

Stock Market Updates
अमेरिकेने काही देशांवर लागू केलेले टॅरिफ, कच्च्या तेलाच्या दरातील वाढ आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्समधील घसरणीने शुक्रवारी (दि.११ जुलै) भारतीय शेअर बाजाराला खाली ओढले. ३० शेअर्स असलेला बीएसई सेन्सेक्स (Sensex) ६८९ अंकांनी घसरून ८२,५०० वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक (Nifty 50) २०५ अंकांनी घसरून २५,१४९ वर स्थिरावला.
बाजारातील आजच्या घसरणीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३.७ लाख कोटींनी कमी होऊन ४५६.४८ लाख कोटींपर्यंत खाली आले.
निफ्टी आयटी जवळपास १.८ टक्के घसरला. जून तिमाहीतील उत्पन्नाचे आकडे गुंतवणूकदारांना उत्साहित करण्यात अपयशी ठरल्यानंतर टीसीएसचा शेअर्स ३.४ टक्के घसरून टॉप लूजर ठरला. त्याचसोबत LTIMindtree, विप्रो, Persistent, एचसीएल टेक हे शेअर्स १.८ ते ३ टक्क्यांपर्यंत घसरले.
निफ्टी ऑटो १.७ टक्के घसरून बंद झाला. ऑटोमध्ये एम अँड एमचा शेअर्स सर्वाधिक २.९ टक्के घसरला. टीव्हीएस मोटर्स, हिरो मोटर्स, बजाज ऑटो, टाटा मोटर्स हे शेअर्स प्रत्येकी २ टक्क्यांहून अधिक घसरले. मीडिया, कन्झ्यूमर ड्युराबेल आणि ऑईल अँड गॅस निर्देशांकही घसरणीसह बंद झाले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडामधून आयात वस्तूंवर ३५ टक्के टॅरिफ कर लागू करण्याची घोषणा केली. तसेच त्यांनी इतर प्रमुख व्यापारी भागीदारी देशांवर १५ ते २० टक्के दरम्यान टॅरिफ लागू करण्याचे संकेत दिले. ट्रम्प यांच्या या टॅरिफ घोषणांमुळे व्यापार युद्ध तीव्र होण्याची शक्यता आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या भावना कमकुवत झाल्या आहेत. परिणामी, बाजारात मोठी घसरण दिसून आली.
कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल ६९.०६ डॉलवर पोहोचला आहे. तेल पुरवठ्यात घट होण्याच्या शक्यतेने दर वाढले असल्याचे दिसून आले आहे.