

Kawasaki Ninja H2
नवी दिल्ली : दुचाकीप्रेमींसाठी Kawasaki ने 2027 च्या Ninja H2 लाइनअपचे अनावरण केले आहे. या नव्या श्रेणीत Ninja H2, केवळ ट्रॅकवर वापरण्यासाठी असलेली Ninja H2R आणि मर्यादित संख्येत उपलब्ध होणाऱ्या H2 Carbon या मॉडेल्सचा समावेश आहे. या अपडेटेड मॉडेल्सची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी घोषणा करण्यात आली असली, तरी भारतात त्यांचे लाँचिंग कधी होणार, याबाबत अद्याप स्पष्ट केलेले नाही.
2027 च्या Ninja H2 मध्ये कावासाकीने सुपरचार्ज्ड इंजिनमध्ये महत्त्वाचे मेकॅनिकल बदल केले आहेत. यात नव्या डिझाइनचे इम्पेलर आणि इनटेक सिस्टीमचा समावेश करण्यात आला आहे. या बदलांमुळे नवीन पिस्टन, सिलिंडर हेड आणि क्रैंकशाफ्ट अधिक कार्यक्षम बनले आहेत, सोबतच नवीन थ्रॉटल बॉडी आणि एक्झॉस्ट सिस्टीम देखील देण्यात आली आहे.
रोड-लीगल निंजा एच२ आता २०६ एचपी पॉवर आणि १३५ एनएम टॉर्क जनरेट करते. विशेष म्हणजे, मागील मॉडेलच्या २४० एचपी पॉवर आणि १४२ एनएम टॉर्कच्या तुलनेत हे प्रमाण काहीसे कमी करण्यात आले आहे. मात्र, दुसरीकडे केवळ रेस ट्रॅकसाठी बनवलेली 'Ninja H2 R' पूर्वीप्रमाणेच अफाट अशा २९६ एचपी पॉवर आणि १४२ एनएम टॉर्क सह धावणार आहे.
नवीन २०२७ कावासाकी Ninja H2 मध्ये रायडरच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक सूट देण्यात आला आहे. यात दोन डिस्प्ले मोड्ससह एक नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जोडण्यात आला आहे, ज्याचा एव्हिएशन-प्रेरित लेआउट बूस्ट आणि लीन-अँगलची अत्यंत अचूक माहिती देतो. इलेक्ट्रॉनिक सिस्टीममध्येही सुधारणा केली आहे. यात ट्रॅक्शन कंट्रोल आणि लॉन्च कंट्रोल सिस्टीमचा समावेश आहे. याशिवाय कॉर्नरिंग मॅनेजमेंट फंक्शन, KIBS ABS, क्विक शिफ्टर, इंजिन ब्रेक कंट्रोल, ओहलिन्स इलेक्ट्रॉनिक स्टीयरिंग डॅम्पर, क्रूझ कंट्रोल आणि राइडोलॉजी अॅपच्या माध्यमातून स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी अशी फीचर्स देण्यात आली आहेत.
यूकेमध्ये 2027 कावासाकी Ninja H2 ची किंमत 28,600 पाउंड म्हणजेच सुमारे 36.7 लाख रुपये आहे. तर नवीन H2 Carbon ची किंमत 31,350 पाउंड, म्हणजेच अंदाजे 40.2 लाख रुपये आहे. मात्र, अपडेटेड Ninja H2 रेंज भारतात पुन्हा उपलब्ध होणार आहे की नाही, याबाबत Kawasaki कडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. काही वर्षांपूर्वी कंपनीने भारतातील अधिकृत लाइनअपमधून हे मॉडेल बंद केले होते.
कावासाकी Ninja H2 ने भारतामध्ये एप्रिल २०१५ मध्ये दिमाखात पदार्पण केले होते आणि ही देशातील पहिली रोड-लीगल सुपरचार्ज्ड मोटरसायकल ठरली होती. ही बाईक २९ लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत बाजारात आणली गेली होती. मात्र, फेब्रुवारी २०२५ मध्ये ही बाईक अधिकृत लाइनअपमधून बंद करण्यात आली, ज्याची शेवटी एक्स-शोरूम किंमत ३४.९९ लाख रुपयांवर पोहोचली होती. आता अपडेटेड रेंज भारतात पुनरागमन करणार का, याकडे बाईकप्रेमींचे लक्ष लागले आहे.