US Iran War Cost: दररोज 94,47,55,00,000 रुपये पाण्यात; 108 दिवस सुरु असलेल्या इराण युद्धात अमेरिकेचं किती नुकसान झालं?

US Iran War Cost: अमेरिका-इराण संघर्ष 108 दिवसांनंतर संपला असला तरी या युद्धाची मोठी आर्थिक किंमत अमेरिकेला मोजावी लागली आहे.
US Iran War Cost
US Iran War CostPudhari
Published on
Updated on

US Iran War Cost: अमेरिका आणि इराण यांच्यात अखेर शांतता करार झाल्यानंतर 100 हून अधिक दिवस चाललेला संघर्ष थांबला आहे. मात्र या युद्धाची मोठी किंमत अमेरिकेला मोजावी लागल्याचे समोर आले आहे. केवळ लष्करी कारवाईसाठीच अमेरिकेने तब्बल 113 अब्ज डॉलर खर्च केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. भारतीय चलनात ही रक्कम सुमारे 1.06 लाख कोटी रुपयांहून अधिक आहे.

28 फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या संघर्षात अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध संयुक्त कारवाई केली होती. जवळपास 108 दिवस चाललेल्या या युद्धादरम्यान अमेरिकेचा दररोजचा खर्च अब्जावधी डॉलरमध्ये पोहोचला.

सुरुवातीच्या सहा दिवसांतच 11 अब्ज डॉलर खर्च

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, युद्धाच्या पहिल्या सहा दिवसांतच 11.3 अब्ज डॉलर खर्च झाले होते. म्हणजेच दररोज जवळपास 1.88 अब्ज डॉलर खर्च होत होते. त्यानंतरही रोज सरासरी 1 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 94 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च सुरूच राहिला.

तज्ज्ञांच्या मते, जाहीर करण्यात आलेली आकडेवारी ही केवळ थेट लष्करी खर्चाची आहे. प्रत्यक्षात आर्थिक परिणाम, तेलाच्या किमतीतील वाढ, पुरवठा साखळीवरील परिणाम आणि इतर अप्रत्यक्ष नुकसान धरल्यास हा खर्च 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत जाऊ शकतो.

क्षेपणास्त्रे आणि सैन्य तैनातीवर कोट्यवधी डॉलर

पेंटागॉनच्या माहितीनुसार, युद्धाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच क्षेपणास्त्रे, दारुगोळा आणि संरक्षण यंत्रणांवर 25 अब्ज डॉलर खर्च झाले. इराणच्या शाहेद ड्रोनना रोखण्यासाठी अमेरिकेने वापरलेल्या पॅट्रियट क्षेपणास्त्राची किंमत प्रत्येकी 40 लाख डॉलर इतकी असल्याचे सांगितले जाते. याशिवाय आखाती प्रदेशात मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करण्यात आले होते. त्यासाठीचा खर्चही प्रचंड होता.

इराणच्या पुनर्बांधणीसाठी 300 अब्ज डॉलर?

युद्धामुळे इराणमधील पायाभूत सुविधा, तेलशुद्धीकरण प्रकल्प आणि वीज व्यवस्था मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. या नुकसानीची भरपाई आणि पुनर्बांधणीसाठी सुमारे 300 अब्ज डॉलर खर्च येण्याचा अंदाज आहे.

करारानुसार ही रक्कम देण्याबाबत अमेरिकेने तत्त्वतः सहमती दर्शवल्याचे वृत्त आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निधी आखाती देशांच्या मदतीतून उपलब्ध होईल, असे संकेत दिले आहेत. तसेच इराणची गोठवलेली मालमत्ताही मुक्त करण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे.

US Iran War Cost
Donald Trump : भारतावर हल्ला केल्यास आम्ही संरक्षण करू : डोनाल्ड ट्रम्प

सामान्य नागरिकांनाही बसला फटका

युद्धाचा परिणाम केवळ रणांगणापुरता मर्यादित राहिला नाही. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने अमेरिकन नागरिकांवरही आर्थिक भार पडला. अंदाजानुसार, इंधन आणि ऊर्जा खर्च वाढल्यामुळे अमेरिकन जनतेला 40 अब्ज डॉलरपेक्षा अधिक नुकसान सहन करावे लागले.

मात्र अनेक अर्थतज्ज्ञ आणि विरोधी पक्षातील नेत्यांचे मत वेगळे आहे. त्यांच्या मते, युद्धामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेवर झालेला एकूण परिणाम 630 अब्ज डॉलर ते 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत असू शकतो.

US Iran War Cost
Trump Praises PM Modi : "शांत आणि जबरदस्त, मी त्यांच्यासारखा नाही"; ट्रम्प यांनी केले PM मोदींचे भरभरून कौतुक

शांतता करारानंतर दिलासा

अमेरिका-इराण करारामुळे मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा सकारात्मक परिणाम जागतिक तेलबाजार आणि अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. मात्र या युद्धाने आधुनिक संघर्षांची आर्थिक किंमत किती मोठी असू शकते, याची पुन्हा एकदा जाणीव करून दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news