

एकट्या महिलेला पाहून नराधमांच्या अंगात वासनेचा सैतान संचारला होता. दोघांनी त्या महिलेच्या शरीराचे लचके तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिने या दोघांना विरोध केला. त्यातूनच त्यांनी महिलेचा खून केला. 9 डिसेंबर रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास बिबवेवाडी येथील एका पालात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. महिलेच्या डोक्यात वार होते. त्यामुळे हा खुनाचा प्रकार असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. महिलेची ओळख पटलेली नव्हती. त्याचबरोबर खून करणार्यांनी कोणताही पुरावा मागे ठेवला नव्हता. अशातच एक दुचाकी पोलिसांच्या नजरेस पडते. पुढे तीच दुचाकी तपासाचा धागा ठरते आणि पोलिसांना आरोपीपर्यंत घेऊन जाते.
अशोक मोराळे, पुणे
Lust Driven Crime
पोलिस नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीने फोनद्वारे माहिती दिली. बिबवेवाडी येथील गंगाधाम चौकातील एका पालात महिला बेशुद्ध अवस्थेत पडली आहे. तिच्या डोक्यात वार आहेत. तत्काळ नियंत्रण कक्षातून ही माहिती बिबवेवाडी पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी रवाना झाले. 9 डिसेंबरचा तो दिवस होता. सकाळी पावणेअकरा वाजले असतील. पोलिसांनी महिलेला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीच्या विरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांना आता महिलेची ओळख पटविण्यापासून ते खून करणार्यांना बेड्या ठोकण्यापर्यंतची कामगिरी बजावायची होती.
दरम्यान, स्थानिक पोलिस ठाण्यांच्या पथकासोबतच गुन्हे शाखेची पथकेदेखील खुनाचा समांतर तपास करत होती. पोलिसांनी खबर्यांना अलर्ट केलं होतं. सर्व बाजूंनी खून झालेल्या महिलेची माहिती घेतली जात होती. परंतु, महिलेची ओळख काही केल्यानं पटत नव्हती. शिवाय, घटनास्थळी कोणते पुरावे नव्हते. त्यामुळे पोलिसांसमोर खुन्यांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले होते. त्यावेळी गुन्हे शाखा युनिट पाचच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी महेश बोळकोटगी होते. त्यांची टीमदेखील या खुनाच्या गुन्ह्याचा तपास करत होती. त्यांच्या टीमला परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यांची पहाणी करत असताना एक दुचाकी त्या परिसरात मिळून आली.
महिलेच्या खुनाची संभाव्य वेळ आणि त्या परिसरात दिसून आलेली दुचाकी पोलिसांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. शेवटी पोलिसी नजर ती. टीमने बोळकोटगी यांना माहिती दिली. त्यांनी दुचाकीला केंद्रस्थानी ठेवून तपासाला गती देण्याचे ठरविले. कारण, सुरुवातीपासून पोलिसांच्या हाती फारसा काही सकारात्मक धागा लागला नव्हता. एक काय ती दुचाकीच पोलिसांच्या हातात होती. दुचाकी दिसली; परंतु तिचा नंबर काही दिसून येत नव्हता. त्यामुळे तपासात पुन्हा अडचण निर्माण झाली. बोळकोटगी आणि त्यांच्या टीमने तपास सुरू ठेवला. पुढे काही अंतरावर सीसीटीव्ही कॅमेर्यात तीच दुचाकी एका चहाच्या हॉटेलजवळ थांबलेली दिसली. आता मात्र दुचाकीचा नंबर पोलिसांच्या हाती लागला. त्याद्वारे त्यांनी दुचाकी मालकाचा शोध घेतला. त्यावेळी पोलिसांना समजले ती दुचाकी कामशेत येथून चोरी गेली आहे.
पुढे हीच दुचाकी पोलिसांच्या तपासातील मोठा धागा ठरली. पोलिसांनी त्यासाठी दिवसरात्र तपास केला. गंगाधाम चौकापासून चाकणपर्यंत तब्बल अडीचशे सीसीटीव्ही कॅमेरे खंगाळले. त्यावेळी त्यांना चितोडिया नावाच्या एका व्यक्तीबाबत माहिती मिळाली. मात्र, पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचेपर्यंत तो तेथून फरार झाला होता. पोलिसांनी आपल्या खबर्याला त्याच्या मागावर सोडले होते. एकेदिवशी खबर्याने सांगितले, बोळकोटगी साहेब सावज टप्प्यात आलंय. चितोडिया नाशिक येथे आलाय. बोळकोटगी यांनी क्षणाचाही विलंब न करता आपली एक टीम नाशिकला रवाना केली. त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने चितोडियाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांना आणखी एका व्यक्तीची माहिती मिळाली, त्याचे नाव होते विजय पाटील. पोलिसांनी आपल्या भाषेत समजावून सांगताच दोघांनी महिलेच्या खुनाची कबुली दिली.
पोलिसांनी महिलेच्या खूनप्रकरणी रविसिंग राजकुमार चितोडिया (वय 29, रा. येवलेवाडी, मूळ नाशिक), विजय मारुती पाटील (32, रा. भोईसर पूर्व, ता. जि. पालघर) या दोघांना अटक केली. मद्यप्राशन केल्यानंतर एकट्या महिलेला पाहून या नराधमांच्या अंगात वासनेचा सैतान संचारला होता. दोघांनी त्या महिलेच्या शरीराचे लचके तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिने या दोघांना विरोध केला होता, त्यातूनच दोघांनी तिचा खून केला.
गंगाधाम चौकात आयुर्वेदीक औषधांची विक्री करणार्या एका व्यक्तीचे पाल होते. खून झालेली महिला रात्री तेथे झोपण्यास येत होती. आरोपी चितोडिया आणि पाटील या दोघांना दारूचे व्यसन. 9 डिसेंबर रोजी रात्री एक वाजता हे दोघे पालावर झोपण्यासाठी आले होते. त्यांनी महिलेला उठवून शरीरसंबंधाची मागणी केली. परंतु, तिने त्याला विरोध केला. त्यानंतर दोघांनी महिलेसोबत झटापट केली. पाटील याने महिलेला खाली पाडले. त्यानंतर चितोडिया याने पालात पडलेला हातोडा उचलून महिलेच्या डोक्यात मारला. घाव वर्मी लागल्याने तिचा मृत्यू झाला. घटनास्थळावर कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झालेल्या दुचाकीच्या आधारे महिलेच्या खुनाचा छडा लावत नाशिक आणि पालघर येथून आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दोघा नराधमांना अटक केली असली, तरी अद्याप खून झालेल्या महिलेची ओळख पटली नसल्याचे पोलिस सांगतात.