

Stock Market Updates
भारतीय शेअर बाजारात मंगळवारी (दि. १७ जून) दबाव दिसून आला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २०० अंकांनी घसरून ८१,६०० च्या खाली आला. तर निफ्टी ५० निर्देशांक ६३ अंकांनी घसरून २४,८८० वर व्यवहार करत आहे.
इस्रायल आणि इराण यांच्यात तणाव वाढला आहे. दोन्ही देशांनी मंगळवारी सलग पाचव्या दिवशी एकमेकांवर हल्ले केले. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी नागरिकांना तेहरान सोडण्याचे आवाहन केले आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली. परिणामी, सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह खुले झाले.
सेक्टर्समधील निफ्टी आटो, एफएमसीजी, फार्मा, मेटल, ऑईल अँड गॅस निर्देशांक हे ०.९ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. तर निफ्टी रियल्टी ०.६ टक्के वाढला आहे.
सेन्सेक्सवर सन फार्मा, टाटा मोटर्स, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, इर्टनल, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक हे शेअर्स घसरले आहेत. तर एशियन पेंट्स, अदानी पोर्ट्स, एसबीआय हे शेअर्स तेजीत आहेत.
विदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय बाजारात गेल्या चार दिवसांपासून विक्री सुरु आहे. त्यांनी १६ जून रोजी २,५३९ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. तर याच दिवशी देशांतर्गंत गुंतवणूकदारांनी ५,७८० कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.
इस्रायल आणि इराणमधील संघर्षामुळे मंगळवारी कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या. ब्रेंट क्रूड फ्यूचर्सचा दर ०.५ टक्के वाढून प्रति बॅरल ७३.५७ डॉलरवर पोहोचला आहे. या घटकांचा बाजारात दबाव दिसून येत आहे.