Smriti Mandhana | स्‍मृती युगाचा आरंभ !

Smriti Mandhana |
Smriti Mandhana | स्‍मृती युगाचा आरंभ !
Published on: 
Updated on: 

विवेक कुलकर्णी

हातात बॅट, डोळ्यांत धावांची भूक आणि खांद्यावर संपूर्ण संघाची जबाबदारी... हरमनप्रीत कौरची ही ओळख आता बदलणार आहे. भारतीय महिला क्रिकेटच्या एका मोठ्या पर्वाला अखेर विराम मिळाला आहे. हरमनप्रीतने कर्णधारपदाची धुरा सोडली आणि तिच्या जागी स्मृती मानधनाची कर्णधार म्हणून निवड झाली. हा केवळ कर्णधार बदल नाही, भारतीय महिला क्रिकेटच्या पुढच्या वाटचालीचा नवा अध्याय आहे.

हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेटने अनेक चढ-उतार पाहिले. कधी अंतिम सामन्यातील पराभवाने डोळ्यांत पाणी आले, तर कधी ऐतिहासिक विजयाने तिरंगा उंचावला; पण या संपूर्ण प्रवासात हरमनप्रीत एक गोष्ट सातत्याने करत राहिली, मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस. आता तीच धुरा स्मृतीच्या खांद्यावर आली आहे.

तसे पाहता, हरमनप्रीतचे नेतृत्‍व एका दिवसात कधीच घडले नव्हते. २०१६ पासून टी-२० संघाचे नेतृत्व करताना तिने भारतीय महिला क्रिकेटला एका वेगळ्या आत्मविश्वासाची जाणीव करून दिली. २०२२ मध्ये मिताली राजच्या निवृत्तीनंतर वन डे आणि कसोटी संघाची जबाबदारीही तिच्याकडे आली. तेव्हापासून भारतीय क्रिकेटमध्ये ‘हरमनप्रीतचा संघ’ ही ओळख अधिक ठळक होत गेली.

तिच्या नेतृत्वाचा प्रवास मात्र नेहमीच सरळ रेषेतला नव्हता. मोठ्या स्पर्धांमध्ये भारताच्या वाट्याला आलेले काही अपेक्षाभंग करणारे पराभव, कर्णधार म्हणून तिच्यावर झालेली टीका, तिच्या निर्णयांवर उठलेले रान या सर्वातून तिला जावे लागले; पण याच काळात भारतीय संघानेही मोठ्या व्‍यासपीठावर स्वतःची ओळख निर्माण केली. २०२० च्या टी-२० विश्वचषकाची अंतिम फेरी, राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक, आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक आणि अखेर २०२५ च्या वन डे विश्वचषकाचे ऐतिहासिक विजेतेपद या यादीत हरमनप्रीतचे योगदान लाख मोलाचे ठरले.

विशेषतः २०२५ चा विश्वचषक तिच्या नेतृत्वाच्या कारकिर्दीवर जणू सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. घरच्या मैदानावर भारतीय महिला संघाने प्रथमच वन डे विश्वचषक जिंकला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात हरमनप्रीतची ८९ धावांची झंझावाती खेळी भारताच्या विजयाची पायाभरणी करणारी ठरली. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताने विश्वचषक उंचावला आणि हरमनप्रीतच्या नेतृत्वाला त्याहून चांगला शेवट कदाचित मिळू शकला नसता; पण क्रिकेटमध्ये कालचा विजय आजच्या निर्णयाला थांबवत नाही.

२०२६ च्या टी-२० विश्वचषकात भारताला बाद फेरी गाठता आली नाही. अशावेळी पुढील विश्वचषकाचा विचार करताना नेतृत्वात बदल करण्याची गरज बीसीसीआय आणि निवड समितीसमोर उभी राहिली. हरमनप्रीतनेही परिस्थितीचा स्वीकार करत कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तिचा प्रवास इथे थांबलेला नाही. ती खेळाडू म्हणून भारतीय संघासोबत पुढेही राहणार आहे.

आणि मग आली स्मृती मानधना. स्मृतीच्या नेतृत्वाची कहाणी मात्र केवळ तिच्या स्वतःच्या कर्णधारपदापासून सुरू होत नाही. उलट, कर्णधार होण्यापूर्वीच तिने अनेक कर्णधारांकडून नेतृत्वाचे धडे घेतले आहेत. मिताली राज आणि हरमनप्रीत कौर या भारतीय महिला क्रिकेटच्या दोन वेगळ्या स्वभावाच्या आणि शैलीच्या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली स्मृती खेळली. एका बाजूला मितालीची शांत, शिस्तबद्ध आणि अनुभवातून आलेली शैली, तर दुसऱ्या बाजूला हरमनप्रीतचा आक्रमक आणि प्रसंगी भावनांना वाट करून देणारा दृष्टिकोन. या दोन्ही शैली अगदी जवळून पाहण्याची संधी स्मृतीला मिळाली.

इतकेच नव्हे, तर महिला प्रीमियर लीगमध्ये ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज कर्णधारांसोबतही खेळली. हीदर नाईट आणि सोफी डिव्हाइन यांच्यासारख्या माजी आंतरराष्ट्रीय कर्णधारांच्या सहभागातून नेतृत्वाकडे पाहण्याचा आणखी एक वेगळा दृष्टिकोन तिला मिळाला. महिला बिग बॅश लीग, ‘द हंड्रेड’ आणि वूमन्‍स प्रीमियर लीग या विविध लीगमध्ये खेळताना तिने वेगवेगळ्या देशांतील प्रशिक्षक, कर्णधार आणि क्रिकेट संस्कृती जवळून अनुभवल्या.

म्हणजेच स्मृती आता केवळ अनुभवावर कर्णधार होत नाही, तिच्या मागे अनुभवांचा एक मोठा पट आहे. या सगळ्याचा सर्वांत ठळक प्रत्यय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये आला. आरसीबीसारख्या मोठ्या फ्रँचायझीचे नेतृत्व करताना तिच्या खांद्यावर केवळ संघाची जबाबदारी नव्हती, एका मोठ्या आणि प्रदीर्घ प्रतीक्षेचे ओझेही होते. पुरुष संघाच्या अपयशामुळे वर्षानुवर्षे ‘ट्रॉफीची प्रतीक्षा’ ही आरसीबीची ओळख बनली होती. अशा पार्श्वभूमीवर स्मृतीने अखेर संघाला महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळवून दिले.

यामुळेच भारतीय संघाची कर्णधार म्हणून तिची निवड अधिक अर्थपूर्ण ठरते. तिने मोठ्या नावांच्या छत्रछायेखाली क्रिकेटचे धडे गिरवलेत. वेगवेगळ्या नेतृत्वशैली पाहिल्या आहेत, विविध क्रिकेट संस्कृती आत्मसात केल्या आहेत आणि स्वतः कर्णधार म्हणून दडपण दूर सारत विजेतेपदही मिळवले आहे; मात्र आता आव्हान वेगळे आहे. तिला केवळ हरमनप्रीतची जागा भरायची नाही. तिला हरमनप्रीतने उभा केलेला संघ पुढे न्यायचा आहे. एका बाजूला अनुभवी खेळाडूंचा भक्कम गट आहे, तर दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी उत्सुक असलेली नवी पिढी आहे. या दोन्ही टोकांना एकत्र बांधण्याचे काम स्मृतीला करायचे आहे.

आणि अपेक्षा? त्या तर आता गगनाला भिडल्या आहेत. २०२५ च्या विश्वचषकानंतर भारतीय महिला क्रिकेटने एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. ‘भारत विश्वचषक जिंकू शकतो का’ हा प्रश्न मागे पडला आहे. आता प्रश्न आहे, ‘भारत सातत्याने जिंकणार कधी’ ही मानसिकता सांभाळणे हे स्मृतीसमोरचे सर्वांत मोठे आव्हान असेल.

हरमनप्रीतने भारतीय महिला क्रिकेटला लढण्याची सवय लावली. स्मृतीसमोर आता त्या लढ्याला सातत्य, स्थैर्य आणि नवी उंची देण्याचे आव्हान आहे. एका पिढीने मशाल पेटवली आहे. दुसरी पिढी ती हातात घेऊन पुढे निघाली आहे. मूळच्‍या सांगलीकर असलेल्‍या स्‍मृती युगाची चाहूल म्‍हणूनच अपेक्षा अधिक उंचावणारी ठरतेय!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news