Women Asia Cup 2026 | जेतेपदाचा आठवा मुकुटमणी!

 Women Asia Cup 2026 |
Women Asia Cup 2026 | जेतेपदाचा आठवा मुकुटमणी!
Published on
Updated on

विवेक कुलकर्णी

काही विजयांचे मोजमाप धावांनी करता येत नाही. काही विजयांचा अर्थ ट्रॉफीच्या वजनातूनही अधोरेखित होत नाही. असाच एक विजय म्‍हणजे भारतीय महिलांचा आशिया चषकातील विजय. दुबईच्या मैदानावर श्रीलंकेचा डाव १११ धावांत संपला आणि भारतीय खेळाडूंनी आशिया कपची ट्रॉफी उंचावली, त्या क्षणी भारताच्या खात्यात विक्रमी आठवे विजेतेपद जमा झाले.

भारतीय महिला संघाने आशिया चषक जिंकला, त्‍यावेळी त्‍यांच्‍या हातात चषक नव्‍हता; पण त्‍यांच्‍या हातात एक संदेश होता. विजयाची एकच पद्धत नसते. कोणी एकच खेळाडू जिंकून देऊ शकत नाही. हा एक सांघिक पराक्रम असतो. कधी मानधनाची बॅट इतिहास लिहिते, कधी शफाली सामना पहिल्या दहा मिनिटांतच आपल्‍या बाजूने वळवते, तर कधी दीप्ती चेंडूने प्रतिस्पर्ध्याची स्वप्ने गुंडाळते आणि कधी संपूर्ण संघ मिळून असा प्रवास घडवतो, ज्याचा शेवट ट्रॉफीत होतो. यंदाचा आशिया चषकात आपण आठवा मुकुटमणी चढवला तो यामुळेच.

हा संघ आता केवळ सामने जिंकत नाही, तर तो विजयाची स्वतःची भाषा तयार करत आहे, हेच यातून अधोरेखित होते. दुबईतील त्‍या रात्री मैदानावर श्रीलंकेच्या शेवटच्या फलंदाजाची विकेट उडाली आणि भारतीय खेळाडूंच्या आनंदाचा बांध फुटला. कुणी हात हवेत उंचावले, कुणी सहकाऱ्यांना मिठी मारली. काही क्षणांतच मैदान निळे झाले. समोर होती आशिया कपची ट्रॉफी. भारताच्या नावावर आणखी एक विजेतेपद; पण थोडे थांबून या विजयाकडे पाहिले, तर जाणवते, हा प्रवास फक्‍त काही फायनलपुरता अजिबात मर्यादित नव्‍हता. कारण, फायनलमध्‍ये श्रीलंकेला हरवण्यापूर्वी भारताने या स्पर्धेत कधी बॅटने वादळ उठवले, कधी फिरकीने प्रतिस्पर्ध्याचा श्वास रोखला, कधी एखाद्या दिग्गजाने विक्रम मोडला, तर कधी मोठ्या नावांच्या सावलीतून एखादा नवा चेहरा पुढे आला. सहा सामने. सहा विजय. आणि एकही क्षण असा नाही, जेव्हा भारताला आपल्या विजयासाठी फक्त एका खेळाडूवर अवलंबून राहावे लागले. यात असे दिसून आले की, संघ कोणत्‍याही एकाच फॉर्म्युुल्‍यावर अजिबात विसंबून नाही. प्‍लॅन ए चालला नाही, तर त्‍यांच्‍याकडे प्‍लॅन बी तयारच असतो. त्यांच्याकडे विजयाची एकच वाट नाही. मानधनाची बॅट चालली नाही, तर शफालीची बॅट तळपते. सलामीची जोडी थांबली, तर मधले फलंदाज प्रतिस्‍पर्ध्यांचा समाचार घेतात. अनेकदा दीप्तीची फिरकी चालते. खेळपट्टी साथ देत नसेल, तर संयम कामी येतो. याच सामूहिकतेत दडले आहे, ते या आठव्या मुकुटाचे खरे सौंदर्य!

मिताली राज ज्या पिढीचे स्वप्न घेऊन उभी राहिली, त्याच परंपरेतून मानधना आली आणि एके दिवशी तिने त्याच दिग्गज मितालीचे काही विक्रम आपल्या नावावर केले. १३ सप्टेंबरची रात्र भारतीय महिला क्रिकेटसाठी म्‍हणूनच अविस्‍मरणीय ठरते. एका बाजूला आशिया कपच्या अंतिम सामन्याचा दबाव, समोर २०२४ची विजेती श्रीलंका आणि दुसऱ्या बाजूला इतिहास रचण्याची संधी; पण भारतीय महिलांनी या आव्हानांचे ओझे खांद्यावर घेतले नाही. उलट त्याचे रूपांतर आत्मविश्वासात केले. मैदानावरचा हिशेब अगदी स्पष्ट होता, भारत वरचढ, श्रीलंका पराभूत; पण त्या चित्रात एक गोष्ट नेहमीसारखी नव्हती. विजेत्या भारतीय संघाच्या हातात ट्रॉफी दिसली नाही.

पुरस्कार वितरणासाठी भारतीय खेळाडू मैदानावर आले नाहीत. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्याचा प्रश्‍नच नव्‍हता. (या नक्‍वी महाशयांची आशियाई काऊन्‍सिल अध्‍यक्षपदाची मुदत पुढील वर्षी एप्रिलपर्यंत आहे). त्यामुळे आठवा आशिया कप जिंकल्यानंतरचा पारंपरिक क्षणच अपूर्ण राहिला.

अंतिम सामन्यात श्रीलंकेसमोर उभा राहिलेला भारत हा केवळ दोन आक्रमक सलामीवीरांचा संघ नव्हता. शफालीने २४ चेंडूंत अर्धशतक केले. मानधनाने ५९ धावा केल्या. भारत १८३/५ पर्यंत पोहोचला. श्रीलंकेने अटापट्टू आणि विश्मी गुणरत्ने यांच्या भागीदारीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला; पण दीप्तीने दोघींना बाद केले आणि सामन्याची पकड पुन्हा घट्ट झाली. त्यानंतर श्री चरणीने चार विकेट्स घेतल्या. श्रीलंकेचा डाव १११ धावांत संपला. आठवा आशिया कप हा इतिहासातील आकडा आहे; पण या विजयाची खरी ओळख त्या आकड्यापेक्षा संघाच्या बदललेल्या वाटचालीत आहे. भारत आता एका-दोन मोठ्या खेळाडूंच्या कामगिरीवर उभा असलेला संघ राहिलेला नाही. भारतीय महिला क्रिकेटची एक पिढी आता केवळ विजय मिळवण्याच्या टप्प्यावर नाही, तर विजयाची जबाबदारी अनेक खांद्यांवर वाटून घेण्याच्या टप्प्यावर पोहोचली आहे.

गतवर्षी विश्‍वचषक जिंकल्‍यानंतर यंदा लगोलग आशिया चषक जिंकत भारतीय रणरागिणींनी आपल्‍या ताकदीची आणखी एक प्रचिती दिली आहे. हा आठवा मुकुटमणीच आता भारतीय संघाला नजीकच्‍या भविष्‍यात आणखी स्‍फूरण देत राहील, आणखी हत्तीचे बळ यथासांग पुरवत राहील. लगे रहो!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news