

युटीआय फ्लेक्झीकॅप फंड गेल्या 33 वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात आहे. हा फंड युटीआय मास्टरगेन 1991 म्हणून अस्तित्वात आला. काही फंडाच्या विलीनीकरणा पश्चात हा फंड युटीआय इक्विटी फंड म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढे फंडाची ओळख बदलून हा फंड सध्याच्या रुपात 1 जानेवारी 2013 पासून अस्तित्वात आला.
वसंत माधव कुळकर्णी
निफ्टी 500 टीआरआय हा युटीआय फ्लेक्झीकॅप फंडाचा मानदंड असून, फंडाची मालमत्ता 31 ऑक्टोबर 2025 रोजी 25757 कोटी होती. फंडाच्या गुंतवणुकीत सर्व बाजार भांडवलीकरण असलेल्या कंपन्या असल्या तरी हा फंड लार्जकॅप केंद्रित फंड आहे. या फंडाला संपत्ती निर्मिती आणि अल्फा निर्मितीचा एक सशक्त इतिहास आहे. या फंडाचे (युटीआय इक्विटी फंडाचे) नियुक्त निधी व्यवस्थापक म्हणून अजय त्यागी यांची जानेवारी 2016 पासून नेमणूक झाली. जर तुम्ही 1 जानेवारी 2016 रोजी 1 लाख रुपये फंडाच्या रेग्युलर ग्रोथ प्लॅनमध्ये गुंतविले असते तर 14 नोव्हेंबर 2025 रोजी 3.26 लाख झाले असते. या कालावधीत परताव्याचा वार्षिक दर 12.75 टक्के होता.
अमेरिकेने लादलेले आयात शुल्क कमी होणे, महागाईचा फार निच्चांकी स्थरावर पोहचल्याने रिझर्व्ह बँक डिसेंबर महिन्यातील आगामी पत धोरण आढावा बैठकीत पाव टक्के व्याज दर कपात अपेक्षित आहे. सप्टेंबर 2024 पासून सतत घसरत असलेला बाजार फेब्रुवारी पासून स्थिरावू लागला. वर उल्लेख केलेल्या घटनांमुळे बाजारात तेजीची लाट आली आहे. जिएसटी सुधारणा .2 नंतर वाहन क्षेत्रात उच्चांकी विक्री झाल्याचे दिसून आले. सरलेल्या सणासुदीच्या हंगामात ग्राहकांनी भरपूर खरेदी केली. निफ्टी आणि सेन्सेक्स सर्वकालीन उच्चांका समीप आल्याचे दिसत आहे.
बहुसंख्य फ्लेक्झीकॅप फंडांच्या गुंतवणुकीत 65 ते 70 टक्के लार्जकॅप कंपन्या आहेत. उर्वरित 30-35 टक्क्यांत मिडकॅप आणि स्मॉलकॅप्स आणि रोकड अंतर्भूत आहे. तेजीत नेहमीच मिडकॅप स्मॉलकॅप, तर अस्थिर बाजारपेठेत लार्जकॅप चांगली कामगिरी करतात. फ्लेक्झीकॅप फंड मॅनेजर्सना कोणत्याही मार्केट कॅप विशिष्ट बंधनांशिवाय विविध मार्केट कॅपमध्ये मालमत्ता विभाजित करण्याची मुभा असल्याने हे फंड सहज दीर्घकालीन अल्फा निर्माण करण्यासाठी आणि अल्पावधीत जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी ओळखले जातात. हा फंड ‘ग्रोथ अॅट रिझनेबल प्राईस’ या तत्त्वाचे अनुसरण करणारा फंड आहे. फंड सुद़ृढ ताळेबंद असणार्या आणि परिचलनातून रोख रक्कम निर्मिती करणारा फंड आहे. गेल्या 33 वर्षांत फंड अनेक बाजार आवर्तनातून गेला आहे.
फंडाचे 1 नोव्हेंबर 2005 ते 31 ऑक्टोबर 2025 दरम्यानचे 5 वर्षांचे रोलिंग रिटर्न तपासले असता, बहुतेक वेळा वेगवेगळ्या बाजार आवर्तनात दीर्घ गुंतवणूक कालावधीत फंडाने मानदंड सापेक्ष चांगली कामगिरी केली आहे. बाजारात 5 वर्षे पूर्ण केलेले 24 फ्लेक्झीकॅप इक्विटी फंड आहेत. सर्व फंड गटात हा फंड गट दुसर्या क्रमांकावर आहे. बहुसंख्य फंड घराण्यांचे सर्वाधिक मालमत्ता असणारे फंड फ्लेक्झीकॅप आहेत. गुंतवणूकदारांच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओत, फ्लेक्झीकॅप फंडांना मोठे स्थान द्यायला हवे. या फंड गटात एचडीएफसी फ्लेक्झीकॅप, पराग पारिख फ्लेक्झीकॅप, यूटीआय फ्लेक्झीकॅप आणि एसबीआय फ्लेक्झीकॅपसारखे काही सर्वात जुने आणि सर्वात मोठे फंड आहेत. जोखीम-परतावा गुणोत्तर परताव्याच्या बाजूला झुकलेले असल्याने नवीन गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीला सुरुवात करताना फ्लेक्झीकॅप फंडापासून करावी हेच सांगणे आहे.