AI overuse dangerous | ए.आय.चा अतिरेकी वापर धोकादायकच!

AI overuse dangerous |
AI overuse dangerous | ए.आय.चा अतिरेकी वापर धोकादायकच!
Published on
Updated on

शहाजी शिंदे, संगणकतज्ज्ञ

एकविसाव्या शतकातील माहिती-तंत्रज्ञान युगाला कृत्रिम बुद्धिमत्तेने पूर्णतः कलाटणी दिली आहे. विशेष म्हणजे, एआयच्या गैरवापराचे, अतिवापराचे धोके समोर येत असूनही त्याच्या प्रसाराची गती मंदावलेली नाही. अलीकडेच जगप्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांनी याबाबत भीती व्यक्त केली आहे. मस्क यांच्या मते, भविष्यात एआय मानवजातीसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते; पण त्यासाठी मानवी मूल्ये, नैतिकता आणि सुरक्षितता यांना केंद्रस्थानी ठेवावे लागेल. अन्यथा अत्याधुनिक तंत्रज्ञान मानवाच्या नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका नाकारता येणार नाही.

जगातील सर्वात श्रीमंत उद्योजकांपैकी एक आणि स्टारलिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयच्या भविष्यासंदर्भात पुन्हा एकदा गंभीर चिंता व्यक्त केली आहे. प्रगत एआय मॉडेल्स योग्य नियंत्रणाशिवाय विकसित होत राहिले, तर भविष्यात ते संपूर्ण मानवजातीसाठी धोकादायक ठरू शकतात, असा इशारा त्यांनी दिला. कॅलिफोर्नियातील न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यादरम्यान त्यांनी एआय तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणार्‍या प्रगतीबाबत बोलताना हे विधान केले. विशेष म्हणजे, ज्या ओपन एआय संस्थेने पुढे जाऊन चॅटजीपीटीसारखी प्रणाली विकसित केली, त्या संस्थेच्या सुरुवातीच्या टप्प्यात आर्थिक मदत करणार्‍यांमध्ये स्वतः एलॉन मस्क यांचाही समावेश होता.

मस्क यांच्या मते, एआय तंत्रज्ञान आता केवळ सहायक साधन राहिलेले नाही, तर ते स्वतंत्रपणे निर्णय घेण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. उद्याच्या भविष्यात ही प्रगती नियंत्रणाबाहेर गेली, तर एआय मानवांवरच वर्चस्व गाजवू शकते. न्यायालयात बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, अत्यंत प्रगत एआय प्रणाली भविष्यात आपल्या सर्वांचा जीव घेऊ शकतात. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा जागतिक स्तरावर एआयच्या सुरक्षिततेबाबत चर्चा सुरू झाली आहे. एआयच्या संभाव्य धोक्यांचे वर्णन करताना मस्क यांनी हॉलीवूडमधील प्रसिद्ध ‘टर्मिनेटर’ चित्रपटाचा संदर्भ दिला. या चित्रपटात मशिन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता मानवांविरुद्ध बंड पुकारतात आणि जग विनाशाच्या उंबरठ्यावर पोहोचते. मस्क यांच्या मते, मानवजातीने अशा भविष्याकडे जाणे टाळले पाहिजे. तंत्रज्ञानाचा वापर मानवकल्याणासाठी व्हावा, नियंत्रण गमावण्यासाठी नव्हे, असे ते सतत सांगत आले आहेत.

या चर्चेच्या केंद्रस्थानी एलॉन मस्क आणि ओपन एआय यांच्यातील संघर्षही आहे, ही बाब दुर्लक्षून चालणार नाही. मस्क यांनी न्यायालयात सांगितले की, ओपन एआयच्या स्थापनेत मदत करणे ही त्यांच्या आयुष्यातील वेडसर कल्पना होती. सुरुवातीला ओपन एआय ही मानवहितासाठी कार्य करणारी ना-नफा तत्त्वावरील संस्था म्हणून उभारली जात होती; मात्र पुढे जाऊन ती मोठ्या नफ्यावर लक्ष केंद्रित करणारी तंत्रज्ञान कंपनी बनली. या बदलामुळेच त्यांनी संस्थेपासून स्वतःला दूर केले. गेल्या काही वर्षांत मस्क आणि ओपन एआय यांच्यात कायदेशीर वाद सुरू आहे. मस्क यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी संस्था सोडण्यापूर्वीच चॅटजीपीटीसारख्या एआय एजंटच्या विकासाची दिशा निश्चित झाली होती आणि त्याचा मोठा फायदा पुढे ओपन एआयला झाला. त्यांच्या मते, एआयच्या विकासामध्ये पारदर्शकता आणि नैतिकता अत्यंत महत्त्वाची आहे. काही मोजक्या कंपन्यांच्या हाती अत्यंत शक्तिशाली एआय प्रणाली गेल्या, तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होऊ शकतो.

एआयबद्दलची त्यांची चिंता अचानक निर्माण झालेली नाही. त्यांनी न्यायालयात 2015 मधील एका चर्चेचा उल्लेख केला. त्यावेळी लॅरी पेज यांच्यासोबत एआयच्या भविष्यासंदर्भात त्यांची चर्चा झाली होती. मस्क यांच्या मते, लॅरी पेज यांना वाटत होते की, एआय भविष्यात आदर्श समाज निर्माण करू शकते; मात्र त्या प्रक्रियेत असलेल्या धोक्यांकडे पुरेसे लक्ष दिले जात नव्हते. हाच मुद्दा मस्क सातत्याने मांडत आले आहेत. मस्क यांच्या मते, एआयची प्रगती इतक्या वेगाने होत आहे की, समाज, सरकारे आणि कायदे यांना त्यासोबत जुळवून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. विशेष म्हणजे, एआयबाबत चिंता व्यक्त करत असतानाच मस्क स्वतः अनेक प्रगत तंत्रज्ञान प्रकल्पांवर काम करत आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे न्युरालिंक. या प्रकल्पाद्वारे मानवी मेंदू आणि संगणक यांच्यात थेट संवाद प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मस्क यांच्या मते, भविष्यात मानव बुद्धिमान मशिनशी थेट जोडले गेले, तर मानव आणि एआय यांच्यात अधिक चांगला समतोल निर्माण होऊ शकतो.

त्यांच्या मते, न्यूरालिंकसारखे तंत्रज्ञान एआयच्या संभाव्य धोक्यांपासून मानवजातीचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकते. मानव आणि एआय यांच्यात थेट संवाद शक्य झाला, तर मशिनचे निर्णय आणि मानवी मूल्ये यांच्यात अधिक सुसंगती निर्माण होईल. त्यामुळे एआयला पूर्णपणे स्वतंत्र आणि नियंत्रणाबाहेर जाण्यापासून रोखणे शक्य होऊ शकते. एआय तंत्रज्ञान वैद्यकीय संशोधन, शिक्षण, संरक्षण, उद्योग, वाहतूक आणि दैनंदिन जीवनात मोठे बदल घडवत आहे. त्याचवेळी रोजगारांवरील परिणाम, गोपनियतेचा प्रश्न, चुकीची माहिती पसरविण्याचा धोका आणि स्वयंचलित शस्त्रास्त्रांसारख्या गंभीर मुद्द्यांवरही जगभरात चर्चा सुरू आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, एआयमुळे उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढू शकते; परंतु त्याचा वापर कोणत्या उद्देशाने आणि किती जबाबदारीने केला जातो, यावरच भविष्यातील परिणाम अवलंबून असतील.

सध्या जगभरातील मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये अधिक शक्तिशाली एआय मॉडेल तयार करण्याची स्पर्धा सुरू आहे. अशा स्थितीत एआयच्या नैतिक वापराचा प्रश्न अधिक महत्त्वाचा बनला आहे. मस्क यांच्या मते, भविष्यात एआय मानवजातीसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते; पण त्यासाठी मानवी मूल्ये, नैतिकता आणि सुरक्षितता यांना केंद्रस्थानी ठेवावे लागेल. अन्यथा अत्याधुनिक तंत्रज्ञान मानवाच्या नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका नाकारता येणार नाही. त्यांचा तंत्रज्ञानाला विरोध नाही; पण अनियंत्रित आणि बेफाम प्रगतीबाबत चिंता आहे. त्यामुळे एआयचा वापर केवळ नफा किंवा स्पर्धेसाठी नव्हे, तर संपूर्ण मानवजातीच्या हितासाठी व्हावा, हीच भविष्यासाठी सर्वात मोठी गरज असेल.

अण्वस्त्रांइतकाच संवेदनशील प्रश्न

एकीकडे मस्क हे स्वतः अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करणारे उद्योजक आहेत, तर दुसरीकडे त्या तंत्रज्ञानामुळे निर्माण होणार्‍या संभाव्य धोक्यांबाबतही ते सातत्याने सावधगिरीचा इशारा देत आहेत. त्यांच्या मते, एआयचा विकास पूर्णपणे थांबवणे शक्य नाही आणि ते योग्यही नाही; मात्र त्यावर योग्य नियंत्रण, स्पष्ट नियम आणि जागतिक पातळीवरील नियमन आवश्यक आहे. अन्यथा काही कंपन्या किंवा काही शक्तिशाली संस्था एआयच्या माध्यमातून अतिप्रभावशाली बनू शकतात. मस्क यांनी अनेकदा असेही म्हटले आहे की, एआयचा विकास अण्वस्त्र तंत्रज्ञानाइतकाच संवेदनशील विषय ठरू शकतो. कारण, एकदा अत्यंत प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित झाली आणि ती मानवी नियंत्रणापलीकडे गेली, तर तिचे परिणाम थांबवणे कठीण होईल. त्यामुळे सरकारे, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी एकत्र येऊन सुरक्षिततेचे स्पष्ट मानदंड तयार करणे आवश्यक असल्याचे ते मानतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news