळजवळ अशक्य स्वरूपातील बाब आहे.

रोख व्यवहारांवर भर!

या भागात अलीकडील एक-दोन वर्षात ऑनलाईन व्यवहार वाढलेले दिसत असले, तरी दैनंदिन जीवनातील अनेक व्यवहार मोठ्या प्रमाणात रोखीनेच चालतात. किराणा मालाची खरेदी, हॉटेलमधील बिलांची देवाण-घेवाण, पेट्रोल पंपांवरील व्यवहार, शेतमजुरीची देवाण-घेवाण अशाप्रकारे दैनंदिन जीवनातील जवळपास 99 टक्के व्यवहार आजही रोखीनेच चालताना दिसतात. त्यामुळे अशी ठिकाणे बनावट नोटा खपविण्यासाठी हक्काची ठिकाणे बनलेली दिसतात. आजपर्यंत उघडकीस आलेली बनावट नोटांची प्रकरणे अशाच व्यवहारातून झाल्याची बाब स्पष्ट होते.

आठवडी बाजार!

बनावट नोटा खपविण्याचे सर्वात सोयीचे ठिकाण म्हणजे गावोगावचे आठवडी बाजार! एकतर या ठिकाणी गावोगावचे शेतकरी, अत्यंत छोटे व्यापारी आणि ग्रामीण भागातील लोक आपापला माल विक्रीसाठी आणि खरेदीसाठी आलेले असतात. बनावट नोटा आजकाल बँकेतील कर्मचाऱ्यांनाही सहजासहजी ओळखू येत नाहीत, तर या ग्रामीण जनतेला त्या ओळखणे दुरापास्तच. त्यामुळे तर गावोगावचे आठवडी बाजार बनावट नोटांची हक्काची बाजारपेठ बनून गेलेली दिसत आहे.

Fake Currency Racket
Nashik Crime Diary | मोबाईलवरुन बोलता बोलता खाली पडला आणि जीव गमावला

या भागातील बनावट नोटांसह सर्वच क्षेत्रातील गुन्हेगारी रोखायची झाल्यास या भागाचा सर्वांगीण विकास होण्याची गरज आहे. या भागातील युवावर्गाला मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्याशिवाय या भागात दिवसेंदिवस फोफावत चाललेले हे दुष्टचक्र सहजासहजी थांबणार नाही.

बेरोजगारीतून गुन्हेगारीकडे!

दरवर्षी बनावट नोटा छापणाऱ्या चार-दोन टोळ्या तरी पोलिसांच्या हाती हमखास लागतात. त्यामुळे ही गुन्हेगारी कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसते आहे. त्याची कारणे इथल्या बेरोजगारीत दडली आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि सीमावर्ती बेळगाव जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रमाण राज्याच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. शिवाय या भागाचा औद्योगिक विकासही जणूकाही खुंटल्यात जमा आहे. परिणामी, बेरोजगार तरुण मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकडे वळताना दिसत आहे. आजपर्यंत बनावट नोटाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींची माहिती घेतली तर त्यातील बहुतांश तरुण उच्चशिक्षित आणि बेरोजगार असल्याचे दिसून येतात, ही एक सामाजिक चिंतेची बाब आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news