US Iran Isreal Conflict: खामेनींच्या खात्म्यामागची कहाणी

US Iran Isreal Conflict
खामेनींच्या खात्म्यामागची कहाणी
Published on
Updated on

अभय कुलकर्णी, मस्कत

इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आणि सुप्रिमो अयातुल्ला खामेनी यांची इस्रायल आणि अमेरिकेने केलेली हत्या हा आधुनिक युद्ध पद्धतीतील क्रौर्याचा आणि ‌‘प्रिसिजन ॲटॅक‌’च्या वाढत्या प्रमाणाचा एक भीषण अध्याय ठरला आहे.

इराणच्या सत्तेचे सर्वोच्च केंद्र आणि ‌‘इस्लामिक क्रांती‌’चे आधारस्तंभ मानले जाणारे अयातुल्ला अली खामेनी यांचा शनिवारी (28 फेब्रुवारी 2026) एका भीषण इस्रायली हवाई हल्ल्यात अंत झाला. तेहरानमधील अतिसुरक्षित पाश्चर स्ट्रीट भागातील त्यांच्या कार्यालयावर झालेला हा हल्ला मध्यपूर्वेतील राजकारणाची दिशा बदलून टाकणारी एक ऐतिहासिक घटना ठरली आहे. गेल्या अनेक दशकांपासून इराणवर अधिराज्य गाजवणाऱ्या खामेनी यांच्या जाण्याने संपूर्ण जगात खळबळ माजली असून, ‌‘ऑपरेशन एपिक फ्युरी‌’ या नावाने राबवलेली ही मोहीम आधुनिक युद्ध तंत्राचा क्रूर आविष्कार म्हणून इतिहासात नोंदली जाणार आहे.

अयातुल्ला अली खामेनी हे केवळ इराणचे सर्वोच्च नेते नव्हते, तर ते पाश्चात्त्य जगाविरुद्ध उभ्या राहिलेल्या ‌‘ॲक्सिस ऑफ रेसिस्टन्स‌’ या गटाचे वैचारिक आणि राजकीय प्रमुख होते. 1989 मध्ये रूहोल्लाह खामेनी यांच्यानंतर त्यांनी इराणची सूत्रे हाती घेतली आणि त्यानंतर सुमारे चार दशके इराणच्या अंतर्गत आणि परराष्ट्र धोरणावर त्यांचेच निर्विवाद वर्चस्व राहिले. खमेनी यांच्या नेतृत्वाखाली इराणने आपले अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विकसित केल्यामुळे इस्रायल आणि अमेरिका यांच्याशी त्यांचा थेट संघर्ष नेहमीच धुमसत राहिला.

जागतिक राजकारणात खामेनी यांचे महत्त्व अनन्यसाधारण होते. लेबनॉनमधील हिजबुल्ला, गाझामधील हमास आणि येमेनमधील हुथी बंडखोरांना खामेनी यांनीच रसद आणि नैतिक पाठबळ पुरवले. त्यांच्या एका आदेशावर मध्यपूर्वेतील अनेक देशांमधील राजकीय समीकरणे बदलत असत. मुस्लीम जगतात विशेषतः शिया समुदायामध्ये त्यांना एक आध्यात्मिक गुरू म्हणून पाहिले जात असे; मात्र दुसरीकडे पाश्चात्त्य देशांसाठी ते ‌‘दहशतवादाचे सर्वात मोठे पुरस्कर्ते‌’ होते. त्यांच्या हत्येमुळे आता संपूर्ण मध्यपूर्वेत एक मोठी पोकळी निर्माण झाली असून इराणमधील कट्टरपंथी व्यवस्था हा धक्का कसा पचवणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

वली-ए-अम्र

खामेनी यांना इस्रायल आणि अमेरिकेकडून असणारा धोका जगजाहीर असल्यामुळे त्यांची सुरक्षा व्यवस्था ही अतिशय कडेकोट असायची. जगातील सर्वात कठीण सुरक्षा व्यवस्थांपैकी ती एक मानली जात असे. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी ‌‘सेपाह-ए वली-ए-अम्र‌’ या विशेष दलाकडे होती. हे दल इराणच्या ‌‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स‌’मधील सर्वात एलिट आणि गोपनीय तुकडी आहे. सुमारे 12,000 प्रशिक्षित जवानांचे हे सैन्य केवळ सर्वोच्च नेत्याच्या सुरक्षेसाठी अहोरात्र तैनात असे. या सैनिकांची निवड अत्यंत कठोर प्रक्रियेतून केली जाते, ज्यामध्ये त्यांची वैचारिक निष्ठा आणि कौटुंबिक पार्श्वभूमीची सूक्ष्म तपासणी केली जाते.

खामेनी ज्या भागात राहत होते, तो पाश्चर स्ट्रीट परिसर म्हणजे सुरक्षा यंत्रणांचे एक जाळेच होते. तेथे साध्या माणसाला प्रवेश मिळणेही अशक्य असे; मात्र इस्रायलच्या ‌‘मोसाद‌’ आणि ‌‘युनिट 8200‌’ या गुप्तचर संस्थांनी या सुरक्षेलाही सुरुंग लावला. तेहरानमधील वाहतुकीचे कॅमेरे हॅक करून इस्रायलने या सुरक्षारक्षकांच्या हालचालींचे संपूर्ण ‌‘पॅटर्न‌’ अभ्यासले होते. खामेनींचे चालक कोणत्या मार्गाने जातात, सुरक्षा रक्षक गाड्या कुठे उभ्या करतात आणि खामेनी कधी बंकरमधून बाहेर येतात, याची इत्थंभूत माहिती इस्रायलकडे होती. याच तांत्रिक कौशल्यामुळे वली-ए-अम्र सारख्या बलाढ्य सुरक्षा दलालाही या हल्ल्याचा अंदाज आला नाही.

शनिवारी सकाळी जेव्हा हा हल्ला झाला, तेव्हा खामेनी आपल्या कुटुंबातील काही सदस्य आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कार्यालयात न्याहारी करत होते. हा हल्ला दिवसाढवळ्या करण्याचे कारण म्हणजे, खमेनी त्या वेळी बंकरमध्ये नसून त्यांच्या कार्यालयात उपस्थित असल्याची पक्की माहिती इस्रायल व अमेरिकेला मिळाली होती. हीच वेळ साधून इस्रायली लढाऊ विमानांनी डागलेल्या सुमारे 30 अचूक क्षेपणास्त्रांनी खामेनी यांच्या संकुलाला वेढा घातला आणि काही क्षणातच इमारतीचे ढिगाऱ्यात रूपांतर झाले. या भीषण हल्ल्यात खमेनेई यांच्यासोबतच त्यांच्या कुटुंबातील काही महत्त्वाच्या व्यक्तींचाही अंत झाला. इराणमधील वृत्तांनुसार, खामेनेई यांची एक मुलगी, त्यांचा जावई आणि नातू या हल्ल्यात ठार झाले. याशिवाय, त्यांच्या पत्नी मानसोरेह खोजस्तेह बघेरझादेह या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या होत्या आणि उपचारादरम्यान दोन दिवसांनंतर त्यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांची हानी ही इराणच्या राजवटीसाठी एक वैयक्तिक आणि भावनिक धक्का ठरली आहे. खामेनेई यांचा मुलगा मोजताबा खमेनेई, जो त्यांचा उत्तराधिकारी मानला जात होता, तो या हल्ल्यात वाचला की नाही याबद्दल अद्याप संदिग्धता आहे, मात्र या हल्ल्याने खमेनेई घराण्याचे वर्चस्व एका रात्रीत संपुष्टात आणले आहे.

हा केवळ अचानक केलेला हल्ला नव्हता, तर अनेक महिन्यांच्या नियोजनाचा भाग होता. ‌‘सोशल नेटवर्क ॲनालिसिस‌’ या गणितीय पद्धतीचा वापर करून माहितीच्या अब्जावधी तुकड्यांमधून खामेनेई यांच्या हालचालींचा एक निश्चित नमुना तयार करण्यात आला होता. सीआयएला एका मानवी खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, खामेनेई त्या शनिवारी सकाळी बंकरमध्ये न जाता एका बैठकीसाठी कार्यालयात येणार होते. इस्रायलने यापूर्वीच पाश्चर स्ट्रीटजवळील डझनभर मोबाईल टॉवर्स जाम केले होते. यामुळे खामेनेईंच्या सुरक्षा दलाला कोणत्याही प्रकारचे धोक्याचे संकेत मिळू शकले नाहीत. ‌‘ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन‌’ने या मोहिमेसाठी अमेरिकन नौदल आणि हवाई दलाचा वापर केला. अमेरिकन सैन्याने सायबर हल्ल्यांच्या माध्यमातून इराणची हवाई संरक्षण यंत्रणा पूर्णपणे निकामी केली. इस्रायली विमानांनी डागलेली ‌‘स्पॅरो‌’ क्षेपणास्त्रे ही 1,000 किलोमीटर अंतरावरूनही जेवणाच्या टेबलवर अचूक निशाणा साधू शकतात. खमेनेई यांच्या हत्येसाठी याच तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. युद्ध सुरू झाल्यानंतर ते बंकरमध्ये गेले असते, तर त्यांना मारणे अशक्य झाले असते. म्हणून, युद्धाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच त्यांना लक्ष्य करण्यात आले.

इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत अमेरिकेसोबत चर्चा सुरू असली, तरी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा या चर्चेवर विश्वास नव्हता. ही चर्चा यशस्वी होणे शक्य नसल्याचे त्यांचे ठाम मत होते. 11 फेब्रुवारी रोजी व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्यात सुमारे तीन तास खलबते झाली होती. या भेटीत इराणच्या लष्करी क्षमतेबाबतची ताजी गुप्तचर माहिती ट्रम्प यांच्यासमोर मांडण्यात आली. त्यानंतर दोन्ही देशांच्या लष्करी आणि गुप्तचर यंत्रणांनी संयुक्त हल्ल्याची योजना आखली. शुक्रवारी दुपारी 3 वाजून 38 मिनिटांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‌‘ऑपरेशन एपिक फ्युरी‌’ला मंजुरी दिली आणि शनिवारी ही मोहीम फत्तेह करण्यात आली.

इस्रायलने इराणच्या अंतर्गत गोटात केलेली ही घुसखोरी नवीन नाही. यापूर्वीही अण्वस्त्र शास्त्रज्ञांच्या हत्या, अणुऊर्जेशी संबंधित कागदपत्रांची चोरी आणि हमासच्या राजकीय नेत्याचा तेहरानमध्ये झालेला खात्मा यातून इस्रायलने आपली क्षमता सिद्ध केली आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात इराण आणि इस्रायल यांच्यात झालेल्या बारा दिवसांच्या युद्धाच्या सुरुवातीलाच या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. त्यावेळी इराणच्या ‌‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स‌’च्या प्रमुखासह सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निकटवर्तीयांना ठार करण्यात आले होते.

विज्ञान-तंत्रज्ञानाचा विकास मानवी कल्याणासाठी केला जात असला, तरी संरक्षणाच्या क्षेत्रात त्याचा वापर बचावाबरोबरच संहारासाठीही होत आला आहे. अलीकडील काळात प्रिसिजन ॲटॅकचे प्रमाण वाढत चालले आहे. ड्रोन तंत्रज्ञानामुळे आता दूर अंतरावर बसून रिमोट आणि संगणकाच्या साहाय्याने कसलीही जीवितहानी न होऊ देता शत्रूला टार्गेट करता येणे शक्य झाले आहे. यासाठी आवश्यक असतो तो अचूक इंटेलिजन्स. याबाबत ‌‘मोसाद‌’ आणि ‌‘सीआयए‌’ या जगद्विख्यात संघटना आहेत. अमेरिका आणि इस्रायलला ‌‘विनाश घडवून आणू‌’ अशी धमकी देणाऱ्या खामेनींना त्यांच्या देशात, त्यांच्या गोटात मोसाद किती खोलवर शिरली आहे, याची कल्पनाही नव्हती. यावरून या गुप्तचर संघटनेची कार्यपद्धती किती भीषण आणि घातक आहे, हे लक्षात येते.

खामेनी यांना इस्रायल आणि अमेरिकेकडून असणारा धोका जगजाहीर असल्यामुळे त्यांची सुरक्षा व्यवस्था ही अतिशय कडेकोट असायची. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी ‌‘सेपाह-ए वली-ए-अम्र‌’ या विशेष दलाकडे होती. सुमारे 12,000 प्रशिक्षित जवानांचे हे सैन्य केवळ सर्वोच्च नेत्याच्या सुरक्षेसाठी अहोरात्र तैनात असे. असे असले, तरी इस्रायलच्या मोसादने इराणमधील ट्रॅफिक कॅमेऱ्यांपासून अनेक गोष्टी आधीच हॅक केल्या होत्या. त्यामुळे खामेनींची इत्थंभूत माहिती तेल अवीवकडे क्षणाक्षणाला जात होती. त्याचे विश्लेषण करून अचूक वेळ साधून इस्रायलने ऐन जेवणाच्या टेबलवर खामेनींना टिपले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news