Dink Couple | त्यांची गोष्टच वेगळी

Dink Couple |
Dink Couple | त्यांची गोष्टच वेगळी
Published on
Updated on

अनुराधा कदम

डिंक कपल... दोन कमावते आणि मुलं नाहीत. शब्द चारच; पण त्यामागं उभं राहणारं आयुष्य मात्र चार शब्दांत मावणारं नाही. डिंक ही ‘चांगली’ किंवा ‘वाईट’ जीवनशैली नाही, तर ती एक निवड आहे आणि कोणतीही निवड तिच्या संदर्भाशिवाय चांगली किंवा वाईट ठरवता येत नाही.

लग्न झालं की पुढचा प्रश्न ठरलेलाच… गोड बातमी कधी देणार? आणि त्यानंतर मुलगा की मुलगी? शाळा कोणती? शिक्षण कुठे? घर कधी घेणार? मुलांसाठी गुंतवणूक किती करणार? आयुष्याची जणू एक तयार स्क्रिप्टच असते. लग्नाच्या मंडपातून बाहेर पडलं की, पुढची पानं कुणीतरी आधीच लिहून ठेवल्यासारखी; पण आता तिशीच्या उंबरठ्यावरची काही जोडपी त्या स्क्रिप्टच्या पहिल्याच पानावर पेन ठेवून म्हणत आहेत... 'थांबा… आमची गोष्ट थोडी वेगळी आहे.' आजच्या पिढीतल्या कपल्सने सेट केलेल्या याच वेगळ्या गोष्टीला सध्या एक नाव मिळालं आहे, ते म्हणजे डिंक. (Double Income, No Kids) दोन कमावते आणि मुलं नाहीत. शब्द चारच; पण त्यामागं उभं राहणारं आयुष्य मात्र चार शब्दांत मावणारं नाही. हा नवा ट्रेंड नेमका आहे तरी काय, याचे कुतूहल, उत्सुकता, मतप्रवाह, दृष्टिकोन नक्कीच विचार करण्याजोगे आहे.

पुण्यातील एका ३८ वर्षीय डिंक दाम्पत्याने साडेअकरा कोटींची संपत्ती उभी करून अवघ्या तीन वर्षांत निवृत्तीचा विचार केल्याची बातमी अलीकडेच चर्चेत आली. उच्च ताणतणावाच्या नोकरीपेक्षा आरोग्य आणि छंद यांना प्राधान्य देण्याच्या त्यांच्या विचाराने लक्ष वेधले; पण या गोष्टीकडे फक्त कोटींच्या आकड्यांतून पाहिलं, तर डिंकची खरी गोष्ट आपल्याला कदाचित समजणारच नाही. कारण डिंक म्हणजे फक्त मुलं नसलेलं कुटुंब नाही, तर तो एका बदलत्या मानसिकतेचा आरसा आहे. डिंक जोडप्यांकडे दोन पगार असतात आणि मुलांच्या संगोपनाची जबाबदारी नसते. त्यामुळे पैसा, वेळ आणि निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य यांचं समीकरण काही प्रमाणात बदलतं. मुलांच्या महागड्या शाळा, क्लासेस, शिक्षणाचा खर्च, मुलांसाठी घर, त्यांच्या भविष्यासाठीची बचत, आरोग्याचा खर्च, त्यांच्यासाठी सतत उपलब्ध राहण्याची गरज… या सगळ्यापासून मुक्त असलेली काही जोडपी स्वतःसाठी वेगळ्या गोष्टी निवडतात. कुणाला परदेश प्रवास करायचा असतो. कुणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो. कुणाला छंदांवर खर्च करायचा असतो; पण यातील मेख अशी आहे की, पैसा वाचतो म्हणून जोडपी डिंक होत नाहीत, तर आयुष्य कसं जगायचं याचा निर्णय स्वतः घ्यायचा म्हणून काही जोडपी डिंकचा स्वीकार करतात हा फरक महत्त्वाचा आहे. आम्हाला पालक व्हायचं नाही, ही संकल्पना भारतीय समाजासाठी अजूनही थोडी नवी आहे. लग्न झालं म्हणजे मुलं होणारच हा ‘नियम’ आता काही तरुण जोडपी प्रश्नांकित करत आहेत. मुलं नकोत, करिअरला प्राधान्य द्यायचं, दोघांनी मिळून प्रवास करायचा, स्वतःसाठी वेळ ठेवायचा, आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं किंवा पालकत्वाची जबाबदारी स्वीकारण्याची इच्छा नाही ही कारणं काही जोडपी आता उघडपणे सांगू लागली आहेत. कधीकाळी 'मुलं नकोत' हे वाक्य समाजाच्या नजरेत जवळजवळ बंडासारखं वाटायचं. आता ते हळूहळू वैयक्तिक निवड म्हणून स्वीकारलं जाऊ लागलं आहे.

समाजशास्त्रज्ञ, कुटुंबव्यवस्था अभ्यासकांच्या नजरेतून याचा अर्थ पालकत्व नाकारणं चुकीचं आहे असं अजिबात नाही. मुलं होणं हीदेखील एक सुंदर बाब आहे. पालकत्वातून मिळणारा आनंद, नात्यांची उब, मुलाला वाढताना पाहण्याचा अनुभव याला पैशाचं मोजमाप नाही. पण, प्रश्न एवढाच आहे की, पालकत्व हा प्रत्येक विवाहाचा अनिवार्य शेवट असायलाच हवा का, हा प्रश्न आता विचारला जातोय आणि प्रश्न विचारला जाणं, हीच या बदलाची सुरुवात आहे. सोशल मीडियावर डिंक जोडप्यांचं चित्र पाहिलं की, एक वेगळी दुनिया दिसते.

मुलं नाहीत म्हणून सगळं सोपं असंही कुणाला वाटू शकतं; पण प्रत्येक डिंक जोडप्याची गोष्ट एवढी चमकदार नसते. दोन व्यक्तींचं नातं, दोन करिअर, दोन महत्त्वाकांक्षा आणि एकत्र आयुष्य जगण्याची जबाबदारी असतेच. मुलं नसली, तरी नातं सांभाळावं लागतं. वेळेची कसरत करावी लागते. महत्त्वाकांक्षांशी जुळवावं लागतं. कधी कुटुंबीय, नातेवाईकांकडून येणाऱ्या प्रश्नांशी भिडावं लागतं. आज दोघं कमावतात, दोघं निरोगी आहेत, करिअर उत्तम आहे; पण वय वाढल्यानंतर काय, हे प्रश्न डिंक जोडप्यांनाही पडतात. म्हणून मुलं जन्माला न घालण्याचा निर्णय हा फक्त वर्तमानाचा नसून भविष्याचाही निर्णय आहे. आणि मग येतो पैसा. डिंक जोडप्याच्या जीवनशैलीची आर्थिक बाजू निश्चितच आकर्षक आहे. दोन उत्पन्नं आणि मुलांशी संबंधित खर्च नाही; पण इथेही एक मोठा ‘पण’ आहे. डिंक असणं म्हणजे आपोआप आर्थिकदृष्ट्या श्रीमंत होणं नाही. पैसा किती येतो यापेक्षा तो कसा वापरला जातो, यावर खरी गोष्ट अवलंबून असते.

आम्ही डिंक आहोत तर आता आणखी पैसा कमवायचा तरी कशासाठी, हा प्रश्न आजच्या धावपळीच्या जीवनाला थोडा अस्वस्थ करणारा आहे. कारण, आपण नेमकं किती कमवायचं?

आपल्या आर्थिक महत्त्वाकांक्षेला खरंच शेवट असतो का? की आपण ‘पुरेसं’ म्हणजे काय, हेच विसरलो आहोत? इथे डिंक कपल या ट्रेंडचा संबंध आर्थिक स्वातंत्र्याच्या नव्या कल्पनेशी जोडला जातो; पण डिंक जोडप्यांकडे केवळ एका आकर्षक जीवनशैलीच्या चष्म्यातून पाहणंही चुकीचं ठरेल. कारण, या निवडीमागे काही कठीण प्रश्न आहेत. वृद्ध आई-वडिलांची जबाबदारी असते. आरोग्याचे प्रश्न असतात. दीर्घकाळ एकत्र राहिल्यानंतर नात्यात येणारे बदल असतात. कधी कधी एकटेपणाही असतो. मुलं नसल्यामुळे निर्माण होणारी मोकळी जागा भरण्यासाठी मित्र, नातेवाईक, समाज, छंद, काम आणि अर्थपूर्ण नात्यांची गरज असते. म्हणून डिंक जोडप्यांच्या आयुष्यात मुलं नसली म्हणून नात्यांची गरज संपत नाही. उलट ती कदाचित अधिक जाणीवपूर्वक जपावी लागते. मातृत्व स्वीकारायचे की नाही, कधी स्वीकारायचे, किती मुलं हवीत किंवा अजिबात मुलं नकोत याबाबत डिंक जोडप्यातील स्त्रीचा निर्णयही तितकाच महत्त्वाचा आहे.

कारण, आजची स्त्री स्वतःची व्यावसायिक ओळख, स्वतःची स्वप्नं, स्वतःची आर्थिक ओळख आणि स्वतःचा वेळ यांनाही महत्त्व देते. त्याचवेळी पुरुषाची भूमिकाही बदलत आहे. ‘घर चालवणारा पुरुष आणि घर सांभाळणारी स्त्री’ या पारंपरिक विभागणीला छेद मिळतोय. दोघे कमावतात, दोघे निर्णय घेतात, दोघे घर सांभाळतात आणि दोघेही ठरवतात आपल्या संसाराला कोणता आकार द्यायचा? गरजू मुलांचे शैक्षणिक पाकलत्व घेणारेही डिंक कपल आहेत.

अर्थात आयुष्याच्या पूर्णतेची व्याख्या प्रत्येकाची स्वतःची असते. कुणासाठी मुलांसह छोटंसं घर म्हणजे जगातील सर्वात मोठी श्रीमंती असेल. कुणासाठी दोन माणसं, दोन पगार आणि भरपूर मोकळा वेळ म्हणजे परिपूर्ण आयुष्य असेल. कुणासाठी करिअर हीच ओळख असेल. कुणासाठी समाजकार्य, कुणासाठी प्रवास. म्हणून डिंक ही ‘चांगली’ किंवा ‘वाईट’ जीवनशैली नाही, तर ती एक निवड आहे. आणि कोणतीही निवड तिच्या संदर्भाशिवाय चांगली किंवा वाईट ठरवता येत नाही. खरा प्रश्न मुलं हवीत की नकोत, एवढाच नाही. खरा प्रश्न आहे तो म्हणजे, आपण आपलं आयुष्य कोणाच्या अपेक्षेनुसार जगतोय? समाजाच्या? कुटुंबाच्या? नातेवाईकांच्या? शेजाऱ्यांच्या? सोशल मीडियाच्या की स्वतःच्या? कदाचित डिंक कपल या नव्या संस्कृतीचा सर्वात मोठा परिणाम इथेच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news