

Stock Market Updates Sensex Today
अमेरिकेतील किरकोळ महागाईत घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबरमध्ये फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची शक्यता वाढली आहे. यामुळे आशियाई बाजारात वाढ दिसून आली. याचा मागोवा घेत भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक यांनी बुधवारी (दि.१३) तेजीत व्यवहार केला. देशांतर्गत महागाई कमी झाल्यामुळेही गुंतवणूकदारांच्या भावना आणखी उंचावल्या. सेन्सेक्स ३०४ अंकांनी वाढून ८०,५३९ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक १३१ अंकांनी वाढून २४,६१९ वर स्थिरावला. मुखतः आज मेटल आणि फार्मा शेअर्समध्ये जोरदार तेजी राहिला.
सेन्सेक्सवर भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि इटरनल हे शेअर्स प्रत्येकी २ टक्के वाढले. एम अँड एम, कोटक बँक, पॉवर ग्रिड, टाटा मोटर्स, सन फार्मा, बजाज फायनान्स हे शेअर्स १ ते १.७ टक्क्यांपर्यंत वाढले. तर दुसरीकडे अदानी पोर्ट्स, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा, टायटन, ॲक्सिस बँक हे शेअर्स घसरले.
आज सर्व सेक्टरलमधील ऑटो, मेटल, फार्मा निर्देशांक प्रत्येकी १ टक्के वाढले. पीएसयू बँक, एफएमसीजी, ऑईल अँड गॅस निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाला. तर बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये प्रत्येकी ०.५ टक्के वाढ दिसून आली.
देशातील किरकोळ महागाई दर जुलैमध्ये आठ वर्षांच्या निचांकी १.५५ टक्क्यांपर्यंत खाली आला. अन्नधान्याच्या किमतीत घट झाल्यामुळे महागाई दर खाली येण्यास मदत झाली आहे. यामुळे देशांतर्गत शेअर बाजारात सकारात्मक ट्रेंड दिसून आला.