US Stock Market Crash: AIचा फुगा फुटला? अमेरिकेच्या शेअर बाजारात भूकंप; एका झटक्यात 560 लाख कोटींचं नुकसान

US Stock Market Crash: अमेरिकेच्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून, एका आठवड्यात बाजाराचे जवळपास 6 ट्रिलियन डॉलर म्हणजेच 560 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
US Stock Market Crash
US Stock Market CrashPudhari
Published on: 
Updated on: 

US Stock Market Crash: अमेरिकेच्या शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून मोठी घसरण सुरू आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रातील कंपन्यांच्या भविष्यातील कमाईबाबत गुंतवणूकदारांच्या मनात शंका निर्माण झाल्याने बाजारात मोठी विक्री सुरू झाली आहे. गेल्या एका आठवड्यात अमेरिकी शेअर बाजाराचे तब्बल 6 ट्रिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 560 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, फक्त शुक्रवारी एका दिवसात सुमारे 1 ट्रिलियन डॉलरचे नुकसान झाले.

S&P 500 निर्देशांक सलग सातव्या दिवशी घसरला. 2020 नंतरची ही या निर्देशांकाची सर्वात मोठी घसरण आहे. AI कंपन्यांच्या वाढत्या खर्चाबाबत आणि भविष्यातील नफ्याबाबत चिंता वाढल्याने गुंतवणूकदारांनी टेक कंपन्यांच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री केली आहे.

अमेरिकी शेअर बाजार करेक्शनच्या टप्प्यात

शुक्रवारी अमेरिकी शेअर बाजारातील घसरण आणखी वाढली. AI क्षेत्रातील कंपन्यांच्या भवितव्याबाबत गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढल्याने टेक शेअर्सवर मोठा दबाव निर्माण झाला. AI क्षेत्रातील कंपन्यांमधून गुंतवणूकदारांनी नफा काढून घेण्यास सुरुवात केली आहे.

याचा मोठा फटका Nasdaq Composite निर्देशांकाला बसला. 2026 मध्ये हा निर्देशांक तोट्यात गेला आहे. गेल्या सहा वर्षांतील हा त्याचा सर्वात खराब आठवडा ठरला. दुसरीकडे, S&P 500 आणि Dow Jones हे दोन्ही निर्देशांक त्यांच्या अलीकडील उच्चांकापासून जवळपास 10 टक्क्यांनी खाली आले आहेत. एखादा शेअर बाजार किंवा निर्देशांक आपल्या अलीकडील उच्चांकापासून 10 टक्क्यांनी घसरला, तर त्याला बाजारातील 'करेक्शन' असे म्हटले जाते.

शुक्रवारी अमेरिकी बाजारात किती घसरण झाली?

शुक्रवारी अमेरिकी शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक मोठ्या घसरणीसह बंद झाले. Nasdaq Composite मध्ये 5.28 टक्क्यांची घसरण झाली. हा निर्देशांक 22,617.73 अंकांवर बंद झाला.

S&P 500 निर्देशांक 3.7 टक्क्यांनी घसरून 6,910.39 अंकांवर बंद झाला. तर Dow Jones Industrial Average मध्ये 949.73 अंकांची म्हणजेच 1.93 टक्क्यांची घसरण झाली. हा निर्देशांक 48,147.33 अंकांवर स्थिरावला.

Nasdaq 100 निर्देशांकातही 5.6 टक्क्यांची मोठी घसरण झाली. व्यवहारादरम्यान हा निर्देशांक त्याच्या अलीकडील उच्चांकापासून जवळपास 20 टक्क्यांनी खाली आला.

अमेरिकी शेअर बाजारात एवढी मोठी घसरण का झाली?

अमेरिकी बाजारातील या घसरणीमागे AI क्षेत्राबाबत निर्माण झालेली चिंता हे प्रमुख कारण मानले जात आहे. गेल्या काही वर्षांत AI कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे. या कंपन्यांच्या भविष्यातील वाढीबाबत गुंतवणूकदारांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, आता या अपेक्षा पूर्ण होतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

US Stock Market Crash
Yash Patil AI Startup: वय फक्त 23 वर्षे! AI कंपनी विकून कमावले 40 हजार कोटी; यश पाटीलची जगभर चर्चा

AI तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी कंपन्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करत आहेत. डेटा सेंटर उभारणीसाठीही प्रचंड गुंतवणूक केली जात आहे. मात्र, या गुंतवणुकीच्या तुलनेत कंपन्यांना किती नफा मिळेल, याबाबत अनिश्चितता वाढली आहे. डेटा सेंटर उभारणीचा वेग अपेक्षेपेक्षा कमी राहणे आणि AI क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी निधी मिळवताना येणाऱ्या अडचणी यांचाही परिणाम बाजारावर होत आहे.

याशिवाय, AI कंपन्यांच्या शेअर्सचे मूल्य आधीच मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे आता गुंतवणूकदार सावध झाले आहेत. अनेक गुंतवणूकदारांनी या कंपन्यांमधील आपली गुंतवणूक कमी करून नफा पदरात पाडून घेण्यास सुरुवात केली आहे.

US Stock Market Crash
Gold Adulteration Alert: सोनं खरेदी करताय? सावधान! दागिन्यांचं वजन वाढवण्यासाठी केली जातेय भेसळ; ग्राहकांना मोठा इशारा

गुंतवणूकदारांचा सुरक्षित गुंतवणुकीकडे कल

शेअर बाजारातील अनिश्चितता वाढल्याने गुंतवणूकदार आता तुलनेने सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांकडे वळत आहेत. त्यामुळे अमेरिकी टेक कंपन्यांच्या शेअर्सवर विक्रीचा दबाव वाढला आहे. दुसरीकडे, बाँडसारख्या पर्यायांकडे गुंतवणूकदारांचा कल वाढत असल्याचे चित्र आहे.

अमेरिकी बाजारातील घसरणीचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवरही होऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात AI कंपन्यांचे आर्थिक निकाल, त्यांचा खर्च आणि भविष्यातील कमाई याकडे गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष असणार आहे. AI क्षेत्रातील सध्याची घसरण ही केवळ तात्पुरती बाजारातील सुधारणा आहे की AI क्षेत्रातील गुंतवणुकीबाबतचा फुगा फुटण्याची सुरुवात आहे, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

(टीप : शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.