रासायनिक खतांची वाहतूक आणि साठवण | पुढारी

रासायनिक खतांची वाहतूक आणि साठवण

सध्या जगभरात रासायनिक खतांची टंचाई जाणवत आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा हा परिपाक आहे. यावर उपाय म्हणून आणि रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे होणार्‍या तोट्यांचा विचार करून अनेक जण जैविक शेतीचा पर्याय सुचवत आहेत. तथापि श्रीलंकेतील संकट समोर आल्यानंतर याबाबतच्या भूमिकेवर पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण श्रीलंकन सरकारने आयातीत कपात करण्यासाठी रासायनिक खतांची आयात थांबवली आणि संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीने करण्याचे फर्मान काढले. परंतु यामुळे श्रीलंकेतील कृषी उत्पन्न कमालीचे घटले आणि आज अन्‍नधान्याची तीव्र टंचाई हा देश अनुभवतो आहे. त्यामुळेच केंद्र सरकारनेही जैविक शेतीचा नारा कायम ठेवतानाच रासायनिक खतांनाही चालना देण्यास सुरुवात केली.

भारतात हरित क्रांती यशस्वी होण्यामागे रासायनिक खतांचा फारच मोठा वाटा होता, हे तर सर्वांना माहीतच आहे. म्हणूनच रासायनिक खते हा भारतीय शेतीचा एक अविभाज्य घटक बनला आहे. अलीकडील काळात आपल्या देशात खतांच्या उत्पादनापेक्षा खताचा वापर जास्त होत असल्यामुळे खतांच्या आयातीवर परकीय चलन खर्च करावे लागत आहे. त्यामुळे असे आयात केलेले खत शेतकर्‍यांना परवडेल अशा किमतीत देण्यासाठी काही खतांवर सरकारने सबसिडीही लागू केली आहे.

रासायनिक खतांच्या वापराबाबत शेतकरी काळजी घेत असला तरी त्याच्या साठवणुकीबाबत आणि हाताळणीबाबत अजूनही फारशी जागरूकता दिसत नाही. त्यामुळे खते खराब होऊन शेतकर्‍यांचे खूप नुकसान होते. कारण निर्मिती केंद्रापासून खतांचा वापर प्रत्यक्षात शेतावर होईपर्यंत खतांची विविध पातळीवर भरणी, उतरणी, हाताळणी आणि साठवणूक करावी लागते.

1) हाताळणी आणि साठवणीच्या दृष्टीने खतांच्या पॅकिंगला सर्वप्रथम महत्त्व आहे. या दष्टीने गोणपाट तसेच तागाच्या पोत्यास आतून पॉलिथीनचे अस्तर लावलेली पोती उपयुक्‍त ठरतात.

2) खतांची पोती ओढण्यासाठी तसेच उचलण्यासाठी धातुच्या हुकाचा वापर टाळावा.

3) दमट हवामानाच्या खतांची साठवण फार महत्त्वाची असते. म्हणून खते साठवणीच्या ठिकाणी हवेतील आर्द्रता साधारपणे 60 टक्केपेक्षा कमी राखणे उपयुक्‍त ठरते.

4) गोदामातील उष्णतामान जास्त वाढू नये म्हणून दिवसभर गोदामात हवा खेळती ठेवावी.

5) घरात साठवणीसाठी निवडलेली जागा कोरडी असावी.

6) पोत्यांची थप्पी भिंतीपासून अर्धा ते एक मीटर अंतरावर रचावी. तसेच दोन थप्प्यांमध्ये हेच अंतर ठेवावे.

7) खतांच्या पोत्यांचा जमिनीशी प्रत्यक्ष संपर्क टाळावा.

8) सर्व प्रकारची खते प्रकाराप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावी. 9) एकदा उघडलेले खताचे पोते संपूर्णपणे त्याच वेळी वापरावे. शिल्ल्क राहिल्यास त्याचे तोंड घट्ट बांधून स्वतंत्र ठेवावे.
– जयदीप नार्वेकर

Back to top button