जनावरांना द्या प्रथिनयुक्‍त खाद्य

जनावरांना द्या प्रथिनयुक्‍त खाद्य

माणसाप्रमाणेच जनावरांनाही प्रथिनयुक्‍त खाद्य मिळणे गरजेचे असते. अलीकडे खाद्याची कमतरता भासू लागल्याने प्रथिनयुक्‍त खाद्यावर संशोधन सुरू आहे. त्यादृष्टीने ओझोला हे उत्तम खाद्य ठरते.

मागील 50 वर्षांपासून लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या खाण्याच्या सवयीमुळे त्याचा परिणाम सध्याच्या काळात फार होत आहे. त्यामुळे जास्त प्रथिने असलेल्या दुधाच्या आणि मांसाच्या पदार्थांची मागणी वाढत आहे. या प्रथिनांची कमतरता भासत असेल तर ती प्रोटिनात दूध किंवा मांसामधून पूर्ण केली जाऊ शकते.

वाढत्या लोकसंख्येमुळे चरण्याचे आणि कुरणाचे क्षेत्र कमी झाल्यामुळे जनावरांची संख्यासुद्धा कमी झाली. त्यामुळे दुधाचेसुद्धा प्रमाण कमी झाले. दिवसेंदिवस या परिणामामुळे खाद्याची कमतरता भासू लागली आहे. प्रथिनेयुक्‍त खाद्याची कमतरता आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये कमी पडू नये म्हणून संशोधकांची धडपड सुरू आहे.

ओझोलामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने, आमिनो आम्ल, जीवनसत्व, अ, ब, द, ब 12, बीटा कॅरोटीन आढळतात. तसेच क्षारांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, लोह, तांबे आणि मॅग्नेशिअम आणि शरीर वाढीसाठी लागणारे घटक ओझोलामध्ये आढळतात. वाळलेल्या ओझोलामध्ये 29-30 टक्के प्रथिने, 10-15 टक्के कॅरोटीन, 7-10 टक्के अमिनो आम्ल आढळते. कर्बोदके आणि स्निग्धाचे प्रमाण यामध्ये कमी असते. त्यामुळे जनावरांना ते लवकर पचते. ओझोलाच्या तंतूमध्ये जास्त प्रमाणात प्रथिने, तर कमी प्रमाणात लिगनीन असल्यामुळे जनावरांची वाढ झपाट्याने होते. ओझोला लावण्याची पद्धत सोपी आणि कमी खर्चिक आहे.

प्रथमच 1 मीटर बाय 1 मीटर खड्डा खोदून त्यामध्ये त्याच आकाराचे जाड पॉलिथीन पिशवी टाकावी. खड्डा समांतर करून प्‍लास्टिकने झाकून घ्यावा. त्यामध्ये पाण्याची गळती थांबवावी. त्या खड्डयात 20 किलो सुपीक माती पसरावी. 10 लिटर पाण्यामध्ये 5 किलो शेण मिसळावे आणि ते मिश्रण त्या मातीवर शिंपडावे. जवळपास 4 ते 5 इंचाएवढे पाणी त्या खड्ड्यामध्ये असावे. त्यावर ओझोलाचे कल्चर पसरावे आणि त्यात 10 ग्राम सुपर फॉस्फेट टाकावे. सात दिवसानंतर ओझोला पाण्यामध्ये तरंगताना दिसेल. ओझोलाची वाढ भराभर होत असल्यामुळे ते सात दिवसांत कापण्यासाठी तयार होते. त्यामध्ये आठवड्यातून एकदा अर्धा चमचा क्षारमिश्रण टाकावे. तसेच दोन महिन्यांतून एकदा माती आणि शेण बदलावे.

ताज्या ओझोलाला शेणाचा वास येत असल्यामुळे त्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे आणि ते एक ते दोन किलो खाद्यामधून रोज दुधाळ प्राण्याला द्यावे. वाळलेला ओझोला किंवा ओझोलाची पावडर यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते बराच काळ टिकून राहते. तसेच वाळलेल्या ओझोलाच्या गोळ्या तयार करून जनावरांना रोज खाण्यास द्यावे. यामुळे त्यांची वाढ नियमित होऊन आजाराचे प्रमाणसुद्धा कमी होते.

ओझोलामध्ये उच्च दर्जाचे प्रथिने असल्यामुळे ते सगळ्या जनावरांसाठी उपयुक्‍त खाद्य आहे. यामुळे शेतकर्‍यांना चार्‍याचे प्रमाण कमी लागते, तसेच कमी खर्चात उच्च दर्जाचे प्रथिने असलेले खाद्य जनावरांना मिळू शकते.
– विनायक सरदेसाई

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news