

Stock Market Today: आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढती अस्थिरता, अमेरिका-इराण तणाव आणि कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली मोठी वाढ याचा फटका आज भारतीय शेअर बाजाराला बसताना दिसत आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 800 हून अधिक अंकांनी घसरला, तर निफ्टी 250 अंकांपेक्षा जास्त घसरून 23,400 च्या खाली गेला.
बँकिंग शेअर्समध्ये जोरदार विक्री झाल्याने बँक निफ्टीवरही मोठा दबाव दिसून आला. SBI आणि HDFC Bank सारख्या मोठ्या बँकिंग शेअर्समध्ये विक्रीचा जोर होता. याशिवाय बँकिंग, NBFC आणि मेटल क्षेत्रातील शेअर्सवरही दबाव दिसून आला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या उघड इशाऱ्यामुळे पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढला आहे. ट्रम्प यांनी इराणने तातडीने काही निर्णय घेतले नाहीत, तर गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं, असा इशारा दिला आहे.
दुसरीकडे, इराणने हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांसाठी नव्या ट्रॅफिक सिस्टिमची घोषणा केली आहे. इराणच्या सहकार्याशिवाय काही देशांच्या जहाजांना मार्ग बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे जागतिक व्यापार आणि तेल पुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे.
हॉर्मुझ सामुद्रधुनीतील तणावाचा सर्वात मोठा परिणाम कच्च्या तेलावर झाला आहे. ब्रेंट क्रूडच्या किंमतीत काही दिवसांत जवळपास 4 टक्क्यांची वाढ झाली असून ते 110 डॉलरच्या वर गेले आहे.
जर परिस्थिती आणखी बिघडली, तर तेल पुरवठा साखळीवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांसाठी हे चिंतेचं कारण मानलं जात आहे.
या तणावाचा परिणाम आशियाई आणि अमेरिकन बाजारांवरही दिसून आला. जपान आणि दक्षिण कोरियाचे बाजार जवळपास 2 टक्क्यांनी घसरले. अमेरिकन बाजारातही मोठी पडझड झाली. डाओ जोन्स निर्देशांक 550 अंकांनी घसरला, तर नॅस्डॅक 400 अंकांनी खाली आला.
GIFT Nifty देखील सुमारे 100 अंकांनी घसरून 23,540 च्या आसपास व्यवहार करत होता. त्यामुळे भारतीय बाजाराला घसरणीचे संकेत आधीच मिळाले होते.
अमेरिकेतील 10 वर्षांच्या बॉन्ड यिल्डमध्ये सातत्याने वाढ होत असून ते 4.6 टक्क्यांच्या वर गेले आहेत, ही जवळपास वर्षभरातील उच्चांकी पातळी मानली जात आहे.
तसंच डॉलर इंडेक्सही सलग पाचव्या दिवशी मजबूत झाला असून तो सहा आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. मजबूत डॉलर आणि वाढत्या बॉन्ड यिल्डमुळे जोखमीच्या गुंतवणुकीवर दबाव वाढला आहे.
कमोडिटी बाजारातही मोठी अस्थिरता पाहायला मिळाली. चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली, तर सोन्याचे दरही खाली आले. कॉपर, अॅल्युमिनियम आणि झिंकसारख्या बेस मेटल्समध्येही विक्रीचा दबाव दिसून आला.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी म्हणजेच FII यांनी सलग दुसऱ्या दिवशी खरेदी केली. त्यांनी रोख बाजारात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली.
मात्र, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी म्हणजेच DII ने सलग 15 दिवसांच्या खरेदीनंतर विक्रीचा मार्ग स्वीकारला आणि हजारो कोटींच्या शेअर्सची विक्री केली.
कॉर्पोरेट निकालांमुळे काही कंपन्यांचे शेअर्स चर्चेत राहण्याची शक्यता आहे. Tata Steel, SAIL, Premier Energies, Amber, Delhivery आणि Godfrey Phillips यांनी चांगले निकाल जाहीर केले आहेत.
तर Power Grid ची कामगिरी अपेक्षेपेक्षा घसरली. Vodafone Idea ने मात्र मजबूत निकाल जाहीर करत प्रमोटर्सकडून मोठ्या गुंतवणुकीची घोषणाही केली आहे.
Bharti समूहाशी संबंधित मोठ्या डीलची बाजारात चर्चा आहे. तसेच सरकारने सिल्वर बारच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
याशिवाय पेट्रोल निर्यातीवर प्रति लिटर 3 रुपयांचा विंडफॉल टॅक्स लावण्यात आला आहे, तर डिझेल आणि ATF वरील करात काही प्रमाणात कपात करण्यात आली आहे.
सध्या बाजारावर जागतिक घडामोडींचा मोठा प्रभाव दिसत आहे. अमेरिका-इराण तणाव, कच्च्या तेलातील तेजी आणि डॉलरची वाढ यामुळे पुढील काही दिवस बाजारात मोठे चढ-उतार दिसू शकतात. त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी जागतिक संकेत आणि कंपन्यांचे निकाल यावर लक्ष ठेवणं महत्त्वाचं ठरणार आहे.