

Kiranotsav Khidrapur
जमीर पठाण
कुरुंदवाड : खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील कोपेश्वर मंदिर परिसरात गुरुवारी (दि.७) धार्मिक परंपरा आणि खगोलशास्त्रीय वैशिष्ट्यांचा दुर्मिळ संगम अनुभवायला मिळाला. पहाटे पारंपरिक ‘किरणोत्सव’ सोहळ्यात सूर्यकिरणांनी शिवलिंगपिंडी उजळून निघाल्यानंतर दुपारी ‘शून्य सावली’ हा खगोलीय चमत्कारही नागरिकांनी प्रत्यक्ष अनुभवला. त्यामुळे दिवसभर मंदिर परिसरात भाविक, पर्यटक, विद्यार्थी आणि खगोलप्रेमींची मोठी गर्दी केली होती.
पहाटे सूर्योदयाच्या वेळी सकाळी ६.३३ वाजता मंदिराच्या प्रवेशद्वारातून आलेले सूर्यकिरण थेट गाभाऱ्यात प्रवेश करून शिवलिंगपिंडीवर पडले. पारंपरिक ‘किरणोत्सव’ सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडताच उपस्थितांनी “हर हर महादेव”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. मंदिराच्या स्थापत्य रचनेतील अचूकता आणि प्राचीन भारतीय वास्तुकलेचे वैशिष्ट्य यावेळी पुन्हा अधोरेखित झाले.
दुपारी १२.५७ वाजता ‘शून्य सावली’चा दुर्मिळ अनुभव पाहण्यासाठी नागरिकांनी मंदिर परिसरात गर्दी केली. सूर्य पृथ्वीच्या अगदी डोक्यावर आल्याने काही क्षण उभ्या वस्तूंची सावली पूर्णपणे नाहीशी झाली. विद्यार्थी, खगोलप्रेमी आणि नागरिकांनी काठी, बाटल्या व विविध वस्तू उभ्या करून सावली निरीक्षणाचे प्रयोग केले. काही क्षण सावली अदृश्य झाल्यानंतर ती पुन्हा विरुद्ध दिशेला दिसू लागल्याने उपस्थितांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
पृथ्वीच्या अक्षाच्या झुकावामुळे आणि सूर्याच्या भ्रमणामुळे वर्षातून दोन वेळा ‘शून्य सावली’ची घटना घडते. महाराष्ट्रातील काही भागांत मे महिन्यात हा अनुभव पाहायला मिळतो. खिद्रापूर परिसरात ही घटना स्पष्टपणे दिसून आल्याने नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता होती.धार्मिक श्रद्धा, प्राचीन स्थापत्यकला आणि खगोलशास्त्र यांचा एकाच दिवशी अनुभव मिळाल्याने खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर परिसर गुरुवारी विशेष आकर्षणाचे केंद्र ठरला.