Stock Market Today: शेअर बाजारात तेजी! निफ्टी 22,300 च्या पार, गुंतवणूकदारांना 1 लाख कोटींचा फायदा

Stock Market Today: शुक्रवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. निफ्टी 22,300 च्या पार गेला, तर सेन्सेक्स 183 अंकांनी वधारला.
Stock Market Today
Stock Market TodayPudhari
Published on: 
Updated on: 

Stock Market Today: आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात तेजीने झाली. शुक्रवारी (9 ऑक्टोबर) बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी हिरव्या रंगात व्यवहार करताना दिसले. निफ्टी 84 अंकांच्या वाढीसह 22,315 वर, तर सेन्सेक्स 183 अंकांच्या वाढीसह 71,776 वर उघडला. सुरुवातीच्या व्यवहारातही बाजारातील तेजी कायम राहिली. निफ्टीने 22,300 चा टप्पा ओलांडल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला.

या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. बीएसईमध्ये नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य पुन्हा 462 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले.

मात्र, बाजारासमोरील आव्हाने अजूनही कायम आहेत. गुरुवारी निफ्टी 22,231 वर बंद झाला होता. हा गेल्या 18 महिन्यांतील नीचांकी बंद स्तर होता. त्यामुळे शुक्रवारी बाजाराची घसरण थांबते का, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

जागतिक बाजारातून संमिश्र संकेत

जागतिक बाजारांमधून भारतीय शेअर बाजाराला संमिश्र संकेत मिळत आहेत. अमेरिकेतील डाऊ जोन्स निर्देशांक 52 अंकांनी वधारला. मात्र, नॅस्डॅक निर्देशांकात 345 अंकांची घसरण झाली.

आशियाई बाजारांमध्येही घसरण दिसून आली. जपानचा निक्केई निर्देशांक 0.8 टक्क्यांनी घसरला, तर दक्षिण कोरियाचा कोस्पी बाजार शुक्रवारी बंद होता.

जागतिक बाजारांतील ही अनिश्चितता आणि अमेरिका-इराण यांच्यातील वाढता तणाव यांचा परिणाम भारतीय बाजारावर होण्याची शक्यता आहे.

कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा तेजी दिसत आहे. कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 104 डॉलरवर पोहोचला आहे. तेलाच्या किमती वाढल्यास भारताच्या आयात खर्चावर परिणाम होऊ शकतो. त्याचा दबाव महागाई आणि शेअर बाजारावरही पडू शकतो.

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत काही महत्त्वाची विधाने केली आहेत. अमेरिकेतील 3 नोव्हेंबरच्या मध्यावधी निवडणुकांपर्यंत इराणवर हल्ला करणार नसल्याचे त्यांनी म्हटल्याचे वृत्त आहे. इराणसोबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

मात्र, इराणवरील नाकेबंदी कायम राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलाची वाहतूक सुरू असल्याबाबतही त्यांनी विधान केले. या घडामोडींमुळे कच्च्या तेलाच्या दरातील चढ-उतारांकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.

परदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात विक्री

शेअर बाजारातील घसरणीमागे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची विक्री हा महत्त्वाचा घटक आहे. गुरुवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) रोख बाजारात 12,943 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.

मात्र, या आकड्यात आयटीसीशी संबंधित 9,437 कोटी रुपयांची ब्लॉक डीलही समाविष्ट आहे. त्यामुळे या विक्रीच्या आकड्याचा अर्थ लावताना ब्लॉक डीलचा विचार करणे आवश्यक आहे.

दुसरीकडे, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) 10,703 कोटी रुपयांची खरेदी केली. या आकड्यातही ब्लॉक डीलचा समावेश आहे. देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून खरेदी होत असली, तरी परदेशी गुंतवणूकदारांच्या हालचालींवर बाजाराची दिशा काही प्रमाणात अवलंबून राहू शकते.

दरम्यान, टीसीएसने सप्टेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचे निकाल समाधानकारक असल्याचे वृत्त आहे.

Stock Market Today
Gold Prices Today: सणासुदीपूर्वी सोन्याच्या दरात घसरण; चांदीच्या किमतीतही मोठा बदल, 24 कॅरेट सोनं किती रुपयांनी झालं स्वस्त?

निफ्टीसाठी कोणते स्तर महत्त्वाचे?

SAMCO Securities चे तांत्रिक संशोधन विश्लेषक ओम मेहरा यांच्या मते, गुरुवारी निफ्टीने 22,180 हा गेल्या 52 आठवड्यांतील नीचांकी स्तर गाठला. बाजारात विक्रीचा दबाव कायम असल्याचे तांत्रिक संकेत मिळत आहेत.

आजच्या व्यवहारात निफ्टीसाठी काही महत्त्वाचे स्तर पुढीलप्रमाणे आहेत.

  • पहिला आधार: 22,100

  • दुसरा आधार: 22,000

  • महत्त्वाचा अडथळा: 22,400

  • साप्ताहिक बंदसाठी महत्त्वाची पातळी: 22,422

निफ्टी 22,100 च्या खाली घसरल्यास 22,000 च्या स्तरावर आधार मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दुसरीकडे, बाजारात तेजी कायम राहिल्यास 22,400 च्या आसपास निफ्टीला अडथळा येऊ शकतो.

सध्या बाजारातील खरेदीचा जोर कमकुवत असल्याने तेजीच्या वेळीही शेअर्सची विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी बाजारातील हालचाली आणि महत्त्वाच्या स्तरांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

Stock Market Today
Starlink India: स्टारलिंकला भारतात परवानगी का नाही? मस्क यांनी थेट अंबानींच नाव घेत विचारला प्रश्न; वादात राहुल गांधींची एन्ट्री

सलग आठ आठवड्यांची घसरण थांबणार?

निफ्टीच्या साप्ताहिक कामगिरीकडे पाहता, बाजारासमोर आणखी एक महत्त्वाचे आव्हान आहे. निफ्टी 22,422 च्या वर बंद झाला नाही, तर सलग नवव्या आठवड्यात साप्ताहिक घसरण नोंदवली जाण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी बाजारात दिसणारी तेजी कायम राहते का आणि निफ्टी महत्त्वाच्या स्तरांच्या वर बंद होतो का, यावर बाजाराच्या पुढील दिशेबाबत काही संकेत मिळू शकतात. मात्र, अमेरिका-इराण तणाव, कच्च्या तेलाचे दर आणि परदेशी गुंतवणूकदारांची विक्री यामुळे बाजारात अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news