पुढारी वृत्तसेवा
शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदाही आयोजित केलेल्या दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले.
या दीपोत्सवात उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंचे परिवार एकत्र आले होते.
मराठी माणसाची एकजूट आणि या एकजुटीचा प्रकाश सगळ्यांच्या जीवनात आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही, असेच आनंदात राहा आणि प्रकाश देत राहा, अशा शुभेच्छा उद्धव यांनी यावेळी जनतेला दिल्या.
आगामी महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला असतानाच यंदाची दिवाळीही त्यांनी एकत्रच सुरू केली.
दरवर्षी मनसेतर्फे शिवाजी पार्कला दीपोत्सव होतो. मात्र, यंदा प्रथमच या उत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्याहस्ते झाले.
उद्घाटन सोहळ्याला राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे यांच्यासह दोन्ही ठाकरे कुटुंबीय उपस्थित होते.
राज आणि शर्मिला ठाकरे, त्यांचे चिरंजीव अमित व सून मिताली, राजकन्या उर्वशी ठाकरे, उद्धव आणि रश्मी ठाकरे, चिरंजीव आदित्य आणि तेजस ठाकरे उपस्थित होते.