Nashik Crime Diary | चोरीच्या गुन्ह्यांत पोलिसांची दमछाक

उकल होईना : खून, दरोडा, बलात्कार प्रकरणात समाधानकारक तपास
Crime News
Crime News File Photo
Published on
Updated on

नाशिक : गौरव अहिरे

शहरात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, बलात्कार, हाणामारी आदी गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना जवळपास 100 टक्के यश मिळाले आहेत. मात्र, घरफोडी, वाहनचोरी, जबरी चोरी, चोरी या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना अपेक्षित यश मिळत नसल्याचे चित्र आहे. 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये मालमत्तेविरोधातील गुन्ह्यांची उकल कमी झाल्याचे पोलिस कारवाईतून दिसते. 2024 मध्ये शहर पोलिसांनी एकूण दाखल गुन्ह्यांपैकी 65 टक्के गुन्ह्यांची उकल केली असून, उर्वरित गुन्ह्यांची उकल झालेली नसल्याने चोरटे अद्याप मोकाट आहेत.

शहरातील गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी शहर पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई केली जाते. त्यात गुन्हेगारांची धरपकड करणे, त्यांच्याविराेधात ठोस पुरावे गोळा करणे, आवश्यकतेनुसार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे, गुन्हा शाबित करण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यानुसार काही गुन्हेगारांवर याचा वचक बसला आहे. मात्र चाेरी, घरफोडी, जबरी चोरी, वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये बहुतांश वेळा नवीन गुन्हेगारांचा सहभाग आढळून येत असल्याने त्यांना पकडण्यासाठी पोलिसांना अनेकदा अडचणी येत असल्याचे दिसते. परजिल्हा किंवा परराज्यातील चोरटे शहरात येऊन चोरी करून पसार होत असल्याने त्यांचा शोध घेणे पोलिसांसाठी तारेवरची कसरत ठरते. पोलिसांनी वाहनचोरी, घरफोडी व जबरी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये परजिल्ह्यातील चोरट्यांना पकडून गुन्हे उघडकीस आणले आहेत. मात्र, तरीदेखील मालमत्तेसंबंधित गुन्ह्यांप्रकरणी दाखल 1 हजार 762 गुन्ह्यांपैकी 503 गुन्ह्यांचीच उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे अद्याप सुमारे 71 टक्के गुन्ह्यांची उकल करणे बाकी असून, चाेरट्यांकडून नाशिककरांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्याचे आवाहन शहर पोलिसांसमोर आहे.

नाशिक
वर्षनिहाय दाखल व उघडकीस गुन्हेPudhari News Network

गुन्हे उघडकीस येण्यातील अडचणी

  • नवीन गुन्हेगारांची अद्ययावत माहिती नसल्याने शोध घेताना अडचणी येतात.

  • शहरात पुरेसे सीसीटीव्ही नसल्याने गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर नाही.

  • परजिल्हा, परराज्यातील गुन्हेगार गुन्हे करून फरार होतात.

  • पोलिसांचे खबऱ्यांचे जाळे विस्कळीत झाल्यास किंवा साक्षीदार नसल्यास अडचणी

आठ वर्षांत सर्वाधिक गुन्हे

शहर पोलिस आयुक्तालयात जानेवारी 2017 सालापासून डिसेंबर 2024 पर्यंत विविध स्वरूपाचे 30 हजार 79 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी 2024 मध्ये सर्वाधिक 4 हजार 580 गुन्हे दाखल झाले आहेत. तर कोरोना प्रादुर्भाव असल्याने 2021 मध्ये सर्वात कमी 2 हजार 820 गुन्हे दाखल होते. शहरातील वाढती लोकसंख्या, शहरीकरणामुळे गुन्ह्यांमध्येही वाढ होत असल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे चोरी, वाहनचोरी, घरफोडी, जबरी चोरीच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढते आहे.

फसविणारे, अपहरणकर्तेही अंधारात

शहरात गत वर्षी फसवणूक प्रकरणी 376 गुन्हे दाखल होते. त्यापैकी 241 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. तर 331 अपहरणाचे गुन्हे दाखल असून, त्यापैकी 263 अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. मात्र, या गुन्ह्यांमधील काही आरोपी अद्याप मोकाट असल्याने नागरिकांची आर्थिक व इतर प्रकारची फसवणुकीची उकल न झाल्याने त्यांना आर्थिक फटका बसला आहे. तर अद्याप अपहृत मुले-मुली अपहरणकर्त्यांच्याच तावडीत असल्याने पालकांना त्यांची आस लागून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news