

Dhanteras Diwali 2025 : देशभरात दिवाळी सणाला शुक्रवारपासून उत्साहात प्रारंभ झाला. आज धनत्रयोदशी असून हा सण भगवान धन्वंतरी तसेच लक्ष्मी माता आणि कुबेर महाराज यांच्या पूजेचा दिवस आहे. धनत्रयोदशीच्या संध्याकाळी काही गोष्टी टाळल्या पाहिजेत, कारण त्या शुभ परिणामांऐवजी अशुभ गोष्टी आणू शकतात. कोणत्या चुका टाळायच्या हे जाणून घ्या.
सायंकाळी घरात झाडू लावू नका
धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करणे शुभ असले, तरी संध्याकाळीनंतर झाडू लावणे अत्यंत अशुभ मानले जाते. असे केल्यास माता लक्ष्मी रुष्ट होतात आणि घरातील समृद्धी कमी होते. म्हणून सूर्यास्तानंतर झाडू लावू नये.
दरवाजा बंद करू नका
धनत्रयोदशीचा दिवस दिवाळीच्या पर्वाची सुरुवात मानला जातो आणि या दिवशी माता लक्ष्मीचे पृथ्वीवर आगमन होते. या रात्री माता लक्ष्मी स्वतः घरोघरी फिरते, असा विश्वास आहे. त्यामुळे या दिवशी घराचे दरवाजे बंद करणे किंवा कुलूप लावणे अशुभ मानले जाते. जर घराचा मुख्य दरवाजा बंद असेल, तर घर माता लक्ष्मीच्या कृपेपासून वंचित राहते.
मीठाचे दान करू नका
धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजे आज दान करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी गरीब लोकांना भोजन, कपडे, दिवे, धन इत्यादी दान केले जाऊ शकते, परंतु सायंकाळी काही वस्तूंचे दान करणे वर्जित मानले जाते, विशेषतः मीठ आणि साखरेचे दान. ज्योतिष शास्त्रानुसार, सायंकाळच्या वेळी मीठाचे दान केल्याने राहूचा प्रभाव वाढतो, ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात मानसिक ताण, असंतोष आणि आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात.
कोणालाही पैसे उधार देऊ नका
धनत्रयोदशीच्या सायंकाळी कोणालाही पैसे उधार देणे अत्यंत अशुभ मानले जाते. शास्त्रानुसार, या दिवशी जर एखादी व्यक्ती धन उधार देते, तर माता लक्ष्मी देखील घरातून निघून जाते. यामुळे घरात आर्थिक अस्थिरता येऊ शकते आणि वर्षभर धनाचे नुकसान किंवा अडथळे कायम राहू शकतात. धार्मिक मान्यतेनुसार, धनतेरसच्या सायंकाळी पैसे उधार देणे, किंवा कोणाकडून पैसे घेणे हे दोन्ही अशुभ आहे.
रिकामी भांडी आणू नका
याच दिवशी समुद्रमंथनातून धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. म्हणूनच धनत्रयोदशीला धन्वंतरीसह माता लक्ष्मी, कुबेर देव यांची पूजा करण्याची विशेष परंपरा आहे. आज खरेदी केलेले भांडे वर्षभर घरात सुख-समृद्धी आणि लक्ष्मीचा वास कायम ठेवते, असे म्हटले जाते.
पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सायंकाळी रिकामी भांडी कधीही घरात आणू नये. धार्मिक मान्यतेनुसार, रिकामी भांडी घरात आणणे दरिद्रता याचे संकेत मानले जाते. त्यामुळे जेव्हाही तुम्ही नवीन भांडी खरेदी कराल, तेव्हा त्यांत थोडेसे पाणी, दूध, गूळ किंवा तांदूळ टाकून घरी आणले पाहिजे.