पुढारी ऑनलाईन डेस्क
नवा दिवस, नवा उच्चांक असा तेजीचा माहौल भारतीय शेअर बाजारात (Stock Market Updates) दिसून येत आहे. जागतिक बाजारातून संमिश्र संकेत आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून कायम राहिलेल्या खरेदीदरम्यान आज सोमवारी सेन्सेक्स ८२,७२५ च्या नव्या उच्चांकावर खुला झाला. त्यानंतर सकाळी साडेदहाच्या सुमारास २४० अंकांच्या वाढीसह ८२,६०० वर व्यवहार करत होता. तर निफ्टी ५० निर्देशांक (Nifty) आज सलग चौथ्या सत्रांत नव्या विक्रमी उच्चांकावर खुला झाला. सकाळच्या व्यवहारात निफ्टीने २५,३३३ चा नवा उच्चांक नोंदवला. आयटी आणि फायनान्सियल शेअर्समधील तेजीमुळे बाजाराच्या विक्रमी वाढीसाठी मदत झाली आहे.
सेन्सेक्सवर (Sensex) बजाज फिनसर्व्हचा शेअर्स ३ टक्क्यांनी वाढून टॉप गेनर आहे. त्याचबरोबर एचसीएल टेक, बजाज फायनान्स, आयटीसी, टेक महिंद्रा, हिंदुस्तान युनिलिव्हर, रिलायन्स हे शेअर्सही तेजीत आहेत. तर टाटा मोटर्स, भारती एअरटेल, एम अँड एम, एनटीपीसी हे शेअर्स घसरले आहेत.
निफ्टीवर बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, एचसीएल टेक, हिरो मोटोकॉर्प, आयटीसी हे शेअर्स १ ते ३.५ टक्क्यांनी वाढून टॉप गेनर्स आहेत. तर टाटा मोटर्स, डॉ. रेड्डीज, एम अँड एम, हिंदाल्को, भारती एअरटेल हे शेअर्स प्रत्येकी १ टक्क्याने घसरले आहेत.
भारताची जीडीपी वाढ एप्रिल ते जून तिमाहीत ६.७ टक्के एवढी होती. मागील तिमाहीतील ७.८ टक्क्यांच्या तुलनेत ही वाढ कमी आहे. पण तरीही भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून (FII) भारतीय बाजारात खरेदीचा ओघ कायम आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी ३० ऑगस्ट रोजी ५,३१६ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. तर याच दिवशी देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी ३,१९८ कोटी रुपयांच्या शेअसर्च विक्री केली.