

आज गुडीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाची सुरूवात आणि त्याच सोबत सुरू झाली आहे चैत्र नवरात्र. पुराणांनुसार चैत्र नवरात्र आणि अश्विन म्हणजेच शारदीय नवरात्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे. शारदीय नवरात्र जरी मुख्य नवरात्र म्हणुन साजरी केली जात असली तरी चैत्र नवरात्रीला देवी दुर्गाच महत्त्व प्राप्त आहे. शारदीय नवरात्रीत देवीचे विविध नऊ रूपे जशी पुजली जातात, तशी चैत्र नवरात्रात देखील पुजतात.
माँ शैलपुत्री, माँ ब्रम्हचारिणी, माँ चंद्रघंटा, माँ कुष्मांडा, माँ स्कंदमाता, माँ कात्यायनी, माँ कालरात्री, माँ महागौरी, माँ सिध्दिदात्री ही देवीची रूपे मुख्यता मानली जातात. चैत्र नवरात्री गुडीपाडव्याला सुरू होऊन रामनवमीला संपणार आहे. या काळात शारदीय नवरात्र प्रमाणे घटस्थापना, कन्या पुजन, व्रत वैकल्य, पार पाडले जातात. प्रत्येक सणाला व्रत वैकल्याला पुराणामध्ये जशा कथा आहेत, तशी चैत्र नवरात्रमागे सुद्धा एक कथा आहे.
चैत्र नवरात्रची व्रत कथा
पौराणिक कथेनुसार एकदा देवगुरू बृहस्पतींनी ब्रम्हदेवाला नवरात्री व्रताचं महत्त्व विचारल. ब्रम्हदेवांनी सांगितले कि, हे व्रत केल्याने संतान सुख, धन, ज्ञान, आणि समृद्धी प्राप्त होते. याच्या प्रभावातुन रोग दूर होतात तर पापांपासून मुक्ति मिळते. हे व्रत न करणाऱ्या व्यक्तिला जीवनात अनेक कष्टांना समोरे जावे लागते.
एक कथा अशी आहे की, मनोहर नगरात पीठत नावाचा एक ब्राम्हण राहत होता. त्याची मुलगी सुमती देवा दुर्गाची मोठी भक्त होती. पण एक दिवस ती पुजेला येऊ शकली नाही, ज्यामुळे तिचे वडील नाराज झाले आणि तिचा विवाह एका कुष्ठ रोगीसोबत केला. विवाहानंतर सुमती तिच्या पती सोबत जंगलात गेली.
सुमतीवर देवीची कृपा
जंगलात सुमतीला अनेक कष्टांना सामोरे जावे लागले. तिचे कष्ट बघुन देवी दुर्गाने तिला दर्शन देत वरदान मागायला लावलं. त्यावेळी सुमतीने आपल्या पतीची कुष्ठ रोगतुन मुक्ती मिळण्याची प्रार्थना केली. तेव्हा देवीने तिला सांगितल की, मागच्या जन्मात तिच्याकडून नकळत नवरात्रीच व्रत केलं गेलं, त्या पुण्यामुळे आज तिला आशिर्वाद मिळत आहे. देवीच्या कृपेने तिचा पती बरा झाला आणि दोघे सुखी जीवन जगू लागले.
या व्रतात नऊ दिवस देवीची पुजा केली जाते. जर पूर्ण दिवस शक्य नसेल तर फक्त एक वेळचे जेवण करून व्रत करावे. घटस्थापना करून देवीला फळ, फुल, प्रसाद अर्पण करावा. व्रताच्या शेवटच्या दिवशी हवन आणि कन्या पूजन केल्याने विशेष फळ प्राप्त होते.
ब्रम्हदेव सांगतात की, जो व्यक्ती भक्तिभावाने हे व्रत करतो त्याला जीवनात सगळ्या सुख-सोई मिळतात. या व्रताने पुण्य वाढते आणि मोक्ष मिळतो आणि याच सोबत देवाच्या आशीर्वादाने जीवनात कोणतेही संकट येत नाही.