Stock Market Today | शेअर बाजारात पाचव्या दिवशी तेजी कायम
Stock Market Today
शेअर बाजारात बुधवारी (दि. २० ऑगस्ट) सलग पाचव्या दिवशी तेजी कायम राहिली. मुख्यतः आयटी आणि एफएमसीजी शेअर्समध्ये अधिक वाढ दिसून आली. यामुळे आज बाजार तीन आठवड्यातील उच्चांकावर बंद झाला. बीएसई सेन्सेक्स २१३ अंकांनी वाढून ८१,८५७ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ६९ अंकांच्या वाढीसह २५,०५० वर स्थिरावला. विशेष म्हणजे सुरुवातीच्या दबावानंतर शेअर बाजाराने जोरदार पुनरागमन केले.
शेअर बाजारात वाढ सुरुच असून गेल्या पाच सत्रांत सेन्सेक्स आणि निफ्टी प्रत्येकी २ टक्के वाढले आहेत. जीएसटी सुधारणांबद्दलच्या आशावादामुळे गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत. यामुळे शेअर बाजाराला उभारी मिळाली आहे. निफ्टी आयटी आज २.६ टक्के वाढला. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाने ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मच्या नियमनासाठी विधेयक मंजूर केल्यानंतर गेमिंग शेअर्सवर मोठा दबाव राहिला.
सेन्सेक्सवर इन्फोसिसचा शेअर्स ३.८ टक्के वाढून टॉप गेनर ठरला. त्याचबरोबर टीसीएस २.७ टक्के, हिंदुस्तान युनिलिव्हर २.४ टक्के, एनटीपीसी २.१ टक्के, टाटा स्टील १.८ टक्के, टेक महिंद्रा १.७ टक्के, इटरनल १.५ टक्के, एचसीएल टेक १.३ टक्के वाढून बंद झाला. तर दुसरीकडे भारत इलेक्ट्रॉनिक्सचा शेअर्स २.१ टक्के घसरला. बजाज फायनान्स, टाटा मोटर्स, ट्रेंट, आयटीसी बजाज फिनसर्व्ह हे शेअर्सही घसरले.
