
RBI Repo Rate Cut Effect
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) त्यांच्या कर्जावरील व्याजदर ५० बेसिस पॉइंटने कमी केले आहेत. यामुळे या बँकेचे कर्ज घेतलेले विद्यमान कर्जदार आणि नवीन कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच यामुळे एसबीआयकडून कर्ज घेणे आता स्वस्त होईल.
या नवीन बदलामुळे एसबीआयचा रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) आता ७.७५ टक्के झाला आहे, तर त्याचा एक्स्टर्नल बेंचमार्क आधारित लेंडिंग रेट (EBLR) ८.६५ टक्क्यांवरून ८.१५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
'आरएलएलआर' हा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या रेपो दराशी निगडित एक्स्टर्नल बेंचमार्क आहे. आरबीआयने रेपो दरात बदल केल्यास या दरातही बदल केला जातो.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, हे दोन्ही बदल १५ जून २०२५ पासून लागू राहतील.
याशिवाय, एसबीआयने विविध मॅच्युरिटी कालावधीच्या ३ कोटी रुपयांपर्यंतच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात २५ बेसिस पॉइंटची कपात करण्यात आली आहे. हे सुधारित मुदत ठेवींचे दरदेखील १५ जूनपासून लागू होतील.
नवीन बदलांनुसार, १ ते २ वर्षांच्या टर्म डिपॉझिटवरील व्याजदर २५ बेसिस पॉइंट्सने कमी करून ६.५० टक्क्यांवर आणला आहे, तर २ ते ३ वर्षांच्या ठेवींवर आता ६.४५ टक्के व्याज मिळेल. ३ ते ५ वर्षांच्या एफडीवर ६.३० टक्के व्याजदर निश्चित केला आहे. तर ५ ते १० वर्षांच्या ठेवींवर ६.०५ टक्के व्याजदर मिळेल.
६ जून रोजी आरबीआयने जाहीर केलेल्या पतधोरणात बेंचमार्क रेपो दरात ५० बेसिस पॉइंट्सनी कपात केली होती. ही चार वर्षांतील सर्वात मोठी कपात आहे. यामुळे रेपो दर ५.५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.