Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी 24,100 च्या जवळ, कच्च्या तेलामुळे वाढली चिंता, गुंतवणूकदार सावध

Stock Market Today: भारतीय शेअर बाजाराची सपाट सुरुवात झाली, मात्र सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी घसरून 24,100 च्या जवळ पोहोचला.
Stock Market Today
Stock Market TodayPudhari
Published on
Updated on

Stock Market Today: भारतीय शेअर बाजाराची सपाट सुरुवात झाली. मात्र, बाजार उघडल्यानंतर काही वेळातच विक्रीचा दबाव वाढल्याचे दिसून आले. सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी सुमारे 50 अंकांनी घसरून 24,100 च्या आसपास व्यवहार करत होता. सेन्सेक्समध्येही सुरुवातीला किरकोळ घसरण झाली.

आज सकाळी निफ्टी 3 अंकांच्या घसरणीसह 24,152 वर खुला झाला, तर सेन्सेक्स 17 अंकांनी घसरून 77,218 वर उघडला. त्यानंतर बाजारावर दबाव वाढला आणि निफ्टी 24,100 च्या अगदी वर घसरला.

रुपयाचीही डॉलरच्या तुलनेत कमकुवत सुरुवात झाली. रुपया 3 पैशांनी घसरून डॉलरच्या तुलनेत 95.71 या स्तरावर खुला झाला.

मंगळवारीही शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. वीकली एक्सपायरीच्या दिवशी निफ्टी 132 अंकांनी घसरून 24,155 वर बंद झाला होता. तर सेन्सेक्स 492 अंकांच्या घसरणीसह 77,235 वर बंद झाला होता.

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे चिंता वाढली

शेअर बाजारावर सध्या सर्वात मोठा दबाव अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाचा दिसत आहे. या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असून क्रूड ऑइलचा भाव 92 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे.

कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांसाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. भारताला आपल्या गरजेचा मोठा हिस्सा परदेशातून तेल आयात करून पूर्ण करावा लागतो. त्यामुळे तेल महाग झाल्यास पेट्रोलियम आयात खर्च वाढू शकतो आणि महागाई वाढण्याची शक्यता निर्माण होते.

बाजारातील तज्ज्ञ अजय बग्गा यांच्या मते, अमेरिका आणि इराणमधील तणाव आणखी वाढल्यास कच्च्या तेलाचा भाव पुन्हा 100 डॉलर प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकतो. भारतीय अर्थव्यवस्था आणि शेअर बाजारासाठी ही चिंतेची बाब ठरू शकते.

जागतिक बाजारातही जोरदार विक्री

फक्त भारतीय बाजारावरच नाही, तर जगभरातील शेअर बाजारांवरही सध्या दबाव दिसत आहे. अमेरिकेच्या शेअर बाजारात सलग तीन सत्रांपासून घसरण सुरू आहे.

मंगळवारी डाओ जोन्स 116 अंकांनी घसरला, तर टेक्नॉलॉजी कंपन्यांचा प्रभाव असलेला नॅस्डॅक तब्बल 355 अंकांनी खाली आला. विशेषतः चिप आणि सेमीकंडक्टर कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाल्याने जागतिक बाजारातील वातावरण कमकुवत झाले आहे.

Stock Market Today
Tata Sons AGM: टाटा सन्सची AGM अचानक रद्द; 100 वर्षांत प्रथमच असं घडलं, टाटा समूहात नेमकं चाललंय काय?

याचा परिणाम आशियाई बाजारांवरही झाला. जपानचा निक्केई सुमारे 2.5 टक्क्यांनी घसरला, तर दक्षिण कोरियाचा KOSPI निर्देशांक सुमारे 5.5 टक्क्यांनी खाली आला.

जागतिक पातळीवर तंत्रज्ञान आणि चिप कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री वाढल्यामुळे भारतीय आयटी शेअर्सकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष राहणार आहे. भारतीय आयटी कंपन्यांमध्ये रिकव्हरी दिसू शकते, अशीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

बॉन्ड यील्ड वाढणे ही आणखी एक मोठी चिंता

जगभरातील बॉन्ड बाजारातही मोठे बदल सुरू आहेत. विविध देशांमध्ये बॉन्ड यील्ड वाढत असल्याने जागतिक अर्थव्यवस्थेसमोर नवीन आव्हान निर्माण झाले आहे.

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, बॉन्ड यील्ड वाढल्याने सरकारे आणि कंपन्यांसाठी कर्ज घेणे महाग होऊ शकते. याचा परिणाम गुंतवणूक, उद्योग आणि शेअर बाजारावर होण्याची शक्यता असते.

Stock Market Today
Awarapan 2 BO: ‘आवारापन 2’चा बॉक्स ऑफिसवर दबदबा; चित्रपटाने रचला इतिहास, किती कोटी कमावले? साऊथ इंडस्ट्री पण हादरली

अमेरिकेतील 30 वर्षांच्या सरकारी बॉन्डचा यील्ड तब्बल 19 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्याचे सांगितले जात आहे. जपानमध्ये 10 वर्षांच्या बॉन्डचा यील्ड सुमारे तीन दशकांच्या उच्चांकावर आहे. जर्मनी आणि फ्रान्समध्येही बॉन्ड यील्ड अनेक वर्षांच्या उच्च पातळीवर पोहोचले आहेत.

यामुळे जगभरातील केंद्रीय बँकांसमोर महागाई, व्याजदर आणि आर्थिक वाढ यांचा समतोल राखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

दरम्यान, आज अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून FOMC बैठकीचे मिनिट्स जाहीर होणार असून त्याकडे जगभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. भविष्यातील व्याजदरांबाबत फेडरल रिझर्व्हचा दृष्टिकोन काय आहे, याचे संकेत या मिनिट्समधून मिळू शकतात.

निफ्टीसाठी कोणते स्तर महत्त्वाचे?

तांत्रिक विश्लेषणानुसार निफ्टी सध्या महत्त्वाच्या स्तराजवळ पोहोचला आहे. SAMCO Securities चे टेक्निकल रिसर्च विश्लेषक ओम मेहरा यांच्या मते, निफ्टीने 20 दिवसांच्या SMA आणि 200 दिवसांच्या EMA च्या खाली क्लोजिंग दिली आहे.

आता निफ्टी 50 दिवसांच्या SMA च्या जवळ आला असून हा स्तर सुमारे 24,100 आहे. त्यामुळे 24,100 हा स्तर बाजारासाठी सध्या महत्त्वाचा मानला जात आहे.

logo
Pudhari News
pudhari.news