Israel Iran War: इस्रायल–इराण संघर्ष का तापला? भारतावर युद्धाचा काय परिणाम होणार?

Israel Iran War Impact on India: इस्रायलने इराणवर प्रिव्हेंटिव्ह अटॅक केल्यानंतर पश्चिम आशियातील तणाव वाढला आहे. या संघर्षामुळे कच्च्या तेलाचे दर, शेअर बाजार, रुपया आणि महागाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Israel Iran War Impact on India
Israel Iran War Impact on IndiaPudhari
Published on
Updated on

Israel Iran War Impact on India: इस्रायलने अमेरिकेच्या सहकार्याने इराणमधील तेहरानसह काही लष्करी ठिकाणांवर प्रिव्हेंटिव्ह अटॅक म्हणजेच संभाव्य धोक्याला आळा घालण्यासाठी लष्करी कारवाई केल्याचा दावा केला आहे. त्यानंतर पश्चिम आशियातील तणाव वाढला आहे. हा संघर्ष फक्त दोन देशांपुरता मर्यादित नाही; त्याचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्था, ऊर्जा पुरवठा आणि भारतासारख्या आयातीवर अवलंबून असलेल्या देशांवर होणार आहेत.

इस्रायल–इराण संघर्षाची कारणे कोणती?

1) अणुऊर्जा प्रकल्पावरील अविश्वास

इस्रायल आणि अमेरिकेचा आरोप आहे की, इराण गुप्तपणे अण्वस्त्र प्रकल्प राबवत आहे. त्याची माहिती देत नाही. इस्रायलच्या दृष्टीने हा देशासाठी धोका आहे. इराण मात्र आपला कार्यक्रम शांततेसाठी असल्याचे सांगत आहे.

2) दहशतवादी कारवाया

इराणवर हमास (गाझा) आणि हिज्बुल्ला (लेबनॉन) यांसारख्या संघटनांना पाठबळ देण्याचे आरोप आहेत. इस्रायलचे म्हणणे आहे की, या संघटनांच्या कारवायांमुळे त्यांच्या देशाच्या सीमेवर सतत तणावाची परिस्थिती निर्माण होत आहे.

3) 1979 नंतरचे संबंध

इराणमधील इस्लामी क्रांतीनंतर दोन्ही देशांतील संबंध बिघडले आहेत. तेव्हापासून परस्पर अविश्वास आणि आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत.

4) सीरियातील समीकरणे

सीरियात इराणची वाढती उपस्थिती इस्रायलला धोकादायक वाटत आहे. त्यामुळे इस्रायलने तेथील इराणी ठिकाणांवर पूर्वीही कारवाया केल्या आहेत.

युद्धाचा भारतावर काय परिणाम होणार?

1) कच्चे तेल, पेट्रोल-डिझेल आणि महागाई

भारत सुमारे 80% पेक्षा जास्त कच्चे तेल आयात करतो. मध्य पूर्वेत तणाव वाढला की ब्रेंट क्रूडचे दर वाढण्याची शक्यता असते.

  • कच्च्या तेलात प्रत्येक 1 डॉलर वाढ झाली, तर देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या किमतीत 50–60 पैशांची वाढत होते, असा अंदाज आहे.

  • इंधन महागल्यास वाहतूक खर्च वाढतो आणि त्याचा परिणाम भाजी-फळे, किराणा आणि इतर दैनंदिन वस्तूंवर होतो.

  • महागाई वाढल्यास घरगुती खर्चावर त्याचा परिणाम होतो.

2) शेअर बाजार, सोने आणि रुपया

  • युद्धाच्या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार रिस्क घेण्याचे टाळतात; त्यामुळे शेअर बाजारात घसरण दिसू शकते.

  • 'सेफ हेवन' म्हणून सोन्या-चांदीची मागणी वाढते; त्यांच्या किमती विक्रमी पातळीवर जाऊ शकतात.

  • डॉलरची मागणी वाढल्यास रुपया घसरु शकतो, ज्याचा आयातीवर परिणाम होतो आणि आयात महाग होते.

Israel Iran War Impact on India
Israel attacks Iran Video: इस्रायलचा इराणवर हल्ला, तेहरानमध्ये स्फोट; आकाशात धुराचे लोट पसरले, नेमकं काय घडलं?

भू-राजकीय आणि व्यापाराशी संबंधित परिणाम

1) चाबहार बंदर

इराणमधील चाबहार बंदर भारतासाठी मध्य आशियाचे प्रवेशद्वार आहे. या प्रकल्पात भारताने मोठी गुंतवणूक केली आहे. तणाव वाढल्यास लॉजिस्टिक्स आणि महत्त्वाच्या प्रकल्पांवर परिणाम होऊ शकतो.

2) होर्मुज सामुद्रधुनी

जगातील सुमारे 20% तेल आणि भारतात येणाऱ्या तेलातील मोठा हिस्सा या अरुंद समुद्री मार्गाने येतो. हा मार्ग बंद झाला तर पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते आणि तेलाचे दर झपाट्याने वाढू शकतात.

विमान वाहतूक आणि प्रवास

  • काही देशांचे हवाई क्षेत्र बंद झाल्यास विमानांना पर्यायी मार्गाने जावे लागणार आहे.

  • प्रवासाचा कालावधी आणि इंधनखर्च वाढल्याने तिकीटदर वाढू शकतात.

  • कार्गो उड्डाणांवर परिणाम झाल्यास आयात-निर्यातीवर परिणाम होऊ शकतो.

पश्चिम आशियातील भारतीयांची सुरक्षा

पश्चिम आशियात लाखो भारतीय कामगार आणि व्यावसायिक राहतात. संघर्ष वाढल्यास त्यांच्या सुरक्षिततेसाठी भारताला विशेष मोहिमा राबवाव्या लागू शकतात. दूतावासात सुरक्षा वाढवणे आणि प्रवासी भारतीयांना मार्गदर्शन करणे अशा वेळी महत्त्वाचे असते.

थोडक्यात इस्रायल–इराण तणाव हा केवळ प्रादेशिक प्रश्न नाही. तेलाचे दर, बाजारपेठा, व्यापारी मार्ग आणि प्रवासी या सर्वांवर त्याचे थेट किंवा अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतात. त्यामुळे परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून योग्य वेळी धोरणात्मक पावले उचलणे भारतासाठी महत्त्वाचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news