वित्तीय शिस्तीला सलाम!

भारतीय बाजाराला जोरदार तेजीची चाहूल
Indian market is in need of a strong boom
बाजाराने सावध भूमिका घेण्यास सुरुवात.Pudhari File Photo
Published on
Updated on
भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि.

मंगळवार, दिनांक 23 जुलै 2024 अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषण सुरू होते. सकाळच्या सत्रात निफ्टीने 24582, तर सेन्सेक्सने 80766 हा दिवसभरातील उच्चांक नोंदवला होता. परंतु जसजसे भाषण पुढे जाऊ लागले, तसतशी बाजाराने सावध भूमिका घेण्यास सुरुवात केली.

अर्थमंत्र्यांनी शेअर बाजाराशी निगडित खालील घोषणा केल्या. शेअर्स आणि म्युच्युअल फंड युनिटस्वरील शॉर्ट टर्म कॅपिटल गेन (1 वर्षाच्या आतील) टॅक्स 15 टक्क्यांवरून 20 टक्के केला. लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स (1 वर्षाच्या पुढील) 10 टक्क्यांवरून 12.5 टक्के केला. मात्र कॅपिटल गेन टॅक्स सवलतीची पूर्वीची 1 लाखापर्यंतची मर्यादा वाढवून 125000 केली. फ्यूचर्समधील डेरीव्हेटिव्ह ट्रेडिंगवर पूर्वीचा 0.0125 हा Security Transaction Tax वाढवून 0.02 टक्के केला. तसेच ऑप्शन्समधील डेरीव्हेटिव्ह ट्रेडिंगवर पूर्वीचा 0.0625 टक्के STT वाढवून 0.1 टक्के केला.

अर्थमंत्री या घोषणा करत असतानाच बाजार कोसळला. 24582 च्या दिवसभरच्या उच्चांकावरून निफ्टीने 24074 चा तळ गाठला. तर सेन्सेक्सने 80766 वरून 79224 पर्यंत उडी मारली. तेव्हा सर्व बिझनेस चॅनेल्सवरून बाजारतज्ज्ञ आतापर्यंतचा सर्वात खराब अर्थसंकल्प, अशी संभावना करत निफ्टी 20000 पर्यंत खाली जाण्याची भाषा करत होते; परंतु त्यांचे शब्द हवेत विरून जाण्याअधीच बाजारात जोरदार रिकव्हरी येऊन दिवसअखेरीस निफ्टी 24479, तर सेन्सेक्स 80429 वर बंद झाला. पुढील दोन दिवस बाजार पूर्णपणे Flat होता. अर्थसंकल्पावर बाजाराने शुक्रवारी आपली प्रतिक्रीया नोंदवली. 428 पॉईंटस्नी निफ्टी, 1293 पॉईंटस्नी सेन्सेक्स, तर 407 पॉईंटस्नी निफ्टी वाढला. ऑगस्ट सिरीजच्या पहिल्याच दिवशी ही जोरदार तेजी आली, हे विशेष. त्यातही शुक्रवारी ही तेजी आली, हा आणखी एक विशेष. कारण शक्यतो शॉर्ट टर्म ट्रेडर्स सुटीच्या दिवशी आपल्या Positions हलक्या करणे पसंत करतात.

शुक्रवारची ही तेजी इतकी तुफानी होती की लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप अशा सर्व शेअर्सना तिने आपल्या कवेत घेतले. एकाच दिवसात बाजारातील कंपन्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन 7,16,000 कोटींनी वाढले. निफ्टी फार्मा इंडेक्सने 6.14 टक्क्यांनी वाढून या तेजीचे नेतृत्व केले. सन फार्मा, नॅटको फार्मा, गॅ्रन्यूल्स, बायोकॉन हे शेअर्स 7 टक्क्यांहून अधिक वाढले. फार्मा इंडेक्स तर गेले कित्येक दिवस तेजीतच आहे. त्यात आणखी आयटी इंडेक्सनेही 6 टक्के वाढून तेजीला बळकट केले. एम्फॅसिस विप्रो, एचसीएल टेक, टीसीएस, इन्फोसिस हे सर्व शेअर्स उंचीवर ट्रेड करत होते. खूप दिवस मंदीत असणारा मेटल इंडेक्स शुक्रवारी वाढल्याचे दिसून आले. वेदांता, जिंदाल स्टील अ‍ॅण्ड पॉवर, एनएमडीसी या शेअर्सनी तेजीत भर घातली. या चौफेर तेजीमध्ये इन्फोसिस, भारती एअरटेल, आयटीसी, रिलायन्स, आयसीआयसीआयू बँक, टीसीएस, एल अ‍ॅण्ड टी, एसबीआय, कोटक महिंद्रा बँक हे सर्व शेअर्स उजळून निघाले. एनटीपीसी, डीव्हीज लॅब्ज, ग्रासीम, टाटा मोटर्स, एसबीआय लाईफ, आयशर मोटर्स, ओएनजीसी या शेअर्सनी गुंतवणूकदारांना चांगलेच सुखावले.

शेअर्स बाजारातील मिळकतीवर आणि फ्यूचर्स ऑप्शन्समधील ट्रेडिंगवर इतका कर वाढवूनही ही धुवाधार तेजी येण्यामागचे कारण काय? तर सरकारने वित्तीय शिस्त राखण्याचा केलेला निर्धार. पूर्वीची 2024-25 साली 5.1 टक्के वित्तीय तूट कमी करण्याचे ध्येय वाढवून 4.9 टक्के करण्याचे धोरण बाजारालाा भावले. शिवाय सवंग, लोकप्रिय, अर्थव्यवस्थेला घातक घोषणांचा आभाव हेही एक कारण होते. बाजार वाढतो तो दोन गोष्टींमुळे! कंपन्यांची आर्थिक कामगिरी आणि बाजारातील रोकड सुलभता(Liquidity) बर्‍याच कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे समाधानकारक निकाल तेजीला बळकट करणारे आहेत. परदेशी वित्त संस्थांचा (FII) भारतीय बाजारातील पुन:प्रवेश बाजाराचा गुलाबी रंग अधिक गडद करत आहे. अमेरिकेत मंदी हटण्याच्या मार्गावर आहे. तेथील GDP मध्ये वाढ दिसून येत आहे. पर्सनल कंझम्पशनचा आकडा वाढला, तर फेडचे व्याजदर कमी करण्याचा निर्णय लवकर होईल. सोन्यावरील कमी केलेल्या आयात शुल्काने सोन्याचा दर एका दिवसात 5000 रुपयांनी खाली आले. शेअर बाजारातील गुंतवणुकीला पर्याय असणारा हा मार्ग कमी आकर्षक झाला तर बाजारातील गुंतवणूक वाढेल. एकूण काय, तर एक भरभक्कम तेजी सोनपावलांनी भारतीय बाजारात येत आहे. तिचे सहर्ष स्वागत!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news