

मारुती वि. पाटील
आजच्या धावपळीच्या जीवनात आजारांना बळी पडण्याचा धोका अधिक आहे. अशा परिस्थितीत हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेणे आवश्यक आहे. यामुळे आर्थिक विवंचना कमी होण्याबरोबरच आजारांवरील उपचारांचा भारही कमी होतो.
आजच्या जीवनशैलीत आजार आणि शरीर यांचे अतूट नाते बनले आहे. अशा परिस्थितीत हेल्थ इन्शुरन्स घेणे खूप महत्त्वाचे ठरते. यामुळे तुमच्यासाठी उत्तम उपचारांचे मार्ग उघडतात आणि यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर कोणताही भार पड त नाही. मुळात हेल्थ इन्शुरन्समध्ये वय हा एक महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स कोणत्या वयात घ्यावा आणि तो घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, असा प्रश्न निर्माण होतो.
तुम्ही हेल्थ इन्शुरन्स जितका लवकर घ्याल तितके तुमच्यासाठी चांगले आहे. कारण ते तुमच्यासाठी त्वरित आर्थिक संरक्षणाचे कवच बनते. सध्या जर तुमच्याकडे पालकांच्या विम्याचे संरक्षण नसेल, तर तुम्ही त्वरित हेल्थ इन्शुरन्स घ्यावा. वयाच्या 25 वर्षांनंतर तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स असणे आवश्यक आहे. कारण या टप्प्यानंतर आजारांचा धोका वाढू लागतो.
जर तुम्ही कमी वयात हेल्थ इन्शुरन्स खरेदी केला तर तुम्हाला कमी प्रीमियम भरावा लागेल. विमा कंपन्या वय आणि वैद्यकीय स्थिती पाहून प्रीमियम ठरवतात. कमी वयात वैद्यकीय इतिहास स्वच्छ असल्यास विम्याचा प्रीमियम खूपच कमी होतो. त्याच वेळी, वय वाढल्यानंतर आरोग्याच्या समस्या उद्भवू लागतात, ज्यामुळे प्रीमियम वाढतो. कमी वयात पॉलिसी खरेदी केल्यास चांगले कव्हरेज मिळण्याची शक्यता असते. कंपन्यांना कमी वयाच्या ग्राहकांसाठी क्लेमची फारशी चिंता नसते. त्यामुळे ते अनेकदा तरुण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उत्तम कव्हरेज देतात.
* हेल्थ इन्शुरन्सच्या कव्हरची रक्कम तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार निवडा.
* विमा प्रीमियम दरांची तुलना करा आणि आपल्या बजेटनुसार निवडा.
* क्लेम सेटलमेंट रेशो तपासा, जो कंपनीच्या क्लेम सेटलमेंटबद्दल माहिती देतो.
* कॅशलेस विमा सुविधा, रोगांवरील उपचार तसेच तुमच्या क्षेत्रातील नेटवर्क हॉस्पिटलची यादी तपासा.
* जर तुम्हाला आधीपासूनच कोणताही आजार असेल, तर प्री-एक्झिस्टिंग डिसीज कव्हरेजची सोय तपासा.