

Stock Market updates
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यातील शिखर बैठकीनंतर रशियाच्या तेल पुरवठ्याबाबत कमी झालेली चिंता आणि प्रस्तावित जीएसटी सुधारणांबद्दलच्या आशावादामुळे भारतीय शेअर बाजाराने सोमवारी (दि. १८ ऑगस्ट) मोठी उसळी घेतली. सकाळच्या सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने १,१०० अंकांनी वाढून ८१,७०० पार झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ३५० अंकांच्या वाढीसह २४,९८० वर व्यवहार करत आहे.
बाजारातील या बंपर तेजीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ५.९ लाख कोटींनी वाढून ४५१ लाख कोटींवर पोहोचले.
सेक्टरलमध्ये ऑटो आणि कन्झ्यूमर शेअर्स आघाडीवर राहिले. निफ्टी ऑटो ४.४ टक्के वाढला. तर Nifty Consumer Durables निर्देशाकं ३ टक्के वाढला. फायनान्सियल शेअर्समध्येही खरेदी दिसून आली आहे. यामुळे निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस १.७ टक्के वाढून व्यवहार करत आहे. आयटी आणि रियल्टी शेअर्समध्येही तेजी आहे.
सेन्सेक्सवर मारुतीचा शेअर्स ७.५ टक्के वाढून टॉप गेनर ठरला आहे. त्याचबरोबर बजाज फायनान्स ६ टक्के, एम अँड एम ५ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट ४.५ टक्के, बजाज फिनसर्व्ह ४.२ टक्के, ट्रेंट ४ टक्के, हिंदुस्तान युनिलिव्हर ३.२ टक्के, टाटा मोटर्सचा २ टक्के वाढला आहे. दुसरीकडे एलटी, इटरनल, एचसीएल टेक, सन फार्मा, इन्फोसिस हे शेअर्स घसरले आहेत.
जीएसटी प्रणालीत सुधारणा केली जाणार असल्याची घोषणा पीएम मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन केली. सध्याच्या जीएसटी प्रणाली ऐवजी केंद्र सरकारने केवळ ५ टक्के आणि १८ टक्के असे केवळ दोन स्लॅब प्रस्तावित केले आहेत. या वर्षी दिवाळीपर्यंत सध्याच्या कर प्रणालीत सुधारणा होणार आहे. यामुळे बाजारात तेजीचा माहौल पसरला आहे.
आशियाई बाजारांमध्येही तेजी दिसून आली आहे. जपानचा निक्केई, शांघाय कंपोझिट आणि हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक वधारले आहेत. अमेरिकेतील बाजारातही मजबूत वाढ दिसून आली आहे.
कच्च्या तेलाच्या दरात किरकोळ घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे भारताचा तेल आयातीचा खर्च कमी होणार असून आणि महागाईची चिंता कमी झाली आहे. यामुळे बाजारातील भावना उंचावल्या असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अमेरिका अतिरिक्त टॅरिफ लादणार नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी संकेत दिले आहेत. यामुळे भारताचे संभाव्य नुकसान टळणार आहे.