

Chaturmas Rules and Significance : आषाढी एकादशीच्या पावन पर्वापासून सुरू होणारा चातुर्मास म्हणजे केवळ एका उपवासाचा काळ नाही, तर आत्मशुद्धी आणि भक्तीचा अनोखा प्रवास आहे. आपल्या पूर्वजांनी चातुर्मासाला धार्मिक व्रतांची जोड दिली असली, तरी त्यामागे अत्यंत सखोल आरोग्यशास्त्र आणि विज्ञान दडले आहे. या काळात बहुतांश लोक कांदा-लसूण सोडणे, एकभुक्त राहणे किंवा विशेष व्रतांचे पालन करतात; पण चातुर्मासात या नियमांचे पालन का केले जाते? या चार महिन्यांच्या काळात कोणते नियम पाळावेत आणि याचे धार्मिक महत्त्व काय? याची माहिती पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक गौरव देशपांडे यांनी युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. याबाबत जाणून घेऊया...
गौरव देशपांडे सांगतात, सर्वसाधारणपणे चातुर्मासाचा उल्लेख निघाला की लोकांच्या डोळ्यांसमोर ठराविक गोष्टी येतात की, आषाढी एकादशीला देव झोपतात आणि कार्तिकी एकादशीला देव जागे होतात. या चार महिन्यांत लग्न, मुंज किंवा गृहप्रवेशांसारखी मंगलकार्ये वर्ज्य मानली जातात. काही लोक कांदा-लसूण सोडतात, तर काही लोक विशिष्ट भाज्यांचा त्याग करतात. परंतु प्राचीन वाङ्मयाचा अभ्यास केल्यानंतर असं जाणवतं की चातुर्मासाचे हे आकलन अत्यंत वरवरचे आहे. चातुर्मास हा केवळ उपाशी राहण्याचा काळ नाहीये, तर तो संतसंगत, ग्रंथश्रवण आणि आत्मोन्नतीचा असा एक काळ सांगितलेला आहे.
सर्वसाधारणपणे आषाढ शुक्ल एकादशी म्हणजे देवशयनी एकादशीपासून ते कार्तिक शुक्ल एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशीपर्यंतचा काळ हा चातुर्मास म्हणून मानला जातो. धर्मशास्त्रात या चार महिन्यांच्या कठोर पालनाला 'मुख्य कल्प' असं म्हटलं आहे; परंतु ज्यांना शारीरिक व्याधी आहेत, जे लोक वृद्ध आहेत किंवा गर्भवती स्त्रिया आहेत, त्यांच्यासाठी शास्त्राने 'अनुकल्प' म्हणजे शिथिलतेचा पर्यायसुद्धा दिला आहे. यावरून स्पष्ट होतं की आमचं शास्त्र जे आहे ते जड नाहीये, तर ते मानवी आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देणारं शास्त्र आहे.
देवशयन म्हणजे भगवान विष्णू खरोखरच थकतात किंवा गाढ झोपून जातात का? अजिबात नाहीये. तर यामागे अत्यंत प्रगल्भ खगोलशास्त्रीय आणि जैविक सत्य लपलेले आहे. आपल्या पंचांग पद्धतीमध्ये वर्षाचे दोन भाग पडतात—उत्तरायण आणि दक्षिणायन. उत्तरायण हा देवांचा दिवस मानला जातो, तर दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते. आषाढ महिन्याच्या सुमारास जेव्हा सूर्य कर्क राशीत प्रवेश करतो, तेव्हा दक्षिणायन अधिकृतपणे सक्रिय होत असतं.
आधुनिक विज्ञानाच्याच परिभाषेत सांगायचं झालं, तर या काळात पृथ्वीचा सूर्यसापेक्ष कोन बदलतो. आकाश ढगांनी व्यापून जातं (मेघाच्छादित होतं), आर्द्रता वाढते. सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्याचे प्रमाण आणि त्याची तीव्रता कमालीची घटते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे सूर्य हा जगाचा आत्मा आणि आपल्या शरीरातील जठराग्नीचा (ज्याला आपण Metabolic Fire म्हणतो) त्याचा मुख्य स्रोत आहे. जेव्हा बाह्य सृष्टीतील सूर्याचं बळ कमी होतं, तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरातील पचनसंस्थेवर आणि रोगप्रतिकारक शक्तीवर होत असतो. भगवान विष्णू हे सृष्टीचे पालनकर्ते आहेत. पालन करणं म्हणजे केवळ अन्न देणं नव्हे, तर शरीराचं आणि निसर्गाचं संतुलन राखणं अभिप्रेत आहे. विष्णू योगनिद्रेत जातात याचा अर्थ काय होतो? बाह्य सृष्टीतील चैतन्य आता लुप्त होतंय आणि त्यामुळे ऋषींनी साधकाला असा संकेत दिलाय की, बाह्य जगातील भोग आता कमी कर आणि आंतरजगतामध्ये प्रविष्ट हो. म्हणजेच, बाह्य देवशयनाच्या निमित्ताने अंतर्गत जागरण करणं हा चातुर्मासाचा खरा आध्यात्मिक आणि वैज्ञानिक असा हेतू याच्यामध्ये अभिप्रेत आहे.
आता धर्मशास्त्राच्या ग्रंथात चातुर्मासात वर्ज्य असलेल्या गोष्टींची एक मोठी यादीच दिली आहे. खाटेवर शयन न करणं, परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचं न खाणं, मांस, मद्य, व्यसन यांच्यापासून दूर राहणं. परंतु आजकाल एक विचित्र प्रथा पाहायला मिळते; लोक चातुर्मासामध्ये शारीरिक नियमांमध्ये कांदा-लसूण सोडतात, मांसाहार सोडतात; पण दिवसभर टीव्हीवर किंवा मोबाईलवर आक्षेपार्ह गोष्टी पाहतात, परनिंदा करतात. व्यवसायामध्ये खोटं बोलतात आणि मनात लोभ व क्रोध बाळगतात. शास्त्र काय सांगतंय? अन्नाच्या शुचितेबरोबरच वाणीची शुचिता आणि विचारांचीही शुचिता तितकीच महत्त्वाची आहे. चातुर्मासात नकारात्मक विचारांचा आणि सोशल मीडियाच्या अतिवापराचा त्याग करणं हाच आधुनिक काळातील खरा मानसिक चातुर्मास आहे असं म्हणायला हरकत नाही.
चातुर्मासात अन्नाचा एक विशेष प्रकार सांगितला आहे, याला 'हविष्य' (हविष्यान्न) म्हणतात. हविष्य म्हणजे अन्न यज्ञात आहुती देण्यासाठी पवित्र मानलं जातं. यामध्ये जुने तांदूळ, गहू, मूग, वरई, गाईचं तूप, साधं दूध आणि विशिष्ट फळांचा समावेश होतो. हविष्यान्नामुळे शरीरातील मेटाबॉलिझम (Metabolism) सुधारतं, पेशींची झीज भरून निघते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सात्त्विक आहारामुळे मनातील सत्त्वगुण वाढतो; ज्यामुळे ध्यान आणि जपाचा वेळ या चातुर्मासाच्या काळात वाढीस लागतो.
२०१६ मध्ये जपानचे वैज्ञानिक योशिनोरी ओशुमी (Yoshinori Ohsumi) यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या 'ऑटोफॅजी' (Autophagy) विषयी संशोधनाला हा पुरस्कार मिळाला होता. या संशोधनानुसार, मानवी शरीर काही काळ उपाशी राहतं, तेव्हा शरीरातील जिवंत आणि सुदृढ पेशी शरीराच्या आत साठलेला कचरा, मृतपेशी, ट्यूमरचे कण आणि व्हायरस यांना स्वतःच खाऊन नष्ट करून टाकतात आणि शरीर आतून स्वच्छ करतात. त्याला विज्ञानाने 'Cellular Recycling' असं म्हटलं आहे. आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी ओळखलं होतं की मानवी शरीर हे एक यंत्रासारखं आहे; जर हे यंत्र २४ तास चालू राहिलं तर ते लवकर खराब होईल, त्याला विश्रांतीची गरज देखील आहे; म्हणून त्यांनी चातुर्मासात उपवासाची साखळी तयार केली.
शास्त्र सांगतं की कोणते व्रत हे 'यथाशक्ती' करा. त्यामुळेच मधुमेह, हृदयविकार किंवा गर्भावस्थेत कडक उपवास करु नयेत. शरीराला त्रास देणे म्हणजे उपवास नव्हे, तर शरीराला शुद्ध साधन बनवणं हा खरा उपवासाचा अर्थ आहे. चातुर्मास हा मुख्यतः पावसाळा आणि त्यानंतर येणाऱ्या शरद ऋतूचा काळ आहे. या काळात जलस्रोत दूषित होतात. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर पाण्याचा pH value बदलतो आणि पाण्यात जलजन्य रोगजंतू वाढतात. प्राचीन काळात जर लोकांनी प्रवास केला, बाहेरचं पाणी प्यायलं तर महामारी पसरू शकते हे स्पष्ट झाले होते; म्हणून या काळात प्रवास करू नका, पाणी उकळून प्या आणि मर्यादित असा आहार घ्या, असे सांगितले गेले. धर्मशास्त्राच्या भाषेत त्याला 'व्रत' असं म्हटलं गेलं आहे; पण आधुनिक विज्ञानाच्या भाषेत हा भारताच्या हवामानानुसार तयार केलेला 'Seasonal Health Protocol' आहे असं म्हणायला हरकत नाही.
चातुर्मासात लग्न, मुंज यांसारखी मांगलिक कर्मे करत नाहीत, कारण शुभ कार्ये बंद होतात; पण 'पुण्य कार्ये' बंद होत नाहीत! चातुर्मासात केलेलं नामस्मरण, अन्नदान, वस्त्रदान, गोसेवा आणि गरजू किंवा रुग्णांना केलेली मदत इतर दिवसांपेक्षा हजार पटीने अधिक पुण्य देणारी मानली गेली आहे. चातुर्मास हा बाह्य प्रदर्शन कमी करून अंतर्गत गुणांचा विकास करण्याचा असा काळ आहे.
पहिला नियम (जिभेचा): श्रावणात पालेभाज्या, भाद्रपदात दही, आश्विनात दूध आणि कार्तिकात डाळींचे सेवन मर्यादित करा किंवा प्रकृतीनुसार टाळा. बाहेरचं, उघड्यावरचं अन्न पूर्ण बंद करा.
दुसरा नियम (वाणीचा): दिवसातून किमान एक तास पूर्ण मौन पाळा किंवा या चार महिन्यांत कोणाचीही परनिंदा/गॉसिपिंग करणार नाही असा कडक संकल्प करा.
तिसरा नियम (मनाचा): रोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान १०८ वेळा विष्णूंचे स्मरण, विष्णुसहस्रनाम, 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' किंवा तुमच्या कुलदेवतेच्या नाममंत्राचा जप करा.
चौथा नियम (डिजिटल डिटॉक्सचा): सध्याच्या काळात हा नियम घ्यायलाच पाहिजे—रात्री ९ नंतर मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर पूर्णपणे बंद करा, आणि तो वेळ कुटुंबाला व ग्रंथवाचनाला आपण या काळात देऊ शकता.
पाचवा नियम (दानधर्माचा): या चार महिन्यांत आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा गोरगरिबांच्या शिक्षणासाठी किंवा गोसेवेसाठी (चाऱ्यासाठी) नक्की खर्च करा.
तुम्ही सर्व नियम पाळू शकला नाही तरी हरकत नाही, पण यातील किमान एक नियम पूर्ण श्रद्धेने आणि शिस्तीने पाळा; तोच तुमचा खरा चातुर्मास ठरेल, असेही पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक श्री. गौरव देशपांडे यांनी आपल्या मार्गदर्शनात स्पष्ट केले आहे.