

प्रमोद बेरी
‘ट्रॅकर’ वापरायच्या तिसर्या दिवशीपासून मला लक्षात न येता या आधुनिक हेराच्या ताब्यात मी केव्हा गेलो ते कळेना. या हेराने पहिल्यांदा माझी सर्व माहिती गोळा केली. वय, वजन, खाण्याच्या सवयी, रात्रीची झोप इत्यादी. त्यानंतर मी दिवसातून किती पावले चालतो, शरीरातली चरबी कमी करण्यासाठी किती कॅलरी किती कमी केल्या पाहिजेत या सर्वांचा तो ट्रॅक ठेवू लागला.
कोरोना संपल्यानंतरची गोष्ट आहे. त्या दोन वर्षांच्या निष्क्रिय जीवनशैलीच्या काळात हालचाल कमी झाल्याने म्हणा किंवा काही काम नाही म्हणून ज्यादा केलेले ‘उदरभरणम्’ म्हणा, प्रत्येक आंघोळीनंतर आरशात माझा देह पाहिल्यावर लक्षात आले की, ‘गुटगुटीत’ बालकांच्या स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाच्या बक्षिसाच्या बालकाप्रमाणे माझ्या शरीराचा आकार झाला आहे.
आंघोळ झाल्यावर निवांत बसल्यावर मन क्षणभर भूतकाळात गेले. ‘फिटनेस क्रेझ’ नसलेले अनेक दशकापूर्वीचे दिवस आठवू लागले. आमच्या वेळेचे सत्तरीच्या दशकातील रूपेरी पडद्यावर चमकणारे तारे आठवले. ऐसपैस ढेरी असणारा प्रदीपकुमार व गुरुदत्त तसेच सुदृढ नायिका पद्मिनी आणि त्या काळची राखी! तसेच ऐसपैस शरीरमान असलेल्या दक्षिणेतील गुटगुटीत नट-नट्यापण आठवल्या. त्यावेळी कुणाला काहीही वावगे वाटत नव्हते; पण जेव्हा डोळे उघडले तेव्हा वास्तव समोर आले. ३४ साईजच्या पॅंट टाकून देऊन ३८ इंच साईजच्या नवीन सहा पॅंट घेण्याचा अवाजवी खर्च टाळलाच पाहिजे असा निर्धार केला व वजन घटवण्यासाठीचे उपाय शोधू लागलो. असा विचार चालू असताना नेमका त्याचवेळी माझा जवळचा मित्र विजय डोकावला. अर्थात, त्याने आमचे गुफ्तगू ऐकले होते. तो म्हणाला, घर न सोडता एक उत्तम उपाय सुचवतो तो आहे 'फिटनेस ट्रॅकर'चा! तो काय म्हणतोय, याचा मला ‘गंध’ लागेना! मी त्याला भोळसटपणे विचारले, 'ही काय भानगड आहे?'
'अरे, मी उद्या तुला माझे घड्याळासारखे हातावर घालता येण्यासारखे फिटनेसचे गॅजेट आणून देतो. ते तुझी सर्व शरीरकुंडली चेक करून मार्गदर्शनसुद्धा करेल! काही दिवस तरी वापरून बघ. बराच फरक दिसेल.' ‘ट्रॅकर’ वापरायच्या तिसर्या दिवशीपासून मला लक्षात न येता या आधुनिक हेराच्या ताब्यात मी केव्हा गेलो ते कळेना. या हेराने पहिल्यांदा माझी सर्व माहिती गोळा केली. वय, वजन, खाण्याच्या सवयी, रात्रीची झोप इत्यादी. त्यानंतर मी दिवसातून किती पावले चालतो, माझ्या हृदयाच्या स्पंदनाचा रेट (मोजमाप) काय आहे, तसेच शरीरातली चरबी कमी करण्यासाठी किती कॅलरी किती कमी केल्या पाहिजेत, या सर्वांचा तो ट्रॅक ठेवू लागला.
चौथ्या दिवशी ट्रेनिंगचा भाग म्हणून त्याने 'पॉवरवॉक' (जलद चालणे) करण्यास मला कामाला लावले. अर्धा तास असे चालून घरी परतलो. 'ट्रॅकर' म्हणाला, '८० कॅलरीज जळाल्या व लगेच पुढे त्याने सुचवले, 'फक्त दोन-तीन बिस्किटे आहार घेण्याची परवानगी!' माझ्या आयुष्याचा असा ताबा घेतल्यावर मी फिटनेससाठी समजा दोन-तीन दिवस काहीही केले नाही, तर तो ओरडू लागला. 'सेडेंटरी अलर्ट' (कोल्हापुरी भाषेत, ढोल्या किती वेळ नुसता बसतोस.) शेवटी कंटाळून 'तुझे तुला लखलाभ होवो' या अविर्भावात हा ‘गुप्तहेर’ मी विजयला परत करून टाकला. यानंतर विचार केला, योग्य आहाराचे सोपे उपाय करून पाहूया!
‘गुगल’वर ‘सर्च’ करून काढलेली वजन घटवण्याची ‘सुपरफूड्स’ घेण्याचे प्रयोग करून पाहण्याचे ठरवले. प्रयोगाचा पहिला अगदी सोपा पर्याय म्हणून ‘ग्रीन टी' चालू केला. मस्तपैकी दुधाचा चहा सोडून ही मात्रा घेणे अवघड होते; पण हा कडू घोट चालू ठेवला.
दूसरा प्रयोग म्हणून कॅलरीज त्वरित घटवण्यासाठी ‘क्वीनोआ’ नावाचा धान्य प्रकार ‘सत्यम’ फूड्समधून आणला. तो बेचव पदार्थ खाल्यावर किती परिणाम झाला असेल देव जाणे; पण आता मी माती पण खाऊ शकेन अशी खंबीर मनस्थिती झाली.
शेवटी त्याचाही कंटाळा आल्यावर म्हंटलं, आपण काही नवे मार्केटिंग झालेले योगाचे प्रकार चालू करावेत. हा उद्देश ठेवून ‘न्यू ऐज’ योगाचा ज्योती मॅडमचा क्लास जॉईन केला. शिवाय त्याच ‘एरियल योगा’ घेत होत्या. त्याचे पण पैसे भरले. दुसर्या दिवशी ज्योती म्हणाली, 'सर, तुम्हाला आठ दिवसांत वजन कमी करायचे असेल, तर आमचा ‘एरियल योगा'चा हा प्रयोग आधी करा म्हणता म्हणता तिने मला वेगळ्या खोलीत नेऊन हवेत टांगून असे भीषण प्रयोग केले की, घरी आल्यावर अंग एवढे दुखले की, वाटत होते शरीराचे सर्व भाग अलग होतील की काय?
तरी पण धीर राखून पाचव्या दिवशी नवा ट्रॅकसूट खरेदी करून मी ज्योती मॅडमसमोर हजर झालो व म्हणालो, 'एरियल' योगा नको. आपण तुमचा न्यू ऐज योगा ट्राय करूया! लगेच तिने त्यासाठीचा नवा प्रयोग म्हणून दोन्ही पायांचे तळवे ऐकमेकास नमस्करासारखे जोडून एकदम पाठ उंच करण्याचा नवा व्यायाम प्रकार चालू केला. ती सांगत होती, 'पाय सुंदर जुळलेत; मात्र अजून.... अजून.... थोडी कंबर वर करा...' असे म्हणता म्हणता माझ्या पाठीतून ‘कडकड’ असा आवाज आला. म्हटले, ‘मणका’ तुटला वाटतं! एवढे राक्षसी प्रयोग झाल्यावर त्या ‘योगा क्लास’ला अलविदा म्हटले आणि विचार केला, सौ पूर्वी म्हणत होती ते मानून तशी साधी ‘जिम’ जॉईन करूया!
चांगल्या जिमची चौकशी चालू केली. ‘गोल्डन गेट’ जिमचा बोलबाला होता. तेथे दोन महिन्यांचे पॅकेज घेतले व मनात म्हटले, साठ वर्षांचा सलमान खान पिळदार शरीरयष्टी करून तीस वर्षांचा कसा दिसतो, तसे जर आपले ‘लूक’ झाले, तर काय मजा होईल! हे ‘यंग’ लूक आल्यावर बोनस म्हणून जेनझीकडून ‘आजोबा’ बिरुदावली जाऊन ‘काका’ शब्द तोंडी आला, तर किती छान होईल, अशा दिवास्वप्नाच्या नादात मी जिम ट्रेनरच्या ताब्यात स्वत:ला सोपवले. त्याच्या सांगण्यावरून दुसर्या दिवशीपासून अतिशय बेचव असे ‘व्हे’ प्रोटीन चालू केले. तिसर्या दिवशी एका ट्रेडमिलवर थाटात चढलो आणि सूचना आली, 'वेग चार किलोमीटर प्रतितास, वॉर्मअप पाच मिनिटे!' ट्रेडमिलवर आरूढ झाल्यावर अनेक वेळा हा यंत्रराक्षस केव्हातरी मला उडवून फेकून देईल की काय, अशी भावना वारंवार मनात येत राहिली. काही दिवसांनी जिमची विविध साधने मला हिटलरने ज्यू कैद्यांसाठी तयार केलेल्या छळयंत्रासारखी भासू लागली आणि विचार केला, हे काही आपले काम नाही अन् तेथेही रामराम ठोकला.
नंतर म्हटले, आपणच आपले ट्रेनर व ट्रेनी बनूया! या उद्देशाने नाना-नानी पार्कमध्ये असलेल्या ‘ओपन जिम’मध्ये प्रवेश केला. ट्रायल म्हणून कंबर दोन्ही दिशेला वळवण्याच्या उपकरणाच्या सीटवर बसलो. हळूहळू सर्व साधनांची ओळख झाली व वापरही करून झाला; पण १५ दिवसांत १५० ग्रॅमही वजन कमी होईना. तिथेही ‘सायोनारा’ ठोकल्यावर विचार केला, मागच्या महिन्यात रोटरी क्लबमध्ये झालेल्या लेक्चरमध्ये वजन कमी करण्याचा हुकमी एक्का म्हणून वक्त्याने सुचवलेला 'हील वॉकिंग' (टाचेवर चालणे) हा प्रकार चालू करूया!
कोल्हापूरचे रस्ते काय आणि बागा काय, कुठलाही पृष्ठभाग नितळ नसल्याने या प्रकारप्रयोग करताना माझाच पृष्ठभाग आपल्या शहरातील रस्त्याच्या खडबडीत भागावर आदळला. नशिबाने वजन वाढले असल्याने, मांड्या गुबगुबीत झाल्या असल्याने तो शॉक सहन झाला. विचार पक्का झाला की, निदान कोल्हापुरात तरी टाचांवर चालणे अशक्य आहे आणि त्यामुळे हाही प्रयोग संपुष्टात आला.
एवढे सगळे प्रयोग करून झाल्यावर मनात म्हटलं, ‘अति वर्तनम् वर्ज्य’. म्हणजे आपल्या किंवा कोल्हापुरी भाषेत ‘समदं करा; पण मापात करा’चा मंत्र स्वीकारूया!
पिझ्झा, बर्गर, वडे, कोल्हापुरी मिसळ इत्यादी शरीरवर्धक गोष्टी (अर्थात कांद्याची भजी सोडून) महिनाभर बाजूला ठेवल्या आणि फार पूर्वी डॉ. गुंडे यांच्या फिटनेस वर्कशॉपमध्ये शिकलेले सर्वप्रकार चालू केले. सकाळ-संध्याकाळ तीन किलोमीटर चालणे, योगासने, प्राणायाम, हास्ययोग आणि फिरणे हे नेहमीच्या पठडीतले वाटणारी दिनचर्या चालू केली.
त्याचाच भाग म्हणून जेवताना बिनतुपाचा फुलका, साधी वरण-भाजीपण चालू केली आणि काय आश्चर्य दोन महिन्यांत ३४ इंच कंबर साईजच्या पॅंट्स परत बसू लागल्या आणि मी सुटकेचा एक मोठा उसासा टाकला... अन् विचार केला, थोडे ठाकठीक आहे असे दिसते. आता थोडे उल्लंघन करायला हरकत नाही अन्... पूर्वीचे संस्कार उफाळून आले आणि विजयला फोन केला आणि म्हणालो, 'अरे, आज संध्याकाळी फडतरे मिसळ खायला जाऊया का?'